पिण्याच्या पाण्याची समस्या बऱ्याचदा मानवनिर्मित असते. २०० ते ३०० मिलिमीटर पाऊस पडत नाही असा भाग महाराष्ट्रात फार थोडा असेल. परंतु पुरेसा पाऊस पडूनही त्याची साठवण आपण करत नाही. धावणारे पाणी, त्याला धावण्याऐवजी रांगायला लावून ते जिरवले पाहिजे. त्यासाठी त्या भागात राहणाऱ्यांनी पावसाचे स्वरूप समजून घेऊन कृती केली पाहिजे.
नांदेड जिल्ह्यातील नागदरवाडी या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई अन्य हजारो गावांसारखीच होती. डोंगराळ भाग, मुरमाड जमीन, ओसाड प्रदेश, झाडी नाही, उतारामुळे पडणारा पाऊसही वाहून निघून जायचा. त्यामुळे विहिरी कोरडय़ा पडायच्या. जानेवारी महिन्यापासूनच गाव टँकरवर अवलंबून असे. टँकर आला की गावकरी हातातील काम सोडून पळत.
सगरोळीच्या संस्कृती संवर्धन मंडळाने पुढाकार घेऊन या गावात ग्रामसभा घेतली. गावकऱ्यांनी पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार केला. १९९९ मध्ये इंडो-जर्मन प्रकल्पामधून हनुमंत केंद्रे या स्थानिक तरुणाच्या नेतृत्वाखाली दोनशे हेक्टर जमिनीवर जल व माती संधारणाची कामे सुरू झाली. पावसाचे पाणी अडविण्यासाठी या डोंगराळ भागात सम पातळी चर, मातीचे बांध व सिंमेंटचे बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे धो-धो वाहून जाणारे पाणी अधिक काळ पाणलोट क्षेत्रात थांबून भूगर्भात जिरायला सुरुवात झाली.
नागदरवाडीत २०० मिलिमीटर इतका कमी पाऊस होतो आणि त्यापकी फक्त ५० टक्के पाऊस जरी अडवला तरी दहा लाख घनमीटर इतका प्रचंड पाणीसाठा निर्माण होऊ शकतो. २००५ पर्यंत क्रमाक्रमाने या गावात १००० हेक्टरवर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे होत गेली. सिमेंटचे २२ बंधारे व मातीचे तीन बंधारे बांधण्यात आले. परिणामी कोरडय़ा विहिरींना भरपूर पाणी उपलब्ध झाले. मार्चच्या कडक उन्हातही गावात भरपूर पाणी आले.
नागदरवाडी आता शेजारच्या दोन गावांनाही आपल्या विहिरीतून पाणीपुरवठा करीत आहे. गावकऱ्यांनी पाच लाख झाडे लावली आहेत. त्यामुळे सरपणाचीही सोय झाली आहे. पाणी ही विकासाची किल्ली आहे. म्हणजे पाठोपाठ रस्ते, वीज, नळ आले. गावाचे नाव मोठे झाले.
-उपेंद्र कुलकर्णी (नांदेड)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा