बंदिस्त शेळीपालनात शेळ्यांसाठी विशिष्ट पद्धतीने गोठा बांधून त्यातच त्यांच्या चारा-पाण्याची सोय करतात. गोठय़ाची जागा शक्यतो उंचावरची, उतार असलेली व पाण्याचा निचरा होणारी असावी. गोठा बांधताना गोठय़ात पुरेसा सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील हे पाहावे. गोठय़ाच्या आजूबाजूला मोकळी जागा ठेवावी. तिथे शेवरी, सुबाभूळ, कडुलिंब, शिवण, उंबर यांसारखी झाडे लावावीत. या झाडांमुळे शेळ्यांचे उन्हाच्या झळा, थंड वारे यांपासून संरक्षण होते. या झाडांचा पाला शेळ्यांना खाद्य म्हणूनही उपयोगी असतो.
शेळ्यांसाठी फार खर्चिक गोठय़ाची आवश्यकता नसते. शेतातील उपलब्ध साहित्य वापरून गोठे बांधता येतात. नीलगिरी, सुबाभूळ, कडुलिंब, बाभूळ यांच्या लाकडांचा वापर बल्ल्या आणि खांब म्हणून तसेच बांबू, उसाचे पाचट व वाळलेले गवत यांचा वापर छतासाठी करता येतो. गोठय़ाचे छत इंग्रजी ‘ए’ आकाराचे असावे. गोठय़ाचा मध्यभाग साधारण दोन पुरुष उंच असावा. गोठा कडेला त्यापेक्षा कमी उंच असावा. गोठय़ाच्या कडेला साधारण एक पुरुष उंचीपेक्षा थोडी कमी उंच असलेली भिंत असावी. त्यावर लोखंडाची जाळी बसवावी. कडेच्या भिंतीमुळे गोठय़ात पावसाचे पाणी जाणार नाही.
गोठय़ामध्ये प्रत्येक शेळीला १०-१२ चौरस फूट जागा मिळायला हवी. गोठय़ातील जागा मुरूम भरलेली असावी. म्हणजे, मूत्र जमिनीत मुरते व गोठय़ात दलदल होत नाही. दरवर्षी मुरुमाचा वरचा ४-५ इंचाचा थर काढावा व नवीन मुरूम टाकताना त्यात चुना व १० टक्के फॉलीडॉल पावडर टाकावी. त्यामुळे पिसवा व गोचीड यांचे प्रमाण कमी राहाते. चारा खाण्याची गव्हाण जमिनीपासून दोन फूट उंच असावी. चारा खाण्यासाठी दहा इंचाच्या चौकोनात इंग्रजी ‘यू’ आकाराची खिडकी असावी. त्यामुळे चारा खाताना शेळ्यांना त्रास होत नाही, चारा वाया जात नाही. गव्हाणीची रुंदी दोन फूट व खोली एक फूट ठेवावी. शेळ्यांना उंचीवर उडी मारून बसायला आवडते. त्यासाठी गोठय़ामध्ये दोन फूट उंची, तीन फूट रुंदी व पाच फूट लांबी असलेले लाकडी टेबल ठेवावे.

