रविन मायदेव थत्ते
मी एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात पुरुष म्हणून पुण्यात जन्मलो. धड ना श्रीमंत ना गरीब. सुदैवाने मी उपेक्षित, शोषित किंवा अशिक्षित नाही. संकुचित असण्याचा संभव जास्त. टायटॅनिक चित्रपटात त्या बोटीवर एक वागदत्त वधू आणि तिचा होणारा वर सहप्रवास करतात. तिला हा वर किंवा नर बिलकुल पसंत नसतो. ‘इतके चांगले स्थळ आहे. तुझा फाजीलपणा बंद कर’ असे तिची आई तिला बजावते. ही दिवाणी होते. तेव्हा तिला एक धीट परंतु बेवफा चित्रकार तरुण भेटतो. हा तिला प्रेम म्हणजे काय व ते कसे करायचे ह्य़ाचे धडे देतो आणि धुंद वातावरणात तिचे एक तसले (!) चित्र काढतो. बोट बुडते हा तिला वाचवतो स्वत: बुडतो. साठ-सत्तर वर्षांनंतर ही बोट सापडते. त्याच्यात तिचे ते तसले (!) चित्र मिळते. ही बातमी सर्वत्र प्रसिद्ध होते. तोपर्यंत आपली तरुणी म्हातारी झालेली असते. ती आपल्या नातीला सांगते, ‘मी हे गुपित तुझ्या आजोबांनाही सांगितले नव्हते. बायकांचे मन महासागरासारखे खोल असते.’ मी काही पाणबुडय़ा नव्हे म्हणून पन्नास टक्के लोकसंख्या मला बादच आहे. मी आहे सर्जन. सर्जनशील नसणार. शरीर बधिर करून त्यावर चाकू चालवणे हे माझे काम. माझेच मन एकदा एका अतिवाईट मृत्यूमुळे बेजार झाले तेव्हा मन बधिर करण्यासाठी मी ज्ञानेश्वरीत डोके खुपसले तर परिणाम उलटाच झाला. त्यातल्या भाषेने मन मोहरून उठले. अर्थात ज्ञानेश्वरांच्याच उक्तीप्रमाणे अध्यात्माचा स्पर्श थोडय़ांनाच होईल, बाकी भाषेने मोहित होऊन थांबतील हेच खरे ठरले. माझी गाडी भाषेच्या सायडिंगलाच पडली आहे. तसा मी प्लास्टिक सर्जनही, परंतु हौस म्हणून काही तरी करून घेण्यास आलेल्यांना मी न कळलेले तत्त्वज्ञान सांगतो आणि चरबी काढण्याचा लिटरमध्ये भाव काय, असे विचारणाऱ्यांना तुमच्या डोक्यामधली चरबी कमी करा, अशी दुरुत्तरे देतो म्हणून काम बेताचेच आहे. हे खरे की माझ्या वैज्ञानिक कामाचा मोठा गवगवा झाला; परंतु तेही अचानकच घडले. एका मित्राच्या अग्रहामुळे एका परिषदेत मी एक निबंध वाचला. वेळ होती सकाळी ७.३०. आदल्या रात्रीची त्या परिषदेची मेजवानी आणि तीर्थप्राशन पहाटे संपल्यामुळे सभागृहात होते लोक फक्त पाच. त्यातला एक होता फिरंगी. तो होता लंडनमधल्या पाठय़पुस्तकाचा संपादक. त्या पठ्ठय़ाने प्रभावित होऊन ती माझ्या ऑपरेशनची पद्धत एकदम त्या मातबर पुस्तकातच छापून टाकली आणि माझे रॉकेट उडाले ते ग्लायडरसारखे अजून घिरटय़ा घालत आहे. मुंबईमधली माझी ओळख व्हायला लंडनहून बातमी यावी लागली तेव्हा मी तसा परप्रकाशितच. हा परप्रकाशित काजवा लुकलुकेन असे म्हणतो आहे. वाचकांनी मला संभाळून घ्यावे अशी विनंती करतो.
rlthatte@gmail.com
कुतूहल :शेतीविषयक सदराचे वर्ष
मध्यंतरी दूरचित्रवाणीवर ‘मधली सुट्टी’ हा कार्यक्रम पाहिला. त्यात एक छान वाक्य ऐकायला मिळाले. ‘जर शेतकऱ्यांनी धान्य पिकवले नसते तर शाळेत मधली सुट्टीच झाली नसती.’ गेली सात वष्रे मराठी विज्ञान परिषद दै. ‘लोकसत्ता’मध्ये ‘कुतूहल’ सदर चालवीत आहे. त्यात आत्तापर्यंत अनुक्रमे वैज्ञानिक संकल्पना, घरगुती उपकरणातील विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, सुरक्षितता या विषयांचा समावेश होता. या वर्षीचा विषय आहे ‘शेती’.
माणूस शेती करायला लागून आठ ते दहा हजार वष्रे होऊन गेली. त्यापूर्वी तो प्राण्यांची शिकार करून त्यावर आपली गुजराण करीत असे. तसे प्राणी आणि पक्षीही आपापली गुजराण लहान लहान प्राण्यांवर, पक्ष्यांवर, कीटकांवर व फळांवर करीत असतात. पण मनुष्यप्राण्याला एवढय़ासाठीच बुद्धिमान म्हणावयाचे की, आपण शेती करावी आणि धान्याची साठवण करून आपल्या अन्नाचा प्रश्न काही काळासाठी सोडवावा, ही कल्पना त्यालाच सुचली. आपल्या निरीक्षणातून त्याने पाहिले की, दरवर्षी पाऊस पडतो, नंतर फळे, फुले, धान्य उगवते. मग थोडी मेहनत घेतली तर आपण स्वत:च आपलं अन्न पिकवू शकू. एकदा सुरुवात केल्यानंतर मग येणाऱ्या अनुभवांच्या जोरावर मनुष्य शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत गेला.
शेतीसाठी योग्य जमीन, त्याची मशागत, पाऊस जास्त झाला तर जास्तीचे पाणी काढून टाकणे, हवी ती पिके काढणे, बियाणे पुढच्या वर्षीसाठी शिल्लकठेवणे, पिकांची मशागत करणे, पीक तयार झाल्यावर त्याची नीट साठवण करणे, पिकांवरच्या रोगांसाठी औषधे शोधणे, वेगवेगळी खते बनवणे, तयार धान्य, डाळी, फळे जास्त काळ कसे टिकवता येईल यावरच्या पद्धती शोधणे, कोण शेतकरी नावीन्यपूर्ण काम करतो त्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचवणे, शेतीचे उत्तम शिक्षण मिळावे म्हणून शेतकी शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठे काढणे, शेतीवर संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन देणे व त्यासाठी संस्था काढणे, शेतीविषयक मासिके, पुस्तके या सगळ्या गोष्टींची माहिती यंदाच्या वर्षी या सदरातून देण्यात येईल, तीही प्रश्नोत्तराच्या स्वरूपात.
अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई-२२
office@mavipamumbai.org
वॉर अँड पीस : अनारोग्याशी आयुर्वेदाचा लढा
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
फार फार वर्षांपूर्वी थोर जगमान्य लेखक लिओ टॉलस्टॉय यांची ‘वॉर अँड पीस’ ही कादंबरी वाचली. ती कादंबरी म्हणजे रशियन जीवनाची विशाल, अतिविशाल गंगा, ब्रह्मपुत्राच वाटते. वाटेत असंख्य गावे, शेते, डोंगर, लाखो माणसे भेटत असतात. मला वाटते, आपला जीवनाचा प्रवास ‘वॉर अँड पीस’ कादंबरीसारखा किंवा गंगौघासारखा आहे. आपले जीवन अनाकलनीय आहे, विस्तृत आहे, विशाल आहे. आपल्या आयुष्याच्या काळात दर क्षणात काहीतरी घडत असते, सतत बदल होत असतो. खाणे, पिणे, आहारविहार, व्यायाम, करमणूक, व्यसन, उपभोग, खेळ, आवडीनिवडी, प्रवास, आशानिराशा, श्रीमंती, गरिबी, चिंता, अत्यानंद अशा एक ना अनेक घटना आपल्या शरीर, मन व अचिंतनीय अशा आत्म्यावर काही ना काही परिणाम घडवत असतात. शरीरातील वात, पित्त व कफ ही मूलतत्त्वे जर त्यांच्या योग्य परिमाणात स्वत:चे प्राकृत गुण राखून राहिली तर आपल्या शरीरास स्वास्थ आहे असे समजावे. पण दैनंदिन जीवनसंघर्षांत या दोषांचे व त्यांच्यावर अवलंबून असणारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र तसेच पुरीष, मूत्र व स्वेद या मलांच्या प्राकृत स्वरूपात फरक पडतो. साम्यावस्था बिघडते. रोग निर्माण होतो. आयुर्वेदीय तत्त्वज्ञानाने या रोगांचा शोध घेण्याकरिता विविध मार्ग सांगितले आहेत. रोगांचे मूळ, आताचे स्वरूप व भावी होऊ घातलेला त्रास यांची निश्चिती करण्याकरिता रोगावस्था, संबंधित व्याधी, स्त्रोतसे, संबंधित अवयव यांचाही सम्यक विचार करावा लागतो. ‘वॉर अँड पीस’ कादंबरीसारखे आपल्या शरीरात काही त्रास, दु:ख, पीडा येतात, जातात, काही बराच काळ राहतात. काही केव्हाच निघून जातात, तेच कळत नाही. काही पीडा, काही न करता आपोआप नाहीशा होतात. काही रोग भगीरथ प्रयत्न करूनही हटत नाहीत, उलट अनेक आणखी रोगांना जन्म देतात.
आजचे महाराष्ट्रसारस्वत
संजय वझरेकर
१८८८ प्राणी व वनस्पती शास्त्र या विषयांवरील लेखक डॉ. विष्णु नारायण गोखले यांचा जन्म. पशु-पक्षी, वनस्पती यांबद्दल त्यांनी ग्रंथलेखन केले तसेच त्या वेळच्या ‘सृष्टिज्ञान’ मासिकाचे ते लेखक होते.
१९०९ बालसाहित्यिक, अनुवादक विश्वनाथ कृष्ण श्रोत्रीय यांचा जन्म. कुमारवयीन मुलांसाठी ‘दहा धाडसी कुमार’ तसेच ‘खूप खूप पैसा’, ‘मुलांची रंगभूमी’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली.
१९४८ कथाकार, कादंबरीकार व कवी नामदेव चंद्रभान कांबळे यांचा जन्म. ‘राघववेळ’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार (सन १९९५ करिता) मिळाला आहे.
१९७४ कादंबरीकार, लघुनिबंधकार, समीक्षक प्रा. विश्वनाथ पांडुरंग दांडेकर यांचे निधन. ‘मराठी नाटय़सृष्टी (पौराणिक / सामाजिक) ’ या दोन खंडांच्या ग्रंथातून त्यांनी एकूण ४२८ नाटकांचा त्रोटक परिचय करून दिला आहे.
१९७५ किलरेस्कर, स्त्री व मनोहर मासिकांचे संपादक तसेच ‘शंवाकीय’चे लेखक शंकर वासुदेव किलरेस्कर यांचे निधन.