चुना, मातीची घरे फायदेशीर असतात त्याचप्रमाणे त्यांचे काही तोटेदेखील आहेत. अशा घरांना पावसापासून सुरक्षित ठेवावे लागते. त्यासाठी घराचा पाया योग्य उंचीवर बांधणे आवश्यक असते. भिंतीच्या पायामधून पाण्याचा योग्य निचरा होईल, अशी रचना करावी लागते. अन्यथा भिंतीतून ओल आत येते,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच भिंती बांधताना शुद्ध चुना- जो पाणी टाकल्यावर उष्णता निर्माण करतो अशा चुन्यासोबत माती व पाण्याचे मिश्रण करून ते गरम केल्यावर त्यापासून भिंतीचा बाहेरील गिलावा करणे अपेक्षित असते. तसे न केल्यास मातीमधे असलेली बुरशी भिंतीवर उगवू शकते.

वरील तीन गोष्टी योग्यरीतीने हाताळल्यास अशी घरे शेकडो वर्षे टिकल्याची उदाहरणे आहेत. ब्रिटनमधील अशा पद्धतीने बांधलेले सर्वात जुने मातीचे घर ३०० वर्षे होऊनदेखील जसेच्या तसे आहे. ही घरे खूपच भक्कम असतात, जी तोडण्यासाठी यंत्रे वापरावी लागतात. केरळमध्ये अशी घरे आढळतात. या घरांचा बाहेरील गिलावा पाहिला तर ते घर मातीचे आहे, यावर विश्वास बसत नाही. एखाद्या कोपऱ्यातील गिलावा तुटला तरच त्यातून बाहेर डोकावणारी माती दिसते.

अशी ब्रिटिशकालीन घरे आजही केरळमधे दिमाखात उभी आहेत. शिरगावमध्ये देखील माळी समाजाची शे-दीडशे वर्षे जुनी माती कुडाची घरे आजही उभी आहेत. बाहेरील रंग फिकट झाला असला, तरीही घर आतून अजूनही जसेच्या तसे आहे. कुठेही भेगा नाहीत. त्याविरुद्ध अलीकडच्या काळात बांधलेल्या सिमेंटच्या घरांना अवघ्या २०-३० वर्षांत भेगा पडल्या आहेत.

माती- कुडाची घरे वापरात नसतील, तर दोन-तीन वर्षांत त्यावर झाडे उगवतात. अशी घरे सहज पाडून त्यातील उपयोगी साहित्य लाकूड, दारे- खिडक्या, माती इत्यादींचा पुनर्वापर करता येतो आणि निसर्गाचा समतोल राखता येतो.

सिमेंटची घरे पाडल्यानंतर त्यात वापरलेल्या साहित्याचा पुनर्वापर करता येत नाही. शिवाय त्यात वापरले जाणारे घटक विघटित व्हायलाही शेकडो वर्षे लागतात. त्यावर पुन्हा झाडेझुडपे वाढायला खूप कालावधी जातो आणि म्हणून माती- कुडाची उबदार घरे सर्व दृष्टींनी श्रेष्ठ ठरतात. माती- कुडाच्या घरात थंडी, वारा, पाऊस, कडक ऊन यापासून खऱ्या अर्थाने संरक्षण मिळते.

– प्रा. भूषण भोईर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org