मध्य आशियातील उझबेकिस्तान या देशाच्या राजधानीचे शहर ताश्कंद, भूकंपप्रवण क्षेत्रात असून येथे अनेकदा मोठय़ा भूकंपांची नोंद झाली आहे. २६ एप्रिल १९६६ रोजी येथे झालेल्या ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपात येथील सुमारे तीन लाख रहिवासी बेघर झाले. साधारणत इ.स.पूर्व १८ व्या शतकात या प्रदेशातील चिर्चीक नदीकिनारी प्रथम मानवी वस्ती अस्तित्वात आली. इ.स.पूर्व पाचव्या ते तिसऱ्या शतकात या वस्तीला ‘छाच’ असे नाव पडले आणि या भागात आलेल्या तुर्की टोळ्यांनी त्याचे ‘छाचखंड’ केले. इ.स. पूर्व पाचव्या शतकात या प्रदेशात कुषाणांनी राज्य स्थापन केले. इ.स. सहाव्या-सातव्या शतकात या प्रदेशात तुर्की टोळ्या येऊन स्थायिक झाल्या. त्यांनी या वस्तीचे नाव ‘ताशकंद’ केले. तुर्की भाषेत ताश म्हणजे दगड. ताशकंद म्हणजे तुर्कीमध्ये दगडांचे शहर. आठव्या शतकात अरब मुस्लिमांनी ताश्कंदवर आपला अंमल बसवला आणि तेव्हापासून ताश्कंद इस्लाम धर्माच्या प्रभावाखाली आले. इ.स.१२१९ मध्ये मंगोलसम्राट चंगीझखान याने ताश्कंद शहर पूर्णपणे उद्ध्वस्त केले. त्या काळात चीन आणि पौर्वात्य देशांकडून युरोपात मसाल्याचे पदार्थ, रेशीम यांचा मोठा व्यापार चालत असे. या मालाचे तांडे ज्या ‘सिल्क रोड’वरून जात तो रस्ता ताश्कंदवरूनच जात असे, तसेच ताश्कंद हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र असल्यामुळे अल्पकाळातच ताश्कंद परत बांधले जाऊन भरभराटीला पोहोचले. १८६५ साली रशियन साम्राज्याचे ताश्कंदवर अधिराज्य प्रस्थापित केले. पुढे सोव्हिएत युनियनमध्ये सामील झाल्यावर १९२० ते १९३० च्या दशकात ताश्कंदचे मोठय़ा प्रमाणात औद्योगिकीकरण झाले. १९३० साली उझ्बेक साम्यवादी गणराज्याची राजधानी समरकंदहून ताश्कंदला हलवण्यात आली. दुसऱ्या महायुद्ध काळात पश्चिम रशियातले अनेक कारखाने ताश्कंद येथे हलविण्यात आल्यामुळे ताश्कंदचं महत्त्व वाढलं आहे. सोव्हिएत राजवटीने येथे अनेक वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी संशोधन संस्था स्थापन केल्या आहेत. १९९१ साली झालेल्या सोव्हिएत विघटनानंतर उझ्बेक प्रजासत्ताकाची राजधानी झालेल्या ताश्कंद शहराची लोकसंख्या सध्या २४ लाख आहे.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
वनस्पती क्षेत्रातील अभ्यासक्रम
उद्यानशास्त्र/ बागकामशास्त्र, फुलझाडांचे प्रेम, वृक्षांसंबंधीची आत्मीयता, परिसरामधील जैवविविधता, कीटकविश्व या आणि अशा विषयासंबंधीचे विविध अभ्यासक्रम मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील उर्वरित भागांत चालवले जातात. शनिवार, रविवार आणि प्रदीर्घ सुट्टीला जोडून असलेले हे अभ्यासक्रम सर्व वनस्पतीप्रेमींना उपलब्ध आहेत. माफक शुल्क, वयाची शिक्षणाची अट नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रात्याक्षिकांबरोबर उद्याने आणि हरितगृहांना प्रत्यक्ष भेटी त्यामुळे या अभ्यासक्रमांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. अशाच काही मोजक्या अभ्यासक्रमाची आज आपण येथे ओळख करून घेऊया.
मुंबई- पुणे जुन्या मार्गावर तळेगाव येथे उद्यान क्षेत्रामधील आठवडाभर मुदतीचे विविध अभ्यासक्रम चालवले जातात. यामध्ये हरितगृह उभारणी, हरितगृहांमधील फळे, फुले, भाजीपाला उत्पादन, बागकाम आणि रोपवाटिका यांचा समावेश आहे. संपर्क दूरध्वनी- ०२११४२२३९८०
मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरीत कलिना येथे बहि:शाल विभागातर्फे प्रतिवर्षी उद्यानकला लँडस्केप निर्मिती, ‘प्राणी आणि वनस्पती यांच्या शास्त्रीय नावांची ओळख’ हे दोन प्रमाणपत्रीय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
संपर्क- दूरध्वनी ०२२२६५३०२६६
मुंबईच्या फोर्ट परिसरात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी.एन.एच.एस.) या संस्थेतर्फे जैवविविधता क्षेत्रात एक वर्षांचा आणि दोन वर्षांचा क्षेत्रीय वनस्पती हा अभ्यासक्रम पत्राद्वारे चालवला जातो.
मुंबई येथील रुईया महाविद्यालयात सध्या भारत सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत हरितगृह व्यवस्थापन हा अभ्यासक्रम चालवला जातो. याला विद्यापीठ अनुदान मंडळ आणि मुंबई विद्यापीठाची मान्यता आहे. प्रतिवर्षी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. विद्यार्थाना प्रमाणपत्र, पदविका अथवा पदवी प्राप्त होते. संपर्क : www.principal@ruicollege.edu दूरध्वनी – ०२२२४१४३११९ ठाणे येथे ‘फर्न’ या संस्थेतर्फे ‘क्षेत्रीय वनस्पती’ हा तीन महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच सहा व्याख्यानांपर्यंतचे मर्यादित असलेले ‘फुलपाखरू उद्यान’ आणि ‘घरामधील आरोग्य बाग’ हे अभ्यासक्रम सध्या लोकप्रिय आहेत.
संपर्क- seema@fern.in दूरध्वनी -९७५७२८५८६८ पुण्यामधील ‘आघारकर अनुसंधान संस्थान’ येथेसुद्धा उद्यानशास्त्रामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेतला जातो. संपर्क : director@airpune.org दूरध्वनी -०२० २५३२५००० वनस्पतीबद्दल प्रेम आणि आदराची भावना असणाऱ्या लोकांची ज्ञानाची भूक शमविण्याचे हे काही अनोखे उपक्रम निश्चितच दाद देणारे आहेत.
– डॉ. नागेश टेकाळे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org