दरवर्षी विविध आजारांमुळे १८ टक्के गाई बळी पडतात. गाईंना कासदाह (मस्टायटीस), बुळकांडय़ा, लाळ्याखुरकत, थायलेरियासीस, तीवा, पोटफुगी, हगवण या प्रमुख आजारांबरोबरच फऱ्या, घटसर्प, क्षयरोग यांसारखेही आजार होतात. तसेच गर्भपात होणे, जार व्यवस्थित न पडणे, गाई वारंवार उलटणे यांसारख्या व्याधी गाईंच्या जननेंद्रियातील विकारांमुळे होतात.
गाईंमध्ये कासदाह या आजाराचे प्रमाण जास्त आहे. गोठय़ातील अस्वच्छता, बसण्यासाठी ओलसर जागा, शेण-गोमूत्राने भरलेली खडबडीत जागा यामुळे कासेला तसेच सडांना इजा होऊन जीवाणूंचा संसर्ग होतो व स्तनदाह होतो. पारंपरिक गोठा पद्धतीमध्ये कासदाहाचे प्रमाण मुक्त संचार गोठा पद्धतीपेक्षा जास्त असते. स्तनदाहमुळे दुग्धोत्पादन व्यवसायाचे मोठे नुकसान होते. लाळ्याखुरकत रोग थंडीच्या हंगामामध्ये होतो. यामुळे जनावराचे चारा खाणे बंद होते व त्याला अशक्तपणा येतो. हा आजार एका जनावराकडून दुसऱ्या जनावरापर्यंत लगेच पोहोचतो. गायीचे तापमान १०३ ते १०४ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त असते. जिभेला, गळ्याला तसेच खुरांना फोड फुटून तेथे लाल चट्टे पडतात. जनावरांना चालणे, खाणे-पिणे कठीण होते. यासाठी दरवर्षी थंडीपूर्वी प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
गाईंना गोचीड, पिसवा, माशा, ढेकूण, डास व इतर किडय़ांमुळे गोचीड ताप (थायलेरियासीस), मेंदूज्वर, हिवताप तसेच इतरही आजार होतात. म्हणून या बाह्य़ कीटकांचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. मुक्त संचार पद्धतीमध्ये या कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. मुक्त गोठय़ात ओलावा कमी होऊन माश्यांचे प्रमाण कमी होते. जनावरांना एक-दोन आठवडे सतत ताप येत असणे तसेच खाण्याचे प्रमाण कमी होणे ही गोचीड तापाची लक्षणे आहेत. गाईला तीवा झाल्यानंतरही जास्त ताप येतो. तिचे खाणे-पिणे मंदावते. गाई थरथर कापतात. मान, पाठ, पायांचे स्नायू आकुंचित झाल्यामुळे गाय लंगडते. हा आजार डासांमुळे होत असल्यामुळे डासांचे वेळीच नियंत्रण करायला हवे. बुळकांडी आजारही गाईला अपचनामुळे होतो. यासाठी पावसाळ्यापूर्वी गाईंना लस टोचून घ्यावी. मुक्त संचार पद्धतीने गोपालन केल्यास गाईंचे आजार कमी होऊन उपचारांवरील खर्चात बचत होते.
जे देखे रवी.. – संगणक
विज्ञानाबद्दल लंबेचौडे लिहिणे आणि विज्ञानाचा हल्लीचा शिरोमणी म्हणजेच संगणक स्वत: वापरणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. माझे काही संगणकाशी जमत नाही. त्यातला तो उंदीर की mouse माझ्या हुकुमाची जवळजवळ कधीच अंमलबजावणी करत नाही. संगणकात दिव्याला कणभर उशीरच होतो. मग एक निर्थक मंजूळ ध्वनी निघतो नंतर काहीतरी पट्टी येते मग अक्षरे येतात त्याला परवलीचा शब्द वगैरे लागतो. इथे येऊ नका तिथे जाऊ नका असले आदेश येतात. काही कारण नसताना किंवा कारण न कळता हा computer सुरू होऊ शकतो. वीजप्रवाहात थोडा जरी बदल झाला तरी हा एकदम उडतो. याची काळजी घ्यावी लागते. याच्यासाठी मधून मधून मौल्यवान भाग खरेदी करावे लागतात. याला सतत आवरण घालावे लागते. याच्या सतत सुधारून वाढवलेल्या आवृत्त्या येतात. त्यांचे आकार बदलतात. यांची फक्त दोन वर्षांची गॅरंटी किंवा वॉरंटी असते. नंतर हे आपल्या कायमचे पदरात पडतात आणि जुने झाले तर यांना विकता येत नाही.
वरच्या वर्णनावरून हा स्त्रीलिंगी असावा असे म्हणताच माझी बायको भडकली. ही फारशी स्त्रीवादी किंवा Feminist नाही तरी भडकली. हा काळाचा परिणाम. मी तिला बायको (पत्नी?) म्हणू शकतो हेच नशीब.
परवा कोणीतरी म्हणाले, अहो, हल्ली संगणकात इतके काही apps असतात. त्यातले दहा टक्केसुद्धा आपल्याला माहीत नसतात.
मी निवृत्त होत होतो तेव्हा आमच्या विभागात संगणक आला. त्यातल्या फारच थोडय़ा गोष्टींची माझ्या शुभा नावाच्या सेक्रेटरीला जाण होती. मी तिला एक गोष्ट सांगितली. एक होते जोडपे त्यांचे झाले लग्न. दक्षिणेत मधुचंद्र ठरला. आगगाडीने जाणार म्हणून कूपे घेतला. पण आयत्या वेळी कूपे मिळाला नाही, Sleeper ने सगळ्यांसमोर प्रवास. तेव्हा कन्याकुमारी येईपर्यंत ही कन्या कुमारीच राहिली. माझी सेक्रेटरी दिलखुलास हसली आणि म्हणाली तुम्हा पुरुषांना आम्ही कळतो कुठे? तुम्ही वरवरच बघता म्हणूनही ‘वर’ हा शब्द आला असेल कदाचित.
स्त्रीपुरुषामधला अदिबंध ज्ञानेश्वरांनी सांगितला आहे.
ओवी म्हणते:
म्हणौनि गा अर्जुना। जैसी सकामा न जिणवे वनिता।
तैसी मायामय ही सरिता। नटके जीवा ।।
‘जैसी सकामा न जिणवे वनिता’ याचा एक अर्थ आहे उद्दीपित झालेली स्त्री खऱ्या अर्थाने पुरुषाला जिंकता येत नाही आणि दुसरा अर्थ आहे कामुक पुरुष स्त्रीला जिंकू शकत नाही. दोन्ही स्थितीत पुरुषाचे ओमफस होते हेच खरे.
– रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – व्यसन वाईनचे
व्यसनमुक्तीकरिता लेखमाला लिहिताना शुक्रवार, २८ जूनच्या एका दैनिकातील ‘कर्नाटकात भाजीच्या दुकानात वाईन’ या मथळय़ाखालचे वृत्त वाचण्यात आले. कर्नाटकात द्राक्षाचे उत्पादन ३३० हजार टन असून, त्यापासून ३५ लाख लीटर वाईन तयार केली जाते. आता राज्य सरकार वाईनविक्री वाढविण्यासाठी हा अनोखा उपाय योजत आहे. पूर्व बंगळुरूमधील कॉक्सटाऊन आणि इंदिरानगर या मिश्र वसाहती आहेत. इलेक्ट्रॉनिक सिटी व व्हाईट फील्ड वसाहतीत भरगच्च पगार देणाऱ्या अनेक व्यावसायिक कंपन्या व लोकवसाहती आहेत. मोठमोठय़ा पगारदारांना ‘वाईनची चटक’ लावण्याचा अत्यंत बेशरम प्रकार ते सरकार करणार आहे.
