मित्रा, प्लीज विश्वास ठेव, ट्रस्ट मी. इथल्या चेहऱ्यांकडे नीट पाहा. ते चेहरे कोणत्या भावना व्यक्त करतात? याचा अंदाज घे. माझी खात्री आहे की, तुझी उत्तरं १००% बरोबर येतील.
जगातली काही चित्रं आयकॉनिक- प्रातिनिधिक होतात. चित्र पाहताक्षणी त्यातला संदर्भ आणि संदेश लगेच लक्षात येतो. मानसशास्त्राच्या पाठय़पुस्तकातून आणि भावभावनांच्या संशोधनपर लेख आणि पुस्तकातून हे चित्र हमखास दिसतं.
पॉल एकमन या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने ६५-६६ साली ‘मानवी भावनांची चेहऱ्यावरील अभिव्यक्ती’ या विषयावर संशोधन सुरू केले. थांब, या संशोधनावर अतरंगीपणाचा शिक्का मारू नकोस. मानववंशाच्या उत्क्रांतीवर चार्ल्स डार्विननं पाहणी करून अनेक ग्रंथ लिहिले. त्यानं मानवी भावनांची चेहऱ्यावरील अभिव्यक्ती याचा इतर प्राण्यांच्या भावनिक व्यक्तीकरणाशी तुलना करणारा ग्रंथ लिहिला. त्यात युरोप खंडातील माणसं भावनिक अभिव्यक्तीमध्ये इतर मानवी वंशाच्या (उदा. आफ्रिकन, स्लाव्हिक इ.) पेक्षा अधिक उत्क्रांत आहेत, असा पूर्वग्रहाधिष्ठित दावा केला. यावर, त्या काळी फार टीका, समालोचना झाली नाही; परंतु शंभर वर्षांनंतर पॉल एकमन यांना हे विधान पटलं नाही. त्यांनी भावना अभिव्यक्त करणाऱ्या मानवी चेहऱ्यांची हजारो छायाचित्रं लाखो अमेरिकन नागरिकांना दाखविली, त्यामधील सर्वसामान्यपणे सर्वाचं एकमत होणाऱ्या सहा भावनिक अभिव्यक्तींचं हे चित्र आहे. राग, आश्चर्य, दु:ख, आनंद, भीती आणि तिरस्कार (डिसगस्ट) या भावनांची चेहऱ्यावरील अभिव्यक्ती सर्व जनता अचूकपणे ओळखू शकली. म्हणजे एकमेकांच्या भावना ओळखू शकणं ही क्षमता मानवी मेंदूच्या संरचनेत आणि कार्यप्रणाली यामध्ये सर्वत्र सारखी अंतर्भूत (एम्बेडेड) आहे. कोणत्याही वंशातल्या , अखिल मानव जातीच्या भावना-अभिव्यक्ती समान असतात. इंद्रधनुष्याचे ज्याप्रमाणे सात रंग, त्याप्रमाणे या सहा भावना मूलभूत (बेसिक) ओळखण्यासाठी मानल्या जातात. प्रत्यक्षात या सहा भावनांच्या लाखो छटा एकमेकांत मिसळून चेहऱ्यावर अभिव्यक्त होतात. अशा संमिश्र भावना सर्वाना ओळखता येतात असं नाही. हेही खरं.
