ट्रायकोडर्मा ही कवकांची प्रजाती आहे. या प्रजातीतील कवकांच्या जाती परजीवी असतात व त्या वनस्पतींशी सहजीवी असतात. पिकांवर येणाऱ्या रोगकारक बुरशींवर या प्रजातीतील कवके जगतात. त्यामुळे या कवकांना शेतकऱ्यांची मित्रकवकेच म्हणतात. ट्रायकोडर्मा हे पर्यावरणाशी मत्री ठेवणारे कवकनाशक आहे.
सर्व प्रकारच्या जमिनीत या प्रजातींची कवके आढळतात. ही मित्रकवके जमिनीच्या वरच्या थरात सक्रिय असतात. ट्रायकोडर्मा कवके काही प्रतिजैविक विषांच्या साह्याने रोगकारक बुरशींची वाढ थांबवितात. ट