आशिष महाबळ
कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकांपुरती मर्यादित न राहता सर्वसंचारी झाली आहे. फोन, घड्याळ्यांमधून तर आहेच, पण अनेक परिधान करण्याजोग्या छोट्या साधनांद्वारे आपले स्वास्थ्य संवर्धन आणि दैनंदिन व्यवस्थापन सोपे करते आहे. परिधानियांपाठोपाठ स्मार्ट कपडेही उपलब्ध होऊ लागले आहेत. फिटनेस लेगिंग्ज स्नायूंच्या हालचालींचा मागोवा घेतात, स्मार्ट मोजे धावण्याच्या गतीचे विश्लेषण करतात, तर स्मार्ट जॅकेट्स तापमान नियंत्रण आणि स्मार्टफोन जोडणी देतात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्मार्ट परिधानिय केवळ शारीरिक आरोग्यासाठी नाहीत. ते मानसिक स्वास्थ्यालाही हातभार लावू शकतात. आवाज आणि शारीरिक हालचालींचे विश्लेषण करून मूड ओळखणे, मानसिक ताण किंवा नैराश्य शोधणे शक्य आहे. इंटरनेट ऑफ थिंग्जमुळे या सर्व साधनांमध्ये सुसूत्रता साधता येते. दैनंदिन कार्ये आपोआप करण्यासाठी स्मार्ट घरगुती उपकरणे स्मार्ट परिधानियांशी संवाद साधू शकतात, आणि आरोग्यसेवा प्रदात्यांशी संवाद साधून आरोग्य विदेचे विश्लेषण सुलभ करतात. अशी जोडणी आपले जीवन अधिक कार्यक्षम करत आरोग्यदायी ठरते.

हेही वाचा : कुतूहल: स्मार्ट परिधानीय (स्मार्ट वेअरेबल्स)

स्मार्ट परिधानियांचे अनुभव वैयक्तिक असतात. तुमच्या प्राधान्यांप्रमाणे शिफारसी ही उपकरणे देतात. शिफारसींनुसार अनुकूल सवयी लावून घ्यायला ते मदत करतात. कालांतराने यामुळे कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. अर्थात ही उपकरणे नीट न वापरल्यास त्याचे वाईट सवयी आणि वाईट परिणामात रूपांतर कसे होऊ शकते याची अनेक उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसत असतात.

ही प्रगती आणि या सुखसोयी अनेक नैतिक प्रश्न बरोबर घेऊन येतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे याद्वारे जमा होत असलेल्या विदेच्या गोपनीयतेचा. वैयक्तिक आरोग्य विदेचे गैरवापरापासून संरक्षण झाले नाही तर त्यामुळे भेदभाव संभवतात. उदाहरणार्थ एखाद्या रोगाची लक्षणे असणाऱ्याला नोकरी न देणे. वापरकर्त्याचे हक्क आणि गोपनीयता राखण्यासाठी कायद्यांमध्ये योग्य ते बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

हेही वाचा : कुतूहल : बीएआरसी आणि टीआयएफआर

एक चिंतेचा विषय म्हणजे मागोवा घेणाऱ्या ट्रॅकिंग चिप्सचा परिधानिय म्हणून वापर, विशेषत: मुले किंवा स्मृतिभ्रंश असलेल्या वृद्ध व्यक्ती यांसारख्या असुरक्षित गटांसाठी अशी चिप परिधान करणारी व्यक्ती कुठे आहे हे या ट्रॅकिंगमुळे समजू शकते. यामुळे पालक जरी निर्धास्त झाले, तरी ती माहिती चुकीच्या हातात पडल्यास धोकेदेखील निर्माण होतात. फायदे आणि संभाव्य धोके यांच्यात संतुलन साधणे आणि या तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करणे महत्त्वाचे आहे.

आशिष महाबळ

मराठी विज्ञान परिषद

ईमेल – office@mavipa.org

संकेतस्थळ – http://www.mavipa.org