मानवासह सर्व सजीवांत ग्लुकोज हे ऊर्जानिर्मितीचा स्रोत आहे. कबरेदकांचे पचन झाल्यानंतर, रक्तातून ग्लुकोज पेशींपर्यंत पाठवलं जातं. ग्लायकोलिसिस या प्रक्रियेद्वारे पेशीत ग्लुकोजचे ऑक्सिडेशन होऊन कार्बन डायऑक्साइड. पाणी आणि ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा ATP च्या (Adenosine Triphosphate) रूपात साठवली जाते.
ग्लुकोज रक्तात आलं की रक्तातील साखरेची म्हणजेच ग्लुकोजची पातळी वाढते आणि स्वादुपिंडातील अल्फापेशींतून ‘इन्शुलिन’ हे संप्रेरक स्रवू लागतं. या संप्रेरकामुळे पेशी रक्तातील ग्लुकोज घेण्यास उद्युक्त होतात. पेशींनी ग्लुकोज घेतलं की साहजिकच रक्तातील शर्करेची पातळी कमी व्हायला लागते. रक्तातील शर्करेची पातळी कमी झाली की यकृत साठवलेल्या ग्लायकोजनचे विघटन करतं आणि पुन्हा त्याचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करतं. या प्रक्रियेला ‘ग्लायकोजनोलेसिस’ असं म्हणतात.
ग्लायकोजनोलेसिस होण्यासाठी ‘ग्लुकॅगॉन’ हे संप्रेरक महत्त्वाचे आहे. रक्तातील शर्करेची पातळी विशिष्ट मर्यादेपर्यंत कमी झाली की स्वादुिपडातील अल्फापेशींतून ‘ग्लुकॅगॉन’ हे संप्रेरक स्रवू लागतं. हे संप्रेरक यकृतात ग्लायकोजन स्रवण्यासाठी उद्युक्त करतं. थोडक्यात काय तर, रक्तातील शर्करेची पातळी वाढली की इन्शुलिनमुळे ती कमी होते आणि रक्तातील शर्करेची पातळी कमी झाली की ग्लुकॅगॉनमुळे ती वाढते.
शरीरातील क्रियांसाठी ग्लुकोज आवश्यक आहेच. विशेषत: मेंदूच्या पेशींसाठी ग्लुकोज हा महत्त्वाचा ऊर्जास्रोत आहे. इन्शुलिन कमी असेल किंवा नसेल तर रक्तातील ग्लुकोजचा वापर पेशींकडून होत नाही. मेंदूच्या पेशींना पुरेशा प्रमाणात ग्लुकोज मिळालं नाही तर शरीराचे नियंत्रण, निर्णयक्षमता यांवर परिणाम होतो.
स्वादुपिंडातील अल्फापेशी जीर्ण झाल्या किंवा इतर काही कारणांमुळे इन्शुलिननिर्मिती कमी झाली की रक्तदाब वाढणे, मेद वाढणे, वजन वाढणे, आवश्यक कोलेस्टेरॉलची पातळी कमी होणे आणि बाधक कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे इत्यादी लक्षणं दिसू लागतात. त्याचाच परिपाक म्हणजे मधुमेह उद्भवतो.
सामान्य निरोगी माणसाच्या रक्तात दर १०० मिलीमध्ये ८० ते ११० मि.ग्रॅ. ग्लुकोज असतं. जेवणानंतर ग्लुकोजचे प्रमाण वाढत जातं. एक ते दीड तासात ते सगळ्यात जास्त असतं व दोन तासांनंतर ते पूर्ववत होतं. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये दोन तासांनंतरही हे प्रमाण वाढलेलंच राहतं.
चारुशीला जुईकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा – सारं समर्पण करावं..
एका सायंकाळी अशाच अंतर्मुख ‘मूड’मध्ये बसलो असताना वाटलं की उतरत्या सांजवेळी शांत, नि:शब्दपणे वाहणाऱ्या नदीच्या तीरावर उभे आहोत. दिवसभर कामं करून शिणले भागलेले धीवर आपापल्या नौका नांगरून घरी गेले आहेत. पाण्यावर पडलेली मावळत्या सूर्याची किरणं लहरीचा निरोप घेत आहेत. आणि आता हळूहळू रात्रीचा गोड गूढ काळिमा त्या नदीच्या पात्राला आपल्या कवेत घेतोय. दूरवरच्या शिवालयातली घंटाही निजलीय. सारं शांत शांत होत असताना कोणी एक अज्ञात प्रौढ नि पोक्त जोडपं त्या प्रवाहात दीपदान करून हात जोडून उभं आहे. वाऱ्याच्या झुळुकीमुळे त्या गृहस्थाची शाल फडफडते आणि तिच्या डोक्यावरचा पदर थरारतो आहे.
दोघेही तृप्तपणे त्या नदीकडे पाहतात. परस्परांचे हात हातात घेऊन स्वस्थ राहतात नि कुठून तरी हवेच्या बासुरीवर सूर उमटतो. वीणेच्या तारा आपोआप झणकारतात आणि हे गीत सुरू होतं..
छुपा लो यूं दिल में प्यार मेरा
के जैसे मंदिर में लौ दिये की
तुम अपने चरणो में रखलो मुझको
तुम्हारें चरणों का फूल हूँ मैं।।
मैं सर झुकाए खडी हूँ प्रीतम
के जैसे मंदिर ने लौ दिये की
सच है जीना था पाप तुम बिन
ये पाप मैंने किया है अब तक
मगर भी मन में छबी तुम्हारी
के जैसे मंदिर में लौ दिये की ।।
फिर आग बिरहा का मत लगाना
के जलके मैं राख हो चुकी हूँ
ये राख माथे पे मैंने रख ली
के जैसे मंदिर में लौ दिये की ।।
(-हेमंतकुमार, लता मंगेशकर
संगीत रोशन, गीत मजरुह)
त्या सांजवेळची ती गूढरम्यता, प्रेमाच्या उत्कटतेनं शृंगारलेले शब्द म्हणजे हे गाणं.
संथ, तरी आर्त स्वर, दोघांचे पण सूर एकच. मजरुहनी या गाण्यात साध्या साध्या शब्दातून प्रेमाच्या उदात्ततेला सहज नादबद्ध केलं आहे.
गाण्याचा बाज सूफी नाही, ते भजनही नाही. प्रार्थना वाटावी, त्यात उत्स्फूर्त आर्जव अधिक आहे. साऱ्या गीतरूपांचं इथे प्रतिबिंब आहे. प्रीतम-सनम आणि परमेश्वराचं एकरूपत्व थेट सूफी आहे. मंदिराच्या काळोख्या गाभाऱ्याला उजळून टाकणाऱ्या निरांजनाच्या ज्योतीच्या रूपकातून मधुराभक्तीची सय आहे. आग आणि राखेच्या रूपकामुळे शिवशंकराची आठवण आहे. काहीसं कन्फेशन आहे, त्यामुळे क्षमायाचनाही आहे. एकाच, फक्त एकाच गाण्यात इतकं सारं एकवटण्याची किमया संगीतकार रोशन यांनी केली.
हेमंत कुमारजी के तो क्या कहने? त्यांनी गाण्याला अशी सुरुवात करून दिलीय की अंग सहज रोमांचित होतं तर लतादीदींच्या आर्त सुरांनी हृदयात सूक्ष्म कळ उसळते.
सारं सारं समर्पण करावंसं वाटतं या गाण्याला.
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व – धर्म जोडतो, अधर्म तोडतो
‘‘‘धर्म’ आणि ‘कलह’ यांचा शाश्वत आणि अपरिहार्य असा विरोध आहे. धर्मात कलह संभवतच नाही. ‘कलह’ आणि ‘कलि’ हे दोन परस्परांचे पर्याय होत. जेथे धर्म असतो तेथे सत्ययुग असते. कलह असला म्हणजे ते कलियुग म्हणावयाचे! इंग्रजीत कलियुग या अर्थी आयर्न एज असा शब्द आहे. आयर्न एज म्हणजे लोहयुग, ‘लोहनिनाद करणाऱ्यांचे’ तरवारवाल्यांचे युग! तथापि धर्माबरोबर कलह आणि युद्ध ही जोडून दिलेलीच आपल्याला आढळतात. हा भाषेवर अत्याचार तर खराच पण मानवतेवर- मनुष्याच्या आत्म्यावर देखील हा अत्याचारच होय. वरील दोन शब्दांचा आम्ही कितीहि जिकिरीने समास सांधण्याचा प्रयत्न केला तरी त्यातील विरोधी भावांचा समास सांधणे शक्य नाही. कारण ‘धर्म’ आणि ‘कलह’ यांच्यांत केवळ शाब्दिक विरोधाभासच नव्हे तर वस्तुगत विरोध आहे. विरोधाचे स्वरूप केवळ अलंकारिक नाही, ती वस्तुस्थिति आहे. ‘तिमिरमय प्रकाश’, ‘क्रोधपूर्ण शांति’,‘ चारित्र्यहीन साधुता’ या शब्दसमूहांतून हवा तर एक वेळ अर्थ काढता येईल पण ‘धार्मिक कलह’ या शब्दांतून अर्थच निघू शकत नाही. हा तर ‘वदतो व्याघात’ आहे.’’
आचार्य दादा धर्माधिकारी धर्माच्या स्वरूपाबद्दल ‘धार्मिक कलह’ (१९४०) या लेखात म्हणतात-
‘‘धर्म एकच आहे आणि तो सार्वदेशिक, सार्वत्रिक आणि सार्वजनिक आहे. धर्माचा उद्देश धारण करण्याचा – मानवांना एकत्रित, परस्पर-संबद्ध करून त्यांची धारणा करण्याचा आहे. मानवी समाजात ईश्वरी प्रेमाचा साक्षात्कार तो हाच. येशूचे ईश्वरी राज्य ते हेच. गांधींचे ‘रामराज्य’ आणि आदर्शवाद्यांचा ‘आदर्शसमाज’ही हाच. जो मानवांचा संयोग करतो तो धर्म. ज्यामुळे मानवांत विभाग उत्पन्न होतो तो अ-धर्म. धर्म म्हणजे योगाचे शास्त्र नि कला, वियोगाचे नव्हे. धर्म जोडतो, अधर्म तोडतो. तो आम्हाला भेदातून अभेदाकडे, विग्रहातून संधीकडे आणि विद्वेषातून प्रेमाकडे नेत असतो. सबब, असा धर्म हा एकच होऊ शकतो हे उघड आहे.’’