नुकताच भेटलेला एखादा माणूस काही दिवसांनी पुन्हा भेटतो, तेव्हा मेंदूला नव्याने कोणतीही माहिती गोळा करायची नसते. आधी साठवलेली माहिती शोधायची असते. नाव, भाषा, बोलण्याची पद्धत, आवाज, चेहरा या सर्व गोष्टी विविध क्षेत्रातून मेंदूच्या पटलावर येतात- नेहमीच्या भाषेत बोलायचं तर आपल्याला ‘आठवतात’.
या भेटीत त्या माणसाबद्दल नवी माहिती कळली तर ती पूर्वी साठवलेल्या माहितीत जोडली जाते. पूर्वी याच माणसाबद्दल जे सिनॅप्स तयार झालेले आहेत, त्यात या नव्या माहितीचे नवे सिनॅप्स जोडले जातात. प्रत्येक माणसाबद्दल, प्रत्येक नव्या भेटीत नवे सिनॅप्स जोडले जातात. काही माणसं एकदम घट्ट होतात, तर काही माणसांची ओळख तात्पुरतीच राहते. तात्पुरत्या ओळखीची माणसं लवकर विस्मरणात जातात. मात्र खूप पूर्वी भेटलेली काही माणसं मात्र जशीच्या तशी लक्षात राहतात, याचं कारण त्या भेटीच्या वेळीस ती माणसं काही कारणाने महत्त्वाची वाटलेली असतात. मेंदूने तेव्हा योग्य दखल घेतलेली असते.
भावनांच्या आठवणी
काही आठवणी अशा असतात की कितीही वर्ष गेली तरी आपण विसरत नाही. घरातल्या आईबाबांबरोबरच्या आठवणी, बालवाडी-शाळा-कॉलेजमधले प्रसंग यातले काही प्रसंग कधीच विसरता येत नाहीत. अशा अनेक प्रसंगाच्या आठवणी आपल्या मनात असतात. यातले काही प्रसंग अंधुकसे लक्षात असतात, तर काही प्रसंग अगदी नीट लक्षात असतात. इतके नीट की, अगदी काल घडल्यासारखे वाटावेत.
ज्या प्रसंगामुळे आपल्याला खूप आनंद झालेला असतो ते प्रसंग सहजासहजी विसरत नाहीत. पण मेंदू इतका मजेशीर असतो की तो फक्त आनंदाच्या आठवणी साठवत नाही. ज्यावेळी खूप वाईट वाटलेलं असतं. अपमान झालेला असतो, असे दु:खद प्रसंगदेखील खूप लक्षात राहतात. याचं कारण स्मरण आणि भावना या दोन क्षेत्रांचा खूप जवळचा संबंध असतो. भावनांमध्ये गुंफलेल्या आठवणी विसरता येत नाहीत. ज्या वेळेस मनात कोणत्याच खास भावना नसतात ते प्रसंग मात्र लक्षात राहत नाहीत.
डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com