मातीच्या थरांत सापडणाऱ्या जीवाश्मांकडून पृथ्वीच्या इतिहासाबद्दल तसेच जैविक उत्क्रांतीबद्दल महत्त्वाची माहिती मिळते. इ.स.पूर्व चवथ्या शतकातील ग्रीक तत्त्ववेत्ता अॅरिस्टॉटल याने सागरतीरी जीवाश्म पाहिले होते; परंतु त्याला या जीवाश्मांचे नेमके महत्त्व सांगता आले नाही. इटलीच्या लिओनार्दो दा विन्चीने मात्र पंधराव्या शतकात, जीवाश्म हे प्राचीन सजीवांचे अवशेष असल्याचे ओळखले. त्यानंतर सतराव्या शतकात डेन्मार्कचा संशोधक निकोलस स्टेनो याने ‘वालुकाश्म (सेडिमेंटरी रॉक) हे काळानुसार आडव्या थरांच्या स्वरूपात पसरले असून, जुने खडक खाली तर नवे वर, अशा रीतीने ते रचले गेले आहेत’, हा निष्कर्ष मांडला. अठराव्या शतकाच्या अखेरीस या खडकांच्या रचनांचा रीतसर अभ्यास सुरू झाला, तसेच या खडकांतील जीवाश्मांचाही सुगावा लागला. त्यानंतर इंग्लंडच्या विल्यम स्मिथ याने खडकाचा थर आणि जीवाश्म यांचा संबंध लक्षात घेऊन, संपूर्ण उत्क्रांतीला आधारभूत ठरणारी भूगर्भीय कालमापनाची पद्धत सुचवली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला खडकाची वये समजणे शक्य झाल्यामुळे, त्यात सापडणाऱ्या जीवाश्मांवरून त्या प्रजातीचा सजीव केव्हा निर्माण झाला हे कळू लागले. अखेर इंग्लंडच्याच आर्थर होल्म्स याने १९१३ मध्ये भूगर्भीय कालगणनेचा संपूर्ण आराखडा तयार केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा