प्रा. चिन्मय थिटे
रत्नांनी मानवी जीवनात एक अनोखे स्थान निर्माण केले आहे. रत्नांची झळाळी तर मनाला भावतेच, पण त्यांचा आकर्षकपणा आणखी वाढतो तो त्यांच्या मोहक रंगछटांनी. कोणत्याही पदार्थावर पांढरा प्रकाश पडतो तो विविध रंगांनी मिळून बनलेला असतो. वस्तूचे जे प्रकाशीय गुणधर्म (ऑप्टिकल प्रॉपर्टीज) असतात त्यानुसार वस्तूवर पडलेल्या पांढऱ्या रंगातील विविध रंग ती वस्तू शोषून घेते आणि एखादा रंग परावर्तित करते. उदा., पिकलेला टोमॅटो बाकी सर्व रंग शोषून घेतो आणि फक्त लाल रंग परावर्तित करतो, म्हणून त्याचा रंग लाल दिसतो.

रत्नखनिजांना विशिष्ट रंग येतो तो त्यांचे रासायनिक संघटन काय आहे त्यावरून. म्हणजेच, रत्नखनिजाच्या रेणूंमध्ये कोणते मूलद्रव्य आहे, यावरून रत्न कोणते रंग शोषून घेईल आणि नक्की कोणता रंग परावर्तित करेल ते ठरते. उदा. गार्नेट नावाच्या खनिजात लोह असल्याने गार्नेटला लाल रंग प्राप्त होतो. क्रोमियम, मँगेनीज, तांबे अशी काही मूलद्रव्ये रत्नांना रंग देण्यात जास्त सक्षम असतात.

विविध पाषाणांमध्ये खनिजांची निर्मिती होते ती नैसर्गिक प्रक्रियांनी. त्यामुळे रत्नाचा प्रत्येक स्फटिक तयार होताना तो रासायनिकदृष्ट्या शुद्ध असेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे त्या खनिजांमध्ये काही इतर धातूंचे अणू अत्यल्प प्रमाणात येऊ शकतात. खनिज वैज्ञानिक अशा पाहुण्या धातूला ‘अशुद्धी’ (इंप्युरिटी) म्हणतात. पण त्यांच्या अस्तित्वामुळे रत्नाच्या मूळ रंगात फरक पडतो आणि एक वेगळेच रत्न उदयाला येते.

कुरुवंद (कोरंडम) हे खनिज म्हणजे अॅल्युमिनियमचे ऑक्साइड होय. अतिशय शुद्ध स्वरूपात ते क्वचितच आढळते. पण कुरुवंदाच्या काही स्फटिकांमध्ये अॅल्युमिनियमच्या काही अणूंची जागा कधी कधी क्रोमियमचे अणू घेतात. मग कुरुवंदाचा रंग लाल होतो. त्या कुरुवंदाला आपण माणिक (रुबी) म्हणतो. तर काही स्फटिकांमध्ये अॅल्युमिनियमच्या काही अणूंची जागा लोहाचे अणू घेतात. त्यामुळे कुरुवंदाचा रंग निळा होतो. त्या कुरुवंदाला आपण नीलम (सफायर) म्हणतो.

त्याचप्रमाणे, जर वैदूर्य (बेरील) नावाच्या रत्नखनिजात क्रोमियम या धातूचे अणू अशुद्धीच्या रूपात आले, तर त्याला हिरवा रंग येतो आणि त्या वैदूर्याला आपण पाचू (एमराल्ड) म्हणतो. जर क्रोमियम या धातूचे अणू क्रायसोबेरील नावाच्या खनिजाच्या स्फटिकामध्ये अशुद्धीच्या रूपात आले, तर त्याला आपण अॅलेक्झांड्राइट म्हणतो. अॅलेक्झांड्राइटचे वैशिष्ट्य असे आहे, की ते दिवसा हिरवट आणि रात्री लालसर दिसते. म्हणून त्यांचे वर्णन ‘दिवसा पाचू आणि रात्री माणिक’ असे केले जाते.

प्रा. चिन्मय थिटे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader