भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या विभागाची स्थापना १८५१ मध्ये झाली. त्याचे पहिले अधीक्षक म्हणून आयरिश भूवैज्ञानिक टॉमस ओल्डहॅम यांची नेमणूक करण्यात आली होती. १८५१ पासून ते १८७६ मध्ये निवृत्त होईपर्यंत, म्हणजे २५ वर्षे, त्यांनी या विभागाची धुरा वाहिली.
त्यांचा जन्म १८१६ मधे डब्लिन येथे झाला. डब्लिनच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. १८३६ मध्ये पदवी मिळाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते स्कॉटलंडमधील एडिनबरा विद्यापीठात गेले. अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेताना भूविज्ञान या विषयाच्या तासांनाही ते मोठ्या आवडीने हजर राहू लागले. दोन वर्षे एडिनबरा येथे शिकून ते डब्लिनला परतले.
१८३८ मध्ये त्यांची नेमणूक ‘सैन्यसामग्री सर्वेक्षण’(ऑर्डनन्स सर्व्हे) खात्यात झाली. नेमून दिलेल्या क्षेत्राचे सैन्यदलासाठी भूरूपीय नकाशे (टोपोग्राफिकल मॅप्स) तयार करणे हे या खात्याचे काम होते. या खात्यात असताना त्यांनी आयर्लंडच्या लंडनडेरी परगण्याचे सर्वेक्षण केले.
पुढे पाचच वर्षांनी त्यांना ‘डब्लिन भूवैज्ञानिक संघटना’ (जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ डब्लिन) या संस्थेचे ‘सचिव आणि संग्रहालय प्रमुख’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. नंतर वर्षभरात त्यांची नियुक्ती डब्लिनच्या ट्रिनिटी महाविद्यालयात भूविज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून झाली. शिवाय ‘आयरिश भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ या सरकारी विभागाचे ‘स्थानिक संचालक’ हे पद सांभाळण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली.
हेही वाचा >>> कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
ओल्डहॅम यांनी केलेल्या विविध भूवैज्ञानिक सर्वेक्षणांत त्यांना मिळालेल्या जिवाश्मांवर त्या काळातले ख्यातनाम जिवाश्मतज्ज्ञ एडवर्ड्ज फोर्ब्ज यांनी संशोधन केले. त्या जिवाश्मांमध्ये त्यांना एक नवी प्रजात मिळाली. ओल्डहॅम यांच्या गौरवार्थ त्या प्रजातीला त्यांनी ‘ओल्डहॅमिया’ असे नाव दिले.
याच काळात इकडे भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा रेल्वे सुरू करण्याचा मनसुबा १८२० पासून सुरू होता. त्यासाठी आधी येथील दगडी कोळशाचे साठे शोधून काढणे गरजेचे होते. त्यासाठी कंपनी सरकारने काही भूवैज्ञानिकांची नेमणूक करून पाहिली. पण अपेक्षित यश मिळत नव्हते. मग ब्रिटिश भूवैज्ञानिक सर्वेक्षण (ब्रिटिश जिऑलॉजिकल सर्व्हे) या इंग्लंडमधल्या शासकीय विभागाप्रमाणे इथेही भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण हा विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा या विभागाचे पहिले अधीक्षक म्हणून ओल्डहॅम यांची नियुक्ती करण्यात आली. भारतातील शिस्तबद्ध भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचा पाया त्यांनी घातलाच, पण आपल्या विभागातर्फे केल्या जाणाऱ्या संशोधनातील निष्कर्ष जगापुढे येण्यासाठी त्यांनी नवी भूवैज्ञानिक नियतकालिकेही सुरू केली. निवृत्तीनंतर ते मायदेशी परतले. पुढे दोनच वर्षांनी १८७८ मध्ये त्यांचे निधन झाले.
मराठी विज्ञान परिषद
ई-मेल office@mavipa.org
संकेतस्थळ :www.mavipa.org