– अनघा शिराळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूकंप कोणत्या कारणाने झाला यावरून भूकंपाचे चार प्रकार पडतात. ते म्हणजे संरचनात्मक (टेक्टॉनिक), ज्वालामुखीजन्य (व्होल्कॅनिक), स्फोटजन्य (एक्स्प्लोजन) व पाषाणपात (कोलॅप्स) भूकंप. भूगर्भातील हालचालींमुळे पृथ्वीचे भूपट्टे प्रभावित होत असतात, त्याचा ताण खडकांवर पडून खडकांमधले भौतिक व खडकांच्या खनिजांमधले रासायनिक संतुलन बिघडत असते. खडकांवर पडणारा ताण एका मर्यादेपेक्षा जास्त झाला की पृथ्वीच्या कवचाला तडे जातात आणि संरचनात्मक भूकंप होतो. जगात घडणाऱ्या भूकंपांपैकी जास्तीत जास्त भूकंप संरचनात्मक प्रकारचे असतात. त्यांची व्याप्ती (मॅग्निट्यूड) कमी वा जास्त असली तरी त्यांची तीव्रता (इंटेंसिटी) मात्र जास्त असते. तीव्रतेबरोबर जेव्हा व्याप्तीही जास्त असते, तेव्हा एखादे महानगर काही सेकंदात पूर्णत: उद्ध्वस्त होऊ शकते. जपानमध्ये २०११ साली झालेला रिश्टर श्रेणीनुसार ९.१ तीव्रतेचा भूकंप या प्रकारचा होता.

ज्वालामुखीजन्य भूकंपांचे प्रमाण संरचनात्मक भूकंपापेक्षा कमी असते. या प्रकारचे भूकंप ज्वालामुखीच्या उद्रेकापूर्वीही आणि नंतरही होतात. उद्रेकापूर्वी पृथ्वीच्या कवचामधील शिलारसाच्या तापमानात वेगाने बदल घडून आल्याने खडकात कंपने निर्माण होतात आणि भूकंप होतो. उद्रेकानंतर होणारा भूकंप थोडा जास्त काळ टिकतो. त्याला दीर्घकालीन भूकंप म्हणतात. ज्वालामुखीजन्य भूकंपात आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे ‘संरचनात्मक ज्वालामुखीजन्य भूकंप’. हाही उद्रेकानंतरच होतो. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन शिलारस बाहेर पडतो तेव्हा भूगर्भात एक पोकळी निर्माण होते. या पोकळीवर पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत असणाऱ्या खडकांचा दाब येतो. भूगर्भातील खडकांची पडझड होऊन पोकळी भरून निघते. त्यामुळे होणारा भूकंप काहीसा अधिक तीव्रतेचा असतो. तर बऱ्याच वेळा शिलारस बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळा येऊन तो मार्ग बंद झाल्याने भूगर्भात उच्च दाब तयार होऊन प्रचंड क्षमतेचा स्फोट होऊन अतितीव्र भूकंप होतो.

१९८५ साली कोलंबियातील नेवाडो डेल रुईझ इथे झालेला भूकंप विध्वंसक ठरला होता. अणुस्फोटामुळे होणाऱ्या भूकंपांना स्फोटजन्य भूकंप म्हणतात. अमेरिकी संघराज्याने १९३० साली अणू चाचणी घेतली होती तेव्हा जवळपासची अनेक गावे उद्ध्वस्त झाली होती. पाषाणपात भूकंप जमिनीखालच्या खाणींमध्ये (अंडरग्राउंड माइन्स) होतात आणि बहुधा कमी तीव्रतेचे असतात. खाणीतल्या पोकळीच्या छतावर वरच्या भूभागाचे वजन येऊन छत अस्थिर होते, सरतेशेवटी ते छत कोसळते. खाणीच्या आसमंतातल्या मर्यादित क्षेत्रात भूकंपलहरी निर्माण होतात. २००७ साली अमेरिकेत, २०१० साली चिलीमध्ये आणि २०१४ साली तुर्कियेमध्ये असे भूकंप झाले होते.

– अनघा शिराळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org