पॉल एकमन यांनी १९६७ मध्ये, पपुआ बेटावरील पाषाणयुगीन जमातीचा शोध घेतला. (त्यांच्या मते भावनिक आविष्कारावर द्रष्टा माध्यमांचा प्रचंड प्रभाव असतो.) आणि तिथेही याच भावनांच्या अभिव्यक्तीची छायाचित्र फिल्म घेतली आणि भावनिक आविष्कृतीच्या सिद्धांतावर जागतिक पातळीवर शिक्कामोर्तब झाले. हा सर्व खटाटोप किंवा मूलभूत संशोधनाचे उपयोजन पुढे मानवी चेहरा खोटय़ा भावना कशा प्रकारे अभिव्यक्त करतो? म्हणजे तो खोटं खोटं हसतो, रडतो हे कसं ओळखायचं? एखादा साक्षीदार खोटं बोलतोय, हे चेहऱ्यावरून कसं ओळखायचं इकडे वळलं. राजकीय पुढाऱ्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा खोटारडेपणा कसा ओळखायचा यावर मानसशास्त्रानं संशोधन केलंय. एकमन यांचं चित्र गाजलं ते या कारणानं. आपल्याकडे मात्र मानसशास्त्र म्हणजे वेडय़ा लोकांचा लाडावलेला अभ्यास असं वाटतं!
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
कुतूहल : ‘टय़ूमर मार्कर’
टय़ूमर शोधण्यासाठी कोणत्याही विशिष्ट रसायनांचा वापर केला जात नाही. पण ज्या पदार्थाचा उपयोग होतो, त्यांना ‘टय़ूमर मार्कर’ म्हणतात. हे मार्कर्स कॅन्सर झाल्यामुळे किंवा कॅन्सर अथवा निरुपद्रवी टय़ूमरला प्रतिसाद म्हणून शरीरातील पेशीतच तयार होतात. साधारण पेशी तसेच कॅन्सरच्या पेशी हे टय़ूमर मार्कर्स बनवितात. फरक एवढाच की कॅन्सर झाला असल्यास मार्कर्सचं प्रमाण खूप जास्त असतं. हे मार्कर्स रुग्णाच्या रक्त, मलमूत्र, शरीरातील इतर द्रव किंवा ऊतीत आढळून येतात. बहुतेक टय़ूमर मार्कर्स ही प्रथिनेच (प्रोटिन) असतात. तथापि, हल्ली, जनुकातील किंवा डीएनएमधील बदलांचाही टय़ूमर मार्कर म्हणून वापर केला जातो.
आजपर्यंत २० हून अधिक टय़ूमर मार्कर्स प्रचलित आहेत. काही मार्कर्स एकाच प्रकारच्या तर काही दोन किंवा अधिक प्रकारच्या कॅन्सरशी निगडित असतात. अजून असा कोणताही ‘वैश्विक’ टय़ूमर मार्कर उपलब्ध नाही, जो कोणत्याही प्रकारचा कॅन्सर शोधू शकेल. टय़ूमर मार्करचा वापर करण्यातही काही मर्यादा आहेत. काही वेळा असे दिसून आले आहे की कॅन्सर नसतानाही विशिष्ट टय़ूमर मार्करच्या पातळीत वाढ होते; तर याउलट कॅन्सर झालेला असूनही विशिष्ट टय़ूमर मार्करमध्ये वाढ दिसून येईलच असे नाही.
टय़ूमर मार्कर्सचा उपयोग कॅन्सर शोधण्याकरिता, तसेच रोगनिदान करण्याकरिता होतो. पण फक्त याच चाचणीवर अवलंबून राहू नये तर बायॉप्सी, सीटीस्कॅन या दुसऱ्या चाचण्याही याबरोबर कराव्यात. कॅन्सरच्या उपचाराला सुरुवात करण्यापूर्वी मार्कर्सची चाचणी केल्यास डॉक्टरांना पुढील उपाययोजना ठरविता येते. तसेच काही कॅन्सरमध्ये मार्कर्सच्या पातळीवरून कॅन्सर कोणत्या ‘स्टेज’ला पोचला आहे किंवा त्यातील चढ-उतार समजण्यास मदत होते. कॅन्सरचे उपचार पूर्ण झाल्यानंतरही मार्कर्सच्या चाचणीवरून प्रादुर्भाव झाला आहे का, हे समजते.
वेगवेगळय़ा प्रकारचे मार्कर्स असतात, उदा.(१) कॅल्सिटोनिन मार्कर, रक्ताचा नमुना, मेडय़ुलरी थायरॉइड कॅन्सर, (२) फायब्रिनोजेन मार्कर, लघवीचा नमुना, मूत्राशयाचा कॅन्सर (३) युरोकानेज प्लास्मिनोजन अॅक्टिव्हेटर आणि प्लास्मिनोजेन अॅक्टिव्हेटर, इन्हिबिटर मार्कर, टय़ूमरचा नमुना, ब्रेस्ट कॅन्सर.
एवढं खरं की, कॅन्सरची लागण होण्यापूर्वीच किंवा सुरुवात होण्यापूर्वीच तो शोधून काढणं शक्य झालेलं नाही.
डॉ. नंदा सं. हरम (पुणे) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई – office@mavipamumbai.org
प्रबोधन पर्व – लोकशाहीची बूझ आणि समाजसत्तेचा दुरुपयोग
‘‘सद्गुणावर विसंबून कार्य करण्याऐवजी सत्तेच्या जोरावर तें घडवून आणण्याची प्रवृत्ति निर्माण झाली म्हणजे समाजाच्या स्वास्थ्यास ओहोट लागला असें समजावें. तीच परिस्थिति आज विद्यमान आहे. कोणत्याहि क्षेत्रांत वर बसणारीं माणसें तीं विशिष्ट स्थानापन्न आहेत म्हणून त्यांना महत्त्व प्राप्त झालेलें आहे, तीं सुयोग्य आहेत म्हणून नव्हे. या माणसांना त्यांचें स्थान शेअरबाजारासारख्या उलाढाली करून प्राप्त झालेलें असतें, निढळाच्या घामाचा उद्योग करून नव्हे. सट्टे करून श्रीमंत झालेल्या माणसालाहि लोक श्रीमंतच म्हणतात व समाजांतील त्याच्या महत्त्वास त्या त्या मार्गामुळें मुळींच बट्टा लागतांना दिसत नाहीं. निवडणूक नामक लोकशाहीचा जो विशेष आहे त्याचें खरें स्वरूप काय असतें हें आतां पोरांनाहि कळावयास लागलें आहे.. अशी वृत्ति ज्या समाजांतील लोकांत नांदत आहे तेथें खऱ्या लोकशाहीची बूझ काय? ही स्थिति राजकीय, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, सर्वच क्षेत्रांत सारखी विद्यमान आहे.’’ वर्तमान महाराष्ट्रालाही लागू पडणारे हे त्र्यं. शं. शेजवलकर यांचे विचार आजचे नाहीत, ते १९४०च्या सुमारासचे आहेत. ते पुढे म्हणतात –
‘‘समाजहितसाधक पुरुष वर आणण्याऐवजीं त्यांना ठेंचून जमिनींत गाडण्याकडेच आज समाजसत्तेचा दुरुपयोग होतांना दिसतो. आजची नवी पिढी या दुरुपयोगाच्या तंत्रांतच तरबेज होत आहे असें दिसतें! विनोदाचें रूपांतर हलकट टवाळींत, टीकेचें रूपांतर अन्याय्य विडंबनांत, सत्यान्वेषाचें रूपांतर असत्यपूर्ण बदनामींत, मोठय़ा प्रमाणावर होतांना दिसत आहे. या टवाळीला भिवून, विडंबनानें हृदयविदारण होवून, बदनामीला बिचकून जावून, अनेकांनीं आपलीं कार्यक्षेत्रें सोडलीं आहेत. धर्मयुद्धाची शक्यता नाही म्हणून समरांगणाला पाठ दाखवून भागूबाईचा शिक्का सहन करीत निघून जाण्याची पाळी भल्याभल्यांवर आली आहे. साहित्यिकांनीं, लेखकांनी, टीकाकारांनीं, असले धंदे चालवून उदरंभरण करावें, समाजाला अनिष्ट वळण लावावें, निर्मळ नव्या पिढीचीं मतें गढूळ करावीं, याहून वाईट स्थिति कोणती?’’