मागल्या वर्षी महाराष्ट्रातील एक थोर राजकीय पुढारी, केंद्रातील बडे मंत्री यांनीही महाराष्ट्रात छोटय़ा छोटय़ा किराणा दुकानांत वाईन ठेवता येईल का, याकरिता पडद्यामागून व उघडपणे खूप खटपटी केल्या होत्या. त्यांच्या ‘प्रामाणिक’ मताप्रमाणे ‘वाईन ही नशापदार्थात मोडत नाही.’ संबंधित लायसेन्स कायद्यात वाईनचा असलेला उल्लेख काढून टाकून त्याला मुक्त विक्रीची परवानगी मिळावी. संबंधित द्राक्षबागाईतदारांना चार पैसे मिळावे, थोर वाईन उत्पादक मित्रांना कायम खाण्याकरिता कुरण मिळावे, मग भले मराठी तरुण पिढीला मादक पदार्थाची चटक लागली तरी चालेल अशी ही चाल होती. सुदैवाने महाराष्ट्रात प्रचंड टीकाटिप्पणी जाहीरपणे झाली. प्रस्ताव बारगळला. असे असूनही महाराष्ट्र महिलांच्या दुर्दैवाच्या दृष्टीने बाब अशी, की एका खासदार महिलेनेही ‘तरुणांनी वाईन घेतली तर काय वावगे?’ अशी भाषा केली होती.
जगभर ड्रग्जमाफिया, कोकेन, हेरॉईन, अफू, मॉर्फिन, कोकापेस्ट, अॅड्रेनलीन, अॅम्फेटामाईन अशा नशेच्या पदार्थाची चटक तरुण पिढीला दिवसरात्र लावण्याची जीवघेणी स्पर्धा करत आहेत. नशेची सुरुवात तथाकथित सौम्य वाईनपासून सुरू झाली, तर ती तेवढय़ावर न थांबता आपली नवतरुण पिढी खलास करेल हे मी सांगावयास हवे का?
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – ७ ऑगस्ट
१८९० > मराठीसह अर्धमागधी, प्राकृत आणि संस्कृतचे जाणकार, महामहोपाध्याय काशिनाथ वासुदेव अभ्यंकर यांचा जन्म. ‘पातंजलीकृत व्याकरणमहाभाष्य’ या ग्रंथाच्या सात खंडांचे संपादन त्यांनी केले होते.
१९११> विज्ञानविषयक पुस्तकांचे लेखक नारायण वासुदेव कोगेकर यांचा जन्म. विज्ञानप्रसाराच्या हेतूने त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. शोधांच्या नवलकथा, अणुयुगाची पहाट, विश्वरचना, सूर्यशक्तीचा उपयोग अशा विषयांवर लिहिले. यापैकी काही विज्ञानकादंबऱ्याही आहेत.
१९२४> वेदांतशास्त्र आणि ज्ञानदेव- शंकराचार्य यांच्या साहित्याचे अभ्यासक व भाष्यकार बाळशास्त्री हुपरीकर यांचे निधन. त्यांच्या ग्रंथसंपदेत ‘श्रीज्ञानेश्वरविरचित अनुभवामृत- तात्पर्यबोधिनी’, विद्यारण्य व ज्ञानेश्वर यांच्या वेदांतावरील मतांचे तात्पर्य, ‘(हर्बर्ट) स्पेन्सर साहेबांचे अज्ञेयमीमांसा व आर्यवेदांत’, ज्ञानयोगशास्त्र, शंकराचार्य व ज्ञानेश्वर आदी अभ्यासू ग्रंथांचा समावेश आहे.
१९७८> ख्यातनाम कृषीतज्ज्ञ पांडुरंग चिमणाजी पाटील यांचे निधन. विविध क्षेत्रांतील त्यांच्या अनुभवाचे ‘माझ्या आठवणी’ हे पुस्तक पठडीबाज आत्मचरित्रांपेक्षा निराळे आहे.
– संजय वझरेकर