मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राची स्थापना सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे १९३२ या वर्षी झाली. उसाचे अधिक उत्पन्न व साखर उतारा देणाऱ्या जातींची निर्मिती करणे, ऊस लागवडीसंबंधी किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करणे या कामात संशोधन केंद्र सतत कार्यरत आहे. आजपर्यंत या संशोधन केंद्राने महाराष्ट्रात लागवडीसाठी उसाच्या १३ जाती प्रसारित केल्या आहेत. त्यापकी नऊ जाती अजूनही कमीअधिक प्रमाणात राज्यात लागवडीखाली आहेत. या संशोधन केंद्राने १९९६ या वर्षी शिफारस केलेल्या को-८६०३२ या एकाच जातीने राज्यातील ऊस लागवडीखालील क्षेत्रापकी जवळजवळ ६० टक्के क्षेत्र व्यापले आहे.
केंद्राने लागवड पद्धती, खत व्यवस्थापन, आंतरपिके, पाणी व व्यवस्थापन, ठिबक व तुषारसिंचन पद्धती, तण व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, जैविक खते, माती, पाणी व रसायनशास्त्र अशा अनेक महत्त्वाच्या बाबींसंबंधी मोलाचे संशोधन केले आहे. २००७ साली केंद्राने खारवट चोपण जमिनीत चांगली वाढणारी, पाण्याचा ताण सहन करणारी व अधिक उत्पन्न, उत्तम खोडवा व मध्यम साखर उतारा असणारी फुले २६५ या जातीची तिन्ही हंगामांसाठी शिफारस केलेली आहे. गेल्या पाच वर्षांत ही जात शेतकऱ्यांच्या आíथक उत्पन्नात वाढ करण्यासाठी व साखर कारखानदारीसाठी उपयुक्त ठरली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस शेतकऱ्यांच्या जीवनात या ऊस जातीने क्रांती घडविलेली आहे. यामुळे दिवसेंदिवस या जातीचे लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.
संशोधन कार्यक्रमांबरोबरच उसाच्या सुधारित जातींच्या मूलभूत बेण्यांची निर्मिती करून ते राज्यातील साखर कारखान्यांना व शेतकऱ्यांना वाटपाच्या कामात हे संशोधन केंद्र सतत कार्यरत राहिलेले आहे. या व्यतिरिक्त मोठमोठी शेती प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शने, आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, मासिके, घडीपत्रिका अशा विविध माध्यमांद्वारे ऊसलागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या संशोधन केंद्रावरील शास्त्रज्ञ सतत प्रयत्नशील राहिले आहेत.
-डॉ. एस. एम. पवार, (फलटण)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई२२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा