सूफी हा इस्लाम धर्म परंपरेचा, इस्लाम धर्माच्या चौकटीत असणारा संप्रदाय आहे. इस्लाम धर्मीयांमध्ये सूफी पंथाचा प्रारंभ हजरत मोहम्मद पगंबरांपासूनच झाला असं मानलं जातं. मोहम्मद पगंबरांना प्रेषित म्हणून परमेश्वराचे साक्षात्कार झाले. त्यापैकी एका साक्षात्काराचे दृश्यफळ म्हणजे पवित्र कुराण समजले जाते. दुसरा साक्षात्कार मोहम्मद पगंबरांना त्यांच्या गारे हिरा समाधी अवस्थेतून झाला. कुराणातून प्रगट झालेले ज्ञान हे सर्वसामान्य लोकांकरिता होते आणि दुसऱ्या प्रकारचे ज्ञान ही गूढ विद्या होती. ही विद्या गुरू-शिष्य परंपरेनेच शिष्यांकडे पोहोचली. या विद्य्ोलाच सूफी विचारप्रणाली असे नाव आहे. सूफी पंथाची बीजे कुराणात आणि मोहम्मद पगंबरांच्या बोधवचनात आढळून येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्लाम धर्माच्या प्रारंभावस्थेत सूफींचा कटाक्ष विशेषत निवृत्ती मार्गावरच दिसून येतो. विश्वातल्या सर्व सुखसमृद्धीचा त्याग करून, निर्धनावस्थेत एकांतात कठोर तपश्चर्या करणे अशी जीवनशैली सूफी संत आणि अनुयायांनी स्वीकारली होती. सूफी म्हणजे देह दंडाद्वारे परमेश्वराचा साक्षात्कार करून घेऊ इच्छिणारे मुस्लीम तपस्वी होत. मोहम्मद पगंबरांच्या नंतरच्या दोनशे वर्षांत सूफी तसव्वूफ म्हणजे सूफी अध्यात्मवाद, तत्त्वज्ञान यांचा उदय झाला असे मानले जाते. ‘सूफी’ या शब्दाचा उगम तीन चार प्रकारे सांगितला जातो. त्यातील सर्वमान्य असा की, ‘सूफ’ या मूळ शब्दावरून सूफी बनला. ‘सूफ’ म्हणजे लोकरीचे जाडे भरडे, आपल्याकडच्या घोंगडीसारखे कापड. अशा जाडय़ा भरडय़ा, लोकरीच्या कापडाचे कपडे म्हणून वापर करणारे ते ‘सूफी’. असे कपडे वापरणे म्हणजे प्रेषित मोहम्मद पगंबरांचे अनुकरण समजले जाई. एका हदिसामध्ये म्हणजे पगंबराच्या बोधवचनात उल्लेख आहे की, ते स्वत सूफचेच कपडे वापरीत असत. ‘सुफ्फा’ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. सुफ्फा म्हणजे स्वतचे घर नसलेला गरीब मुसलमान किंवा सुफ्फा म्हणजे ‘दिल की सफाई’ या अर्थानेही सूफी हा शब्द उगम पावला असावा. मक्केत प्रेषित इब्राहिमने परमेश्वर प्रार्थनेसाठी घर बांधले. त्याचे नाव ‘काबा’. काबाच्या सेवकाला ‘सोफी’ असे म्हणण्याचा प्रघात आहे.

 सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sufi community information
Show comments