– डॉ. संजीव बा. नलावडे

ज्या नद्यांची लांबी जास्त असते त्या नद्यांच्या मुखापाशी त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजे गंगेच्या मुखांशी वसलेले, सुंदरबन होय. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना नद्यांच्या संगमातून त्याची निर्मिती झाली आहे. ‘सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश’ हे तर त्याचे वैशिष्ट्य आहेच; पण त्याच्या जोडीने खारफुटी वनांचा (मॅन्ग्रूव्ह फॉरेस्ट्स) हा जगातला सर्वात मोठा प्रदेश आहे, हे त्याचे दुसरे वैशिष्ट्य आहे.

गंगा, ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या अनेक उपनद्या बंगालच्या उपसागराला मिळताना हिमालयातून मोठ्या प्रमाणावर गाळ, किंवा पारिभाषिक शब्द वापरायचा तर अवसाद, वाहून आणतात. त्यांनी वाहून आणलेला अवसाद उथळ उपसागराच्या तळावर पसरला जातो. अवसादांचे एकावर एक थर साचत जातात. थर साचण्याची प्रक्रिया दीर्घकाळ घडत राहिल्याने एक वेळ अशी येते, की अवसाद पाण्याच्या वर डोकावू लागतो. थोडक्यात, गाळाचे एक बेटच नदीमुखाशी तयार होते. यामुळे नदीचा सागराकडे जाण्याचा मार्ग अडवला जातो. नदी या बेटाला वळसा घालून नवीन प्रवाह निर्माण करत सागराला मिळते. त्याही प्रवाहात अशाच प्रकारे बेट निर्माण होते, आणि तो प्रवाहही अडवला जातो. नदी याही बेटाला वळसा घालून आणखी एक नवीन मार्ग तयार करून सागराला मिळते. ही क्रिया दीर्घकाळ होत राहिल्याने नदीच्या मुखाशी गाळाचा खूप मोठा प्रदेश निर्माण होतो. त्याचा आकार त्रिकोणी असल्याने त्याला ‘त्रिभुज प्रदेश’ म्हणतात. नदीची लांबी खूप मोठी असून खोऱ्यातले खडक वेगाने झीज होण्यासारखे असतील, तर गाळाची निर्मिती अधिक प्रमाणात होते. तसेच, सागरातील भरतीचे प्रवाह मंद असल्यास गाळाचे संचयन होण्यास मदत होते.

सुंदरबनात नद्यांचे शेकडो फाटे-उपफाटे, त्यांच्या दरम्यानची गाळाची बेटे, खाड्या, खाजणे आणि त्यावर खारफुटी वने अशी रचना आहे. सुंदरबनाचे सुमारे ४० टक्के क्षेत्र भारतातल्या पश्चिम बंगाल राज्यात आहे, तर उरलेले ६० टक्के क्षेत्र बांगलादेशात आहे. या वनात सुंद्री नावाच्या खारफुटी वनस्पतीचे प्राबल्य आहे. इथले सुमारे ७० टक्के वृक्ष सुंद्रीचे आहेत. त्यावरून सुंदरबन हे नाव पडले असावे. बंगालच्या उपसागरात वारंवार निर्माण होणारी सागरी वादळे इथपर्यंत पोहोचली तर ती सुंदरबनाचे नुकसान करतात.

इथे व्याघ्रप्रकल्प असून इथले वाघ उत्तम पोहणारे आहेत. वाघांव्यतिरिक्त हरणे, मगरी, अनेक प्रकारचे साप इथे आढळतात. मनुष्यवस्तीही बऱ्यापैकी असून मासेमारी, जंगलातला मध गोळा करणे, लाकूडतोड हे त्यांचे व्यवसाय आहेत.

– डॉ. संजीव बा. नलावडे मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader