उत्तराखंडात स्थायिक झालेल्या अमेरिकन दाम्पत्याचा मुलगा थॉमस ऊर्फ टॉम अल्टर याचा जन्म मसुरीतला. मसुरीतल्या वूड स्टॉक स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यावर टॉमला अमेरिकेतल्या येल विद्यापीठात उच्चशिक्षण घेण्यासाठी पाठवलं गेलं; परंतु शिक्षणात विशेष गती नसलेल्या टॉमनं वर्षभराने कॉलेज सोडून एका इस्पितळात सहा-आठ महिने नोकरी करून तेही सोडून तो सरळ भारतात वडिलांकडे राजपूर इथं येऊन नोकरीसाठी शोधाशोध करायला लागला. वयाच्या १९ व्या वर्षी टॉमला हरयाणात जगधरी येथे शिक्षकाची नोकरी मिळाली. सेंट थॉमस स्कूल या शाळेत वर्षभर नोकरी केल्यावर चंचल स्वभावाच्या टॉमने जगधरीस ३-४ ठिकाणी किरकोळ नोकऱ्या केल्या. या काळात त्याला हिंदी सिनेमा बघण्याचा नाद लागला.
राजेश खन्नाचा ‘आराधना’ पाहून प्रभावित झालेल्या टॉमने तो सिनेमा दर आठवडय़ाला ३-४ वेळा असा २० वेळा पाहिला! राजेश खन्ना हे आता त्याचे दैवत बनले! एकदा कर्मधर्मसंयोगानं वृत्तपत्रातली पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट (एफटीआयआय) ची छोटी जाहिरात त्याच्या वाचनात आली. या संस्थेच्या शिक्षणक्रमासाठी प्रवेशाची ही जाहिरात वाचून टॉमने तडक पुण्याला जाऊन तिथला प्रवेश अर्ज भरला. संस्थेत प्रवेश मिळाला आणि त्याने रोशन तनेजांच्या मार्गदर्शनाखाली १९७२ ते ७४ असा येथील चित्रपट अभिनेत्याचा शिक्षणक्रम पूर्ण केला. त्या वेळी त्याचे सहयोगी विद्यार्थी होते नसीरुद्दीन शाह, बेंजामिन गिलानी, शबाना आजमी. एफटीआयआयची पदवी घेतल्यावर त्याची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. ‘साहेब बहादूर’ या चित्रपटात टॉमला प्रथम काम मिळाले; परंतु देव आनंदची प्रमुख भूमिका असलेल्या या ‘साहेब बहादूर’ची निर्मिती बरीच रेंगाळली.
त्यानंतर सुरू झालेल्या रामानंद सागर यांचा ‘चरस’ हा टॉम अल्टरची विशेष भूमिका असलेला पहिला चित्रपट ठरला. ‘चरस’ १९७६ मध्ये प्रदर्शित झाला.
या काळात टॉमने नसीरुद्दीन शाह, बेंजामिन गिलानी यांच्याबरोबर मोटलो प्रॉडक्शन ही नाटय़संस्था स्थापन केली आणि नाटय़ प्रयोग केले. तसेच टॉम एक क्रिकेटवेडा मनुष्य होता. त्याने अनेक वर्षे क्रीडा समीक्षक म्हणून ‘स्पोर्ट्स वीक’, ‘डेबोनायर’, ‘आऊटलूक’ या नियतकालिकांमध्ये क्रिकेटबद्दल लिखाण केलंय.
सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com