उदयशंकर या प्रख्यात नर्तकाबरोबर सुमित्रानंदन यांनी भारतभर प्रवास केला. त्यावेळी योगी अरविंदबाबू यांच्याशी त्यांचा संबंध आला. अरविंदांच्या तत्त्वज्ञानाने ते भारावून गेले. याचा परिणाम त्यांच्या ‘स्वर्णकिरण’ व ‘स्वर्णधुलि’ या काव्यसंग्रहातील कवितेत दिसतो. १९४९ मध्ये ‘उत्तरा’, १९५७ मध्ये ‘वाणी’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. यातील कवितेत मानवाच्या उज्ज्वल भवितव्याविषयी आणि अंतिम ध्येय गाठण्याच्या सामर्थ्यांविषयी कवीचा आशावाद व्यक्त झाला आहे. दरवर्षी ते एक पुस्तक प्रकाशित करीत असत.  ‘कला और बुढा चाँद’ या संग्रहातील कवितांवर प्रयोगवादी रचनेचा प्रभाव पडलेला दिसतो. या संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. १९६४ मध्ये ‘लोकायतन’ हे नवमानवतावादी विचारांचा प्रभाव असलेले ६८० पानांचे महाकाव्य प्रसिद्ध झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘चिदंबरा’ (१९५८) आणि ‘लोकायतन’मध्ये त्यांनी धरतीच्या चेतनेला मुख्य स्थान दिले आणि सतीचे रूपक कल्पून तिला मध्ययुगीन नैतिक संस्काराच्या तसेच रूढींच्या  शृंखलातून मुक्त करीत, तिचे पूर्ण मानवीकरण केले आहे. १९६८ च्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ‘चिदंबरा’ (१९५८) हा काव्यसंग्रह म्हणजे ‘युगवाणी’ (१९३७) पासून ‘वाणी’ (१९५८) पर्यंतच्या दहा काव्यसंग्रहांतून निवडलेल्या १९६ कवितांचे संकलन आहे. या साऱ्या कविता आजच्या मानवाच्या अंत:संघर्षांच्या कविता आहेत. ‘चिदंबरा’’मध्ये         विश्वव्यापी संकटावर उपायही सुचविण्यात आला आहे. विज्ञानाची शक्ती आणि त्याचा परिणाम म्हणून, सगळीकडे भौतिकवाद माजला आहे. त्यात मानवाला अशा सांस्कृतिक गुणांनी युक्त केलं जावं की, त्यामुळे त्याचं मन प्रबुद्ध होईल. आध्यात्मिक मूल्यांची जाणीव होईल. त्याच्या प्रयत्नांना एक नवीन अर्थ प्राप्त होईल. त्यामुळे सर्वत्र सामंजस्याचा प्रसार होईल, असं कवीला वाटतं. ‘चिदंबरा’त विविध प्रकारच्या सौंदर्याविषयीची तरल अनुभूती व्यक्त होते. पण सौंदर्याचा आस्वाद घेता घेता अंतर्मुख होऊन जीवनाच्या व्यापक वास्तवाचा ते विचार करू लागतात. त्यामुळे ‘चिदंबरा’तील त्यांची कविता या दोन पातळ्यांवर वावरताना दिसते.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

 

बुद्धिमत्ता मोजमाप गुणांक

बुद्धी हे माणसाला मिळालेले एक अद्वितीय वरदान आहे.  तिचा वापर करून अनेक प्राण्यांपेक्षा शारीरिक शक्ती कमी असूनही त्याने युक्तीच्या जोरावर सर्व सजीव सृष्टीवर वर्चस्व स्थापन केले आहे. प्रत्येक माणूस वेगळा असल्यामुळे त्याची नसíगक बुद्धिक्षमता निरनिराळी असू शकते. पालनपोषण, शिक्षण आणि अनुभव असे घटकही तिच्या विकासावर परिणाम करू शकतात, हे मान्य झालेले आहे.

तथापि काही विशिष्ट कामांसाठी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी इच्छुक व्यक्तींच्या बुद्धीचे मोजमापन करणे हल्ली आवश्यक ठरत आहे.  त्यासंदर्भात विशेष म्हणजे चीनमध्ये इसवीसन ६०५ मध्ये एक चाचणी परीक्षा घेऊन निवडक बुद्धिमान व्यक्ती शासकीय सेवेत घेतल्याचा उल्लेख आहे. सन १९०४ मध्ये फ्रान्स सरकारने आल्फ्रेड बिनेत या मानसशास्त्रज्ञाला सामान्य आणि त्यापेक्षा कमी बुद्धी असलेल्या मुलांतील फरक ओळखण्यासाठी पद्धत विकसित करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी तशी एक मोजपट्टी तयार केली, जी ‘बिनेत-सायमन पट्टी’ म्हणून ओळखली जाते. तिच्यात नंतर अनेक सुधारणा वेळोवेळी केल्या गेल्या.

आधुनिक काळात तिचे प्रगत स्वरूप विशेष परीक्षेद्वारे वापरून व्यक्तीचा बुद्धिमत्ता गुणांक म्हणजेच बुद्धय़ांकाचे (इंटेलिजन्स कोशंट – आयक्यू) मापन केले जाते. हा गुणांक अर्थातच व्यक्तीच्या वयाशी संबंधित असतो. या मोजपट्टीप्रमाणे त्या परीक्षेत प्राप्त गुणांवरून (सरासरी १०० मानून) पुढीलप्रमाणे ढोबळ वर्गीकरण केले जाते :

गुण                   दर्जा

१४० पेक्षा अधिक –   अलौकिक/ अपूर्व बुद्धिमत्ता

१२० ते १४०-           अतिशय महान बुद्धिमत्ता

११० ते ११९-            महान बुद्धिमत्ता

९० ते १०९-              साधारण/ सरासरी बुद्धिमत्ता

८० ते ८९-                 मंद बुद्धी

७० ते ७९-                 मतिमंदच्या काठावर

७० पेक्षा कमी             मतिमंद

मतिमंद व्यक्तींचे त्यांच्या गुणांनुसार पुढे  सौम्य (५०-७०), मध्यम (३५-५०), तीव्र (२०-३५) आणि अतितीव्र (२० पेक्षा कमी) असे उपगट पाडले जातात. आणि त्याप्रमाणे त्यांच्या प्रशिक्षणासाठी विशिष्ट पद्धत ठरवली जाते.

मात्र अशा परीक्षेने दिलेला बुद्धय़ांक मोठा असल्याने ती व्यक्ती यशस्वी होईलच असे नसते; तर स्वयंशिस्त आणि मेहनत हे घटक यशासाठी फार महत्त्वाचे आहेत, असे संशोधन सांगते. तसेच बुद्धिमत्ता ही विविध प्रकारची असून त्यापकी एकाचा विकास करूनही चांगली कारकीर्द घडू शकते.

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sumitranandan pant