सल्फर डाय ऑक्साइड पाण्यात विरघळणारा, रंगहीन आणि उग्र वास असलेला वायू आहे. याचे नसíगक स्रोत म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक, समुद्रातील लाटांचे तुषार आणि जैविक विघटन. मानवनिर्मित स्रोतांमध्ये कोळसा वापरून होणारी औष्णिक वीजनिर्मिती, खनिज तेल शुद्धीकरण, सल्फ्युरिक आम्लनिर्मिती, कचरा जाळणे इत्यादी क्रियांचा समावेश होतो. हवेतील या वायूचे प्रमाण वाढल्यास माणसाच्या आरोग्यावर, वनस्पतींवर आणि आम्ल पर्जन्यामुळे ताजमहालासारख्या ऐतिहासिक वास्तूवर प्रतिकूल परिणाम दिसून आले आहेत.
हवेतील या वायूचे मोजमापन खालील २ पद्धतींनी केले जाते.
१. सुधारित पाश्चात्त्य आणि ग्रीक पद्धती: या पद्धतीमध्ये हवेतील सल्फर डाय ऑक्साइड एक लिटर/मिनिट या वेगाने हाय व्हॉल्यूम सँपलरला जोडलेल्या इिम्पजरमधल्या ऊध्र्वपतित पाण्यात (डिस्टिल्ड वॉटर) बनवलेल्या पोटॅशियम टेट्राक्लोरोमक्र्युरेट (३० मिलिलिटर) नावाच्या शोषक द्रावणात शोषून घेतला जातो. त्यानंतर प्रयोगशाळेत यामध्ये सल्फामिक आम्ल, फॉर्मल्डिहाइड आणि पॅरारोजॅनिलीन टाकून जांभळ्या रंगाचे संयुग तयार करण्यात येते. या संयुगाच्या रंगाची शोषकता (अॅबसॉर्बन्स) ५६० नॅनोमीटर तरंगलांबीवर पंक्तिअनुदीप्तिमापीच्या (स्पेक्ट्रोफोटोमीटर) साहाय्याने मोजण्यात येते. अंशशोधन वक्राच्या (कॅलिब्रेशन कव्र्ह) साहाय्याने नमुन्याच्या शोषकतेवरून त्यातील सल्फर डाय ऑक्साइडचे प्रमाण मोजता येते. या प्रमाणाला हवेच्या आकारमानाने भागून हवेतील सल्फर डाय ऑक्साइडचे प्रमाण मायक्रोग्रॅम/मी ३ मध्ये नोंदविण्यात येते.
२. अतिनील प्रतिदीप्ती पद्धती: हवेच्या प्रवाहात सल्फर डाय ऑक्साइड वायूबरोबर अॅरोमॅटिक हायड्रोकार्बनसारख्या अशुद्धी असतात. त्यांच्यामुळे मोजमापनात अडथळा निर्माण होतो. हा अडथळा दूर केल्यानंतर सल्फर डाय ऑक्साईडच्या रेणूंना अतिनील किरणांच्या शोषणाने उत्तेजित केले जाते. हे रेणू मूळ ऊर्जापातळी अवस्थेत परत येताना प्रतिदीप्त ऊर्जा उत्सर्जति करतात. ही ऊर्जा प्रकाशविद्युत गुणक नलिकेच्या (फोटोमल्टिप्लायर टय़ूब) साहाय्याने मोजली जाते. या ऊर्जेची तीव्रता हवेच्या प्रवाहातील सल्फर डाय ऑक्साइडच्या रेणूंच्या संख्येच्या आणि त्यामुळे संहतीच्याही (कॉन्सन्ट्रेशन) प्रमाणात असते.
भारतातील राष्ट्रीय परिसर वायू गुणवत्ता मानकांनुसार औद्योगिक, रहिवासी, ग्रामीण आणि इतर क्षेत्रांत तसेच संवेदनशील पारिस्थितिक (इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह) क्षेत्रात २४ तासांसाठीचे या वायूचे मानक ८० मायक्रोग्रॅम/मी ३ तर वार्षकि मानक अनुक्रमे ५० व २ मायक्रोग्रॅम/मी ३ आहे.
–मिहिर हेर्लेकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
शिरोडय़ाचे खांडेकर: शिक्षक ते ‘साहित्यिक’
‘गणेश आत्माराम खांडेकर’ दत्तकविधानानंतर विष्णू सखाराम खांडेकर झाले. दत्तकपित्याला खांडेकरांविषयी फारसे प्रेम नव्हते. दत्तक संपत्तीचा वारसा मिळूनही त्यांना आर्थिक लाभ झाला नाही आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते इंटपर्यंतच शिक्षण घेऊ शकले. अखेर पुण्याहून ते नानेली गावी आले, पण दत्तक होऊनही आपण कुठल्या दरिद्री, चैतन्यहीन खेडय़ात येऊन पडलो, असे विचार त्यांच्या मनाला सतावू लागले. ‘जगाचा कधी काळी उद्धार झालाच तर तो शिक्षकाच्या हातूनच होऊ शकेल’ या भाबडय़ा समजुतीने १२ एप्रिल १९२० रोजी ते शिरोडय़ाच्या शाळेत शिक्षक म्हणून हजर झाले. हातात होती एक पिशवी. त्यात चार कपडे व केशवसुतांच्या कवितेचे पुस्तक कोंबलेले. ‘खेडय़ाकडे चला’ हा गांधीजींचा आदेश आचरणात आणून ते शिरोडय़ासारख्या आडवळणी खेडय़ात आले. तिथे नव्या नव्या सुधारणा, उपक्रम सुरू केले. स्त्री शिक्षणाचा प्रचार केला आणि शिक्षणकार्यात ऐन उमेदीची अठरा वर्षे वेचली.
ते शिरोडे गाव, ती टेकडी, तो समुद्र- त्यांना लेखनासाठी अनेक विषय पुरवीत होते. ते त्यांचे जिवलग दोस्त होते. गुजगोष्टी, कथा-कविता, कादंबरी, विनोद, टीका, लघुकथा, लघुनिबंध, आत्मचरित्र असे सर्व प्रकारचे लेखन त्यांनी केले ते इथेच या शिरोडे गावातच. पुढे १९३८ च्या जानेवारीत शिरोडे सोडून कोल्हापूरला स्थायिक होईपर्यंत जी साहित्यनिर्मिती झाली, चित्रपटासाठी लेखन झाले ते या ठिकाणीच.
या शिरोडे गावाने आपल्याला खूप काही दिले. शिरोडेसारख्या खेडय़ात जाण्याने आपला विकास साधला आणि आपण ललित वाङ्मयाचे लेखक झालो. आपले साहित्य शिरोडे खेडय़ानेच समृद्ध केले. अशा प्रकारचे कृतज्ञतापूर्ण उद्गार खांडेकरांनी व्यक्त केले आहेत. साहित्याच्या ध्यासापायी ते स्वतंत्र बुद्धीने नव्या नव्या साहित्यप्रकारांचा शोध घेत गेले. मराठीतले बहुतेक साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. लघुनिबंध आणि रूपक कथा- हे त्यांचे खास साहित्यप्रकार. मराठीत मोठय़ा प्रमाणात रूपककथा लिहिणारे खांडेकर हे एकमेवच. १९२० ते १९३८ या काळात खांडेकरांनी भरपूर कथा लिहिल्या. ओ’हेन्री, मोपाँसा, चेकॉव्ह, गॉल्सवर्दी इ. लेखकांचे कथासंग्रही वाचले. तेव्हा त्यांना जाणवले की, लघुकथा ही केवळ रंजनप्रधान वा बोधपर कहाणी नाही. जीवनातील उत्कट अनुभवांचे वैशिष्टय़पूर्ण दर्शन कथातून घडायला हवे!
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com