जीवाश्म म्हणजे अतिप्राचीन काळी अस्तित्वात असणाऱ्या सजीवांचे नैसर्गिक खडकांमध्ये जतन झालेले अवशेष होत. जीवाश्म खडकात सापडतात, म्हणून भूवैज्ञानिकांना जीवाश्मांच्या अभ्यासात स्वारस्य असते; तर जीवाश्म अतिप्राचीन काळी अस्तित्वात असणाऱ्या सजीवांचे अवशेष असतात, म्हणून जीववैज्ञानिकांनाही जीवाश्मांच्या अभ्यासाचे महत्त्व वाटते.

सजीवांचा अभ्यास जर परिपूर्णपणे करायचा असेल तर आज जे प्राणी आणि वनस्पती अस्तित्वात आहेत, त्यांचीच माहिती संकलित करून भागणार नाही. त्यांचे पूर्वज कोण होते, त्यांच्यामध्ये उत्क्रांती कशी आणि का झाली हेही समजून घ्यायला हवे. सजीवांची शेकडो कुळे आणि हजारो प्रजाती विलुप्त झाल्या. त्याच्या मागच्या कारणांचा शोध घ्यायला हवा आणि यासाठीच आपल्या मदतीस विज्ञान येते. आज हवामान बदलाच्या सावटाखाली जैवविविधता धोक्यात आली असताना त्या माहितीतून आपण काही तरी बोध घ्यायची नितांत गरज आहे.

इथे मृदुकाय संघातील एकमेकांशी साधर्म्य दाखवणाऱ्या दोन प्रजातींचा आपण विचार करू. त्यातल्या एका प्रजातीचे नाव आहे अ‍ॅटुरिया. ही प्रजात सुमारे साडेपाच कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. निरनिराळय़ा कालखंडांत अ‍ॅटुरियाच्या वेगवेगळय़ा जाती उत्क्रांत झाल्या. काळाच्या ओघात त्या विलुप्तही होत गेल्या. तरीदेखील अ‍ॅटुरिया ही प्रजाती पृथ्वीतलावर जवळपास पाच कोटी वर्षे होती. शेवटची जात अस्तंगत झाल्यानंतर ही प्रजाती सुमारे त्रेपन्न लाख वर्षांपूर्वी विलुप्त झाली.

दुसऱ्या प्रजातीचे नाव आहे नॉटिलस. ही प्रजाती तर अ‍ॅटुरियाच्या खूपच आधी, म्हणजे २५ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आली होती. या प्रजातीच्याही अनेक जाती निरनिराळय़ा कालखंडांत उत्क्रांत झाल्या आणि एकेक करून काळाच्या उदरात गडप झाल्या. पण अ‍ॅटुरियाप्रमाणे नॉटिलस ही प्रजाती विलुप्त झाली नाही. ती कशीबशी तग धरून आहे. सध्या या प्रजातीच्या केवळ चार जाती अस्तित्वात आहेत. नॉटिलसच्या या चार जातींच्या अभ्यासावरून अ‍ॅटुरियाच्याच नव्हे तर विलुप्त झालेल्या सर्वच नॉटिलसवर्गीय प्रजातींच्या शरीररचनेची आणि अधिवासाची कल्पना नक्कीच येऊ शकते. 

नॉटिलससारख्या आणखीही काही प्रजाती खूप प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. त्यांच्याही अनेक जाती काळाच्या ओघात विलुप्त झाल्या आहेत. अशा सजीवांना ‘जीवित जीवाश्म’ (लिव्हिंग फॉसिल) म्हणतात.

आशियाई हत्ती (प्रजाती एलेफस), आफ्रिकन हत्ती (प्रजाती लोक्जोडोंटा). प्रकटबीजी वनस्पतीची प्रजाती गिंको, ही आणखी काही जीवित जीवाश्मांची उदाहरणे आहेत. 

– डॉ. कांतिमती कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org