डॉ. श्रुती पानसे
व्यक्तीचे स्वत:बद्दलचे विचार > त्यानुसार चाललेली कृती > कृतींचे दिसणारे परिणाम यात नेहमीच सुसंगती असते का?
अनेकदा असं लक्षात येईल की, स्वत:बद्दलचे विचार – (अ) योग्य असतात (ब) मुळीच योग्य नसतात (क) विचार फारसा केलेलाच नसतो.
कृती- (अ) स्वत:ला हवी तशीच कृती केली जाते (ब) कृती तशीच करायची असते, पण केली जात नाही. कारण आंतरिक किंवा बाह्य़ अडथळा. (क) कृतीपर्यंत पोहोचत नाही, केवळ विचारांच्या पातळीवरच गोष्टी राहातात.
परिणाम – विचार आणि कृती यावर परिणाम अवलंबून असतो. या दोन गोष्टींमध्ये संगती असेल आणि बाह्य़ अडथळ्यांचादेखील पुरेसा विचार केलेला असेल तर योग्य परिणाम मिळतो. अन्यथा, पूर्णत: अनपेक्षित परिणाम मिळण्याचीच शक्यता जास्त असते.
अपेक्षित परिणाम मिळण्यात आपला मेंदू कसं काम करतो, हे बघणं अतिशय महत्त्वाचं असतं. केवळ वरवर विचार करून निर्णय घेण्यापेक्षा जेव्हा स्वत:च्या विचारांची खोली जराशी लांब-रुंद केली तर गोष्टी बदलतात. आसपासच्या आंतरिक आणि बाह्य़ अडथळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.
म्हणून जास्त वेळ थांबून मेंदूत येणाऱ्या विचारांकडे लक्ष केंद्रित व्हायला हवं. आपली विचारप्रक्रिया हीदेखील विद्युत-रासायनिक संदेश निर्माण करत असते. या प्रक्रियेला आपण वाट पाहायला लावू शकतो.
अगदी १०० टक्के नसेल कदाचित; पण जास्तीत जास्त योग्य निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो. अशा पद्धतीने केलेले विचार कृतीत उतरवता आले, तर योग्य परिणाम मिळण्याची शक्यता वाढते.
भावनांची समस्थिती असते तेव्हा जे विचार केले जातात आणि कृतीत आणले जातात, त्याचा परिणामही योग्य असतो (अर्थात जर बाह्य़ अडथळे आले नाहीत तर). भावनांची समस्थिती या एका गोष्टीमुळे विचारांवर आणि पर्यायाने निर्णयक्षमतेवर चांगला परिणाम होतो. असं असताना माणसं दु:खी, निराश, अस्वस्थ आणि चिडचिडलेली आणि असमाधानी असतात. भावनांचा तराजू अशा मन:स्थितीकडे झुकला की रसायनं आपला प्रभाव दाखवू लागतात. याचा थेट परिणाम विचारांवर, कृतींवर आणि परिणामांवर होतो.
contact@shrutipanse.co