जे देखे रवी..  -हिंसेतून अहिंसा ( बगळा आणि बगळी)
ओठ-टाळू जन्मत: दुभंगलेले असलेल्या बाळांच्या शस्त्रक्रिया मी गेली ४० वर्षे करीत आहे. त्यातल्या काही बाळींना आता नातवंडे होतील (कारण मुलींची लग्ने लवकर होत असत). हे बाळ येते तेव्हाचा ‘सीन’ आता मला पाठ आहे. बाळंतिणीकडे बाळ नसते. ते असते आई किंवा सासूकडे. नवरा असहाय निरीक्षक असतो. दोन्ही आजोबा लांब असतात. काळजीच्या ऊर्मी सर्वत्र उसळत असतात. त्या वेळेला मी बाळाला घेतो. त्याच्यात एक ट्रिक असते. उजवा हात ढोपरात वाकवून त्याच्या पायाखाली घालायचे. त्याला उलटे फिरवून बाळाची पाठ माझ्या पोटाशी, डगमगणारी मान छातीवर आणि अशा तऱ्हेने गणपती घरी आणतात त्या पोझिशनमध्ये बाळाचा चेहरा आणि डोळे आईकडे फिरवल्यामुळे बाळ बिचकते. डगमगणारी मान छातीवर स्थिर झाली की बाळाला आई दिसते. मग बाळ आईला बघून हसते. मग त्या तिन्ही बाया ‘अगं बाई!’ म्हणून खूश होतात. या माझ्या कृतीत अहिंसा असते. ओवी म्हणते ‘मांजरीच्या दातात तिची पिल्ले’. आईच्या डोळ्यांतही अहिंसा असते. ओवी म्हणते ‘मायाळू दृष्टी जशी आईची तान्हुल्याकडे’. मग प्रश्नोत्तरे सुरू होतात. ‘बाळाला दुखेल का हो?’ हल्लीच्या आया उच्चशिक्षित असतात. त्यांना इंटरनेटवरून कळलेले असते तरी हा प्रश्न. हा विज्ञानाच्या पलीकडचा जैविक प्रश्न असतो. यात विनवणी असते की, ‘दुखवू नका’. त्याबद्दलची ओवी आहे, ‘जर कोणी विनवेल। तर मग बोलेल। प्रेमाने भरून। जणु आईबापच।।’ मग मी म्हणतो, ‘हे बाळ आता माझे आहे असे समजा.’ मंडळींना हायसे वाटते. मग प्रश्न येतो, ‘किती टाके पडतील?’ या ‘पडतील’ शब्दाचा आधार घेत ‘आपोआप गळून पडतील, असे टाके मी वापरीन,’ असे उत्तर मी देतो. कापण्याची आणि टाके घालण्याची क्रिया हिंसाच; परंतु आपोआपच पडतील, या अहिंसात्मक क्रियेला प्राधान्य देऊन मी वातावरण बदलतो. त्याचीही ओवी आहे-
‘अधिकउणा शब्द। दुखवेल कुणाचे वर्म। होईल संशय उत्पन्न। हे सगळे टाळतो।’
अर्थात मंडळींचा विश्वास वाढत जातो तसतशी माझी जबाबदारी चक्रवाढ दराने वाढत जाते; परंतु त्याबद्दलही ओव्या आहेत. त्यातली एक मांसाहारी आहे-
‘तरंग न ओलांडता। पायाने लाटा न मोडता। पाण्याला न लावता। धक्का
माशावर नजर नेमकी। हलकी पावले मोजकी। मग पाण्यात शिरे। बगळा’
शस्त्रक्रिया झाल्यावर माझा बगळा घरी येतो. बगळी म्हणते, ‘सगळं ठीक झालं?’ तेव्हा बगळा गर्वाने म्हणतो, ‘मी या शस्त्रक्रियेत सगळ्यांचा बाप आहे.’ बगळी म्हणते, ‘ज्ञानेश्वरीचे वाचन फुकट गेले!’ या बगळ्यांबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस- कॅन्सर रक्ताचा: ब्लड कॅन्सर :  भाग ५
‘‘मला विलक्षण थकवा आलेला आहे; हाता-पायांना मुंग्या येत आहेत; पोटऱ्या बधीर झालेल्या आहेत; काहीही काम करावेसे वाटत नाही,’’ अशी रुग्ण तक्रार करायला लागल्यावर डॉक्टर वैद्य, विविध तज्ज्ञ चिकित्सक रुग्णाच्या रक्ततपासण्या करून घेतात.  रक्ताच्या कॅन्सरची शंका व लक्षणे पुढीलप्रमाणे असतात- पांडुता, पांढऱ्या पेशींची अफाट वाढ, तांबडय़ा पेशी कमी होणे, खूप थकवा, चिडचिड, सहनशीलता कमी होणे, शिरा शिथिल होणे, रुक्षता, खासकरून पानथरी-प्लीहा भरमसाट वाढणे. वरील लक्षणांकरिता विविध प्रकारची कारणे असू शकतात. खराब, दूषित व अपुरे अन्नपाणी, कृमी, जंत यांची दीर्घकाळची कारण परंपरा; तसेच कोणत्या तरी आगंतुक कारणाने रोगप्रतिकारशक्ती एकदम कमी होणे, चिंता, अतिश्रम, अतिविचार, तसेच धूम्रपान, तंबाखूसेवन, मद्यपान असा अनिष्ट व्यसनांमुळे रक्त बनण्याच्या यंत्रणेवर फाजील ताण पडणे, डोळ्यांचा पापणीचा फिकट रंग, नखे यांच्याकरिता नियमितपणे काळजीपूर्वक मागोवा घ्यावा.
रक्ताच्या कॅन्सरकरिता लाक्षाचूर्ण हे प्राणिजद्रव्य तमाम मानवजातीला आयुर्वेदाची मोठी देणगी आहे.  या लाक्षाचूर्णाबरोबर उपळसरी, प्रवाळ, कामदुधा, भौक्तिकभस्म अशी एकत्रित औषधे रक्ताचे प्रमाण आणखी कमी होऊ नये म्हणून मोठेच योगदान देतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना हे मिश्रण उपयुक्त पडते. कफ प्रकृतीच्या रक्त कॅन्सरग्रस्त रुग्णांना लाक्षावटी तत्काळ गुण देते. लाक्षादिघृत हे जादा औषध घेतल्यास रक्ताच्या कॅन्सरला तत्काळ प्रतिबंध होतो.
नेहमीची औषधे म्हणून सुवर्णमाक्षिकादिवटी, चंद्रप्रभा, शृंगभस्म, पुष्टीवटी सकाळ-संध्याकाळ; भोजनोत्तर आम्लपित्तवटी व पुढील काढय़ांपैकी एकाची योजना लक्षणांनुरूप करावी. भूकेकरिता कुमारीआसव, थकव्याकरिता अश्वगंधारिष्ट, पचनाकरिता पिप्पलादिकाढा, आमांश, चिकटपणा याकरिता फलत्रिकादिकाढा, च्यवनप्राश, धात्री रसायन, अश्वगंधापाक तारतम्याने योजावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – २५ सप्टेंबर
१८९१> विनोदी लेखक, कथाकार कॅप्टन गोपाळ गंगाधर लिमये यांचा जन्म. ‘विनोदसागर, गोपाळकाला’ हे विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध. आपल्या सैन्यकाळातील आठवणींविषयी ‘सैन्यातल्या आठवणी’ हे पुस्तकही विनोदी शैलीत लिहिले. ‘मेकॅनो’ ही त्यांची कथा गाजली.
१९१५> मराठी बखरवाङ्मयाचे अभ्यासक, लेखक, इतिहासकार रघुनाथ विनायक हेरवाडकर यांचा जन्म. ‘मराठी बखर’ हा त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध पुस्तकरूपात प्रसिद्ध. संभाजीराजे, राजाराम महाराज, शाहूमहाराज आदींची चरित्रे त्यांनी लिहिली. १९२८> ख्यातनाम पत्रकार, लेखक,  प्रभावी वक्ते माधव यशवंत गडकरी यांचा जन्म. त्यांची  ‘लोकसत्ते’तील कारकीर्द लक्षणीय ठरली. त्यांची ‘असा हा महाराष्ट्र, असा हा गोमंतक’ यासह वृत्तपत्रांतील स्तंभांची दृष्टिक्षेप, चौफेर ही पुस्तके प्रकाशित. भ्रष्टाचार्य अंतुले, साहित्यातील हिरे आणि मोती, अष्टपैलू अत्रे आदी  त्यांची पुस्तकेही खूप गाजली.
१९८५> वैदर्भीय कवी गुणवंत हणमंत देशपांडे यांचे निधन.
२००४>  इंग्रजी-मराठी भाषेतील ख्यातनाम कवी अरुण कोलटकर यांचे निधन. ‘जेजुरी’ हा दीर्घ इंग्रजी काव्यसंग्रह प्रकाशित.
– संजय वझरेकर