पृथ्वीवरचा पहिला-वहिला सजीव हा ऑक्सिजनशिवाय श्वसन करणारा केवळ सेंद्रिय पदार्थानी बनलेला गोळा होता. कारण वातावरणात ऑक्सिजन अजिबात नव्हता. हे जीव चयापचयासाठी केवळ आजूबाजूला असणाऱ्या कणरूप सेंद्रिय पदार्थाचे अन्नभक्षण करत होते. पश्चिम ऑस्ट्रेलियात सापडलेले, ३.५ अब्ज वर्षांपूर्वीच्या जिवाणूंचे जीवाश्म हेच पुराव्यानिशी दाखवून देतात. विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रियांद्वारे, अमिनो आम्ले, शर्करा, मेदाम्ले असे पदार्थ त्या वेळी पाण्यात तयार होत होते. प्रखर सौरऊर्जा, विजांचा सलग चालणारा कडकडाट, ज्वालामुखीतून निर्माण होणारी उष्णता, अशा प्रकारच्या ऊर्जामुळे उपलब्ध असणाऱ्या सेंद्रिय पदार्थात अनेक घडामोडी होत होत्या. पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा तिच्या सोबतच अनेक रासायनिक मूलद्रव्ये आली होती. यातील महत्त्वाचे मूलद्रव्य म्हणजे हायड्रोजन. याच्या क्रियाशीलतेमुळे, त्याचा इतर मूलद्रव्यांशी संयोग होऊन अमोनिया, पाणी आणि मिथेन ही मुख्य संयुगे बनली. यांच्यापासूनच नंतर कबरेदके, प्रथिने, मेद असे जैविकदृष्टय़ा महत्त्वाचे रेणू तयार होत गेले. म्हणजेच अगदी सुरुवातीला असेंद्रीय पदार्थापासून सेंद्रिय रेणू बनू लागले. हे सारे मांडले आहे, ते रशियन शास्त्रज्ञ अलेक्झांडर ओपारीन आणि इंग्लंडच्या जॉन हाल्डेन यांच्या, १९२०च्या दशकातल्या रासायनिक उत्क्रांतीच्या सिद्धांतात!
सतत चालू असणारे बाष्पीभवन आणि त्यानंतरचे बाष्पाचे द्रवीभवन यामुळे या काळात संततधार होत होती. त्यामुळे निर्माण झालेल्या समुद्राच्या पाण्यात हे सर्व सेंद्रिय पदार्थ तरंगू लागले. ही समुद्राची स्थिती म्हणजे एखाद्या गरम, पातळसर सुपासारखी होती. या माध्यमातूनच पेशीपूर्व स्थिती निर्माण झाली. या सलसर, गोळावजा पेशीपूर्व स्थितीभोवती पेशीपटलाची निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थाने पेशीनिर्मिती पूर्ण झाली. परंतु भक्षण, पोषण, प्रजनन या क्रियांना आवश्यक असणाऱ्या घटकांची निर्मिती त्यात अजूनही होतच होती. काही संशोधकांच्या मते, या पेशींत प्रथम आनुवंशिकतेची क्षमता निर्माण झाली. त्यामुळे प्रजनन होऊ लागले आणि पेशींची संख्या वाढू लागली. इतर काही संशोधकांच्या मते, या पेशींत प्रथम चयापचय घडवणाऱ्या क्रिया होऊ लागल्या आणि त्यानंतरच त्यांच्यात प्रजनन घडवणारे बदल होत गेले. काही का असेना.. जीवसृष्टीचा उदय या ग्रहावर झाला आणि नंतर त्यातूनच पुढील उत्क्रांतीद्वारे प्रगत जीवांची निर्मिती झाली.
– डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org