अ‍ॅक्रिलोनायट्रिल ब्युटाडाइन स्टायरिन या मिश्र प्लास्टिकचा शोध १९४८ साली लागला. यामध्ये असलेल्या अ‍ॅक्रिलोनायट्रीलमुळे त्याला उच्च ताण सहन करण्याची शक्ती, रसायनांना विरोध करण्याची शक्ती व उष्णतेला टिकून राहण्याची शक्ती हे गुणधर्म प्राप्त झाले. यामध्ये आलेल्या ब्युटाडाइन या रबरामुळे त्याची आघात सहन करण्याची शक्ती व मजबुती वाढली व स्टायरिन या घटकद्रव्यामुळे हे प्लास्टिक अधिक चकचकीत दिसते आणि त्यापासून वस्तू बनवणे सोपे झाले.
पॉलिस्टायरिनचा शोध जरी १८३९ साली लागला असला तरी त्याचे व्यापारी तत्त्वावरचे उत्पादन १९३७ साली डाऊ कंपनीने सुरू केले. शुद्ध स्टायरिन द्रवरूप असते. स्टायरिन हे बेंझिन आणि इथिलीनपासून बनवले जाते. पॉलिस्टायरिन कडक आणि पारदर्शक प्लास्टिक आहे. पॉलिस्टायरिनला उत्तम विद्युत गुणधर्म आहेत. सूर्यप्रकाशात हे किंचित पिवळे पडते. मूळ स्वरूपात हे अत्यंत ठिसूळ प्लास्टिक असून त्याची आघात सहन करण्याची शक्ती कमी असते. पॉलिस्टायरिन उष्णतेला टिकणारे, रसायनांना टिकणारे असते. ते काचतंतू घातलेल्या स्वरूपातही मिळू शकते. पॉलिस्टायरिनपासून इंजेक्शन मोिल्डग पद्धतीने वस्तू बनवता येतात. तसेच काही एका विशिष्ट पद्धतीने तक्ते, पातळ फिल्म किंवा पोकळ बाटल्या बनवता येतात. हे कडक आणि पारदर्शक प्लास्टिक असल्याने यापासून खिडक्यांच्या काचा, उपकरणाची आवरणे, िभगे, डायल इंडिकेटर्स इत्यादी वस्तू बनवता येतात.
पॉलिस्टायरिनमध्ये ब्युटाडाइन रबर मिसळल्याने अशा प्लास्टिकची आघात सहन करण्याची ताकद वाढते. ह्या प्लास्टिकला हाय इम्पॅक्ट पॉलिस्टायरिन म्हणतात. या प्लास्टिकमध्ये किती प्रमाणात ब्युटाडाइन रबर मिसळले त्यावर त्याची आघात सहन करण्याची क्षमता कमी, मध्यम आणि उच्च अशी अवलंबून असते. हे प्लास्टिक बऱ्यापकी ताणलेही जाते. क्षीण आणि तीव्र अल्कलीचा यावर परिणाम होत नाही, पण तीव्र अ‍ॅसिडचा यावर परिणाम होतो. हे संपूर्णपणे पारदर्शक नाही पण पातळ स्वरूपात ते अर्धपारदर्शक असते. अशा प्लास्टिकचा उपयोग रेडिओ, दूरचित्रवाणी संचांच्या केसेससाठी, बटणे आदींसाठी करतात.
अ. पां. देशपांडे (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई   office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व – पूर्ण सत्य कोणत्याहि एका मतविशेषात सामावणे अशक्य
‘मनुष्यत्व कशात आहे? वेषविशेष, आहारविशेष, भाषाविशेष यांवर ते अवलंबून नाही हे कोणीहि कबूल करील; पण शिक्षणविशेष, मतविशेष, धर्मविशेष, इत्यादिकांना मी ‘वेषा’च्याच योग्यतेचे ठरविले तर ते मात्र प्रथमदर्शनी तरी पुष्कळांना गैर वाटेल. पण विचारांती माझे मत असे होत चाललेले आहे ही गोष्ट खरी. इतिहास, कला, गद्य वाङ्मय, तत्त्वज्ञान, धर्म, मानसशास्त्र इत्यादि विषयांसंबंधी मी जे अल्पस्वल्प वाचले आहे त्यावरून माझी अशी खात्री झाली आहे की, पूर्ण सत्य कोणत्याहि एका कवीच्या, इतिहासकाराच्या, दर्शनकाराच्या किंवा धर्मस्थापकाच्या हाती लागलेले नाही.. धर्मस्थापकांना ईश्वरी साक्षात्कार होतो व त्यांचे ज्ञान पूर्ण होते म्हणावे तर मग धर्मस्थापकात एवढा मतभेद का? आणि नवीन नवीन धर्म स्थापण्याची त्यांना जरूर का वाटली? बुद्धिवान व विद्वान तत्त्वज्ञांचे खरे मानावयाचे असे ठरविले तर शंकराचार्याचे मत खरे मानावे की रामानुजाचार्याचे, प्लेटोचे का आरिस्टॉटलचे, ‘नवोन्मेषी विकासवाद’ लिहिणाऱ्या बर्गसनचे का ‘वर्तनवादा’चा पुरस्कार करणाऱ्या वॉटसनचे- हे प्रश्न मनात विकल्प उत्पन्न करतात.’’ असे प्रश्न उपस्थित करत वामन मल्हार जोशी माणुसकी हे मूल्य सर्व भेदांपलीकडचे आहे हे स्पष्ट करतात –
‘‘.. आपली मते ही खरोखर पुष्कळ वेळा आपल्या पूर्वशिक्षणावर, आपल्या सहज प्रवृत्तीवर, आपल्या गूढ व सुप्त वासनांवर अवलंबून असतात; (आपण निर्विकार चित्ताने विचार करावयाचे ठरविले तरी आपल्या भावना, आपले हितसंबंध, आपल्या अंत:कोशातील गूढ, सुप्त व बोधरहित वासना यांचा परिणाम नकळत होत असतोच असतो) हे सर्व ध्यानात घेतले म्हणजे विशिष्ट मताबद्दलचा आग्रह किती दुराग्रहस्वरूप आहे हे ध्यानात येते आणि अशी वृत्ति होऊ लागते की, ईश्वरास्तित्वादि गूढ गहन प्रश्नांबद्दल ज्याने त्याने आपली प्रामाणिक मते स्वत:पुरती अवश्य स्वीकरणीय मानावीत, लोकांनाहि स्वीकारण्यास सांगावीत, पण त्यांबद्दल आग्रह धरू नये आणि दुसऱ्यांचा मतभेद दिसल्यास माणुसकीच्या दृष्टीने ते त्याज्य किंवा निंद्य आहेत असे तर मुळीच मानू नये.’’

मनमोराचा पिसारा – भ्रमण मंडळ
सर्दी म्हणजे ‘कॉमन कोल्ड’ होण्याची अनेक कारणं संभवतात, त्यातलं सर्वात कॉमन वातावरणातला कोल्ड बग् म्हणजे सर्दीचा व्हायरस. झपाटय़ानं पसरणारा आणि शिंकता शिंकता सर्वत्र पसरणारा हा वायरस उन्हाळ्याच्या प्रारंभी कॉमन असतो.
या सर्दीसारखा त्वरेने सर्वदूर पसरणारा कॉमन वायरस असतो. ‘ट्रॅव्हलायटिस’ म्हणजे कुठेतरी ट्रॅव्हल करण्याचा हा व्हायरल ताप एकाकडून दुसऱ्याकडे पसरतो. प्रत्यक्ष संपर्क न होतादेखील ‘अमुक तमुक यंदा अमुक तमुक ठिकाणी निघाले बरं का!’ अशी बातमी अथवा गॉसिप ऐकली तरी या ट्रॅव्हलायटिसची लागण होते.
एकदा का लागण झाली की यात्रा कंपन्यांची माहितीपत्रकं घरातल्या डायनिंग टेबलावर, बिछान्यावर सगळीकडे पसरतात. मग अमुक ठिकाणाहून तमुक ठिकाणी जायला किती वेळ लागणार, स्थळ (म्हणजे प्रेक्षणीय जागा -उपवर/वधू नव्हे) कसं आहे, तिथे म्हणे बरेच जण जातात नि मजा करतात, नाही तर पस्तावतात अशा चर्चा होतात. रेल्वेचं रिझव्‍‌र्हेशन नक्की ना, या वेळी तरी साइड बर्थ नका देऊ म्हणावं.. यावर खल सुरू होतो.
अलीकडे म्हैसूर, उटी, बंगलोर, काश्मीर यापलीकडे जाणारी म्हणजे आमचं यंदा ‘युरोप झालं, सिंगापूर, बँकाक, पटाया झालं’ असं म्हणणारे भेटतात. त्यामुळे आपण अशाप्रकारे विविध ६-३देश का हिंडतो, असा प्रश्न पडतो. चेंज म्हणून  घराबाहेर पडल्यावर, हॉटेल वा एकूण व्यवस्था ‘घरच्या’सारखी असल्याचं का सांगतो?
नेहमीपेक्षा वेगळं म्हणून युरोपला जाणारी मंडळी परदेशात गेल्यावर घरच्यासारखं दोन वेळा जेवण मिळाल्यावर समाधानी का होतात? प्रवास ‘शेजाऱ्यांनी केला तस्सा’ असायला का हवा असतो? प्रवासात विकत घेतलेल्या कॉमन गोष्टी- म्हणजे आयफेल टॉवरच्या ‘मेड इन चायना’ प्रतिकृती- पॅरिसमध्ये घेतल्याचं का सांगतात?
साठाच्या दशकात इंग्लंडमध्ये युरोपात (त्यांच्या भाषेत कॉण्टिनेण्ट) जाण्याची लागण लागलेली होती, त्या वेळी निरनिराळे लोक का प्रवास करतात यावर जॉर्ज मिकॅशेने भाष्य केलं होतं.
(१) जपानी मंडळी सत्तरच्या पुढे गेल्याशिवाय पासपोर्टवर परदेशाचा व्हिसा पाडू देत नाहीत.
(२).. आणि परदेशी गेल्यावरही शिस्तीने रांग लावून स्वित्र्झलडच्या ‘मॅटरहॉर्न’ शिखराचे फोटो काढतात.
(३) जर्मन मंडळी सदैव फोडोर किंवा लोन्ली प्लॅनेट घेऊन त्यावर खुणा करतात म्हणजे पिसाचा टॉवर किती अंशानं झुकलाय असे गाइडमध्ये  म्हटलंय. तितकाच झुकलाय म्हणून पुस्तक पास करतात. हाच त्यांचा उद्देश.
(४) पाँते रिआल हा पॅरिसमधला प्रसिद्ध पूल पुस्तकात म्हटल्याप्रमाणे तिथेच आहे ना, हे पाहण्याकरता जर्मन मंडळी पॅरिसला येतात म्हणे!
(५) अमेरिकन मंडळीना प्रत्यक्ष ठिकाण पाहण्यापेक्षा आपण तिथे जाऊन आलो याचा फोटो पुरावा हवा असतो. त्यामुळे ते (अ) ट्राफल्गार स्क्वेअरमध्ये लंडन (आ) सेंट मार्क्‍स स्क्वेअर व्हेनिस इथे तिथल्या कबुतरांबरोबर फोटो काढतात. आर्क द त्रायुम्फमध्ये नुसते फोटो काढतात, कारण तिथे कबुतरं नसतात.
(६) फोटो काढण्याचा उद्देश ‘स्मरणा’साठी की फेसबुक आणि ‘वॉटसॅप’वर लावून ‘आय वॉज हीअर’ हे सांगण्यासाठी होतो. हा प्रश्न आहे.
असो, आपण सगळे भ्रमण मंडळाचे सदस्य आहोत, आम्हीही प्रवासाला जाणार आहोत, पण शेजारी  कुठे जाणार हे माहीत नसल्याने ठिकाण नक्की नाही!
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

Story img Loader