रविन मायदेव थत्ते
मी एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात पुरुष म्हणून पुण्यात जन्मलो. धड ना श्रीमंत ना गरीब. सुदैवाने मी उपेक्षित, शोषित किंवा अशिक्षित नाही. संकुचित असण्याचा संभव जास्त. टायटॅनिक चित्रपटात त्या बोटीवर एक वागदत्त वधू आणि तिचा होणारा वर सहप्रवास करतात. तिला हा वर किंवा नर बिलकुल पसंत नसतो. ‘इतके चांगले स्थळ आहे. तुझा फाजीलपणा बंद कर’ असे तिची आई तिला बजावते. ही दिवाणी होते. तेव्हा तिला एक धीट परंतु बेवफा चित्रकार तरुण भेटतो. हा तिला प्रेम म्हणजे काय व ते कसे करायचे ह्य़ाचे धडे देतो आणि धुंद वातावरणात तिचे एक तसले (!) चित्र काढतो. बोट बुडते हा तिला वाचवतो स्वत: बुडतो. साठ-सत्तर वर्षांनंतर ही बोट सापडते. त्याच्यात तिचे ते तसले (!) चित्र मिळते. ही बातमी सर्वत्र प्रसिद्ध होते. तोपर्यंत आपली तरुणी म्हातारी झालेली असते. ती आपल्या नातीला सांगते, ‘मी हे गुपित तुझ्या आजोबांनाही सांगितले नव्हते. बायकांचे मन महासागरासारखे खोल असते.’ मी काही पाणबुडय़ा नव्हे म्हणून पन्नास टक्के लोकसंख्या मला बादच आहे. मी आहे सर्जन. सर्जनशील नसणार. शरीर बधिर करून त्यावर चाकू चालवणे हे माझे काम. माझेच मन एकदा एका अतिवाईट मृत्यूमुळे बेजार झाले तेव्हा मन बधिर करण्यासाठी मी ज्ञानेश्वरीत डोके खुपसले तर परिणाम उलटाच झाला. त्यातल्या भाषेने मन मोहरून उठले. अर्थात ज्ञानेश्वरांच्याच उक्तीप्रमाणे अध्यात्माचा स्पर्श थोडय़ांनाच होईल, बाकी भाषेने मोहित होऊन थांबतील हेच खरे ठरले. माझी गाडी भाषेच्या सायडिंगलाच पडली आहे. तसा मी प्लास्टिक सर्जनही, परंतु हौस म्हणून काही तरी करून घेण्यास आलेल्यांना मी न कळलेले तत्त्वज्ञान सांगतो आणि चरबी काढण्याचा लिटरमध्ये भाव काय, असे विचारणाऱ्यांना तुमच्या डोक्यामधली चरबी कमी करा, अशी दुरुत्तरे देतो म्हणून काम बेताचेच आहे. हे खरे की माझ्या वैज्ञानिक कामाचा मोठा गवगवा झाला; परंतु तेही अचानकच घडले. एका मित्राच्या अग्रहामुळे एका परिषदेत मी एक निबंध वाचला. वेळ होती सकाळी ७.३०. आदल्या रात्रीची त्या परिषदेची मेजवानी आणि तीर्थप्राशन पहाटे संपल्यामुळे सभागृहात होते लोक फक्त पाच. त्यातला एक होता फिरंगी. तो होता लंडनमधल्या पाठय़पुस्तकाचा संपादक. त्या पठ्ठय़ाने प्रभावित होऊन ती माझ्या ऑपरेशनची पद्धत एकदम त्या मातबर पुस्तकातच छापून टाकली आणि माझे रॉकेट उडाले ते ग्लायडरसारखे अजून घिरटय़ा घालत आहे. मुंबईमधली माझी ओळख व्हायला लंडनहून बातमी यावी लागली तेव्हा मी तसा परप्रकाशितच. हा परप्रकाशित काजवा लुकलुकेन असे म्हणतो आहे. वाचकांनी मला संभाळून घ्यावे अशी विनंती करतो.
rlthatte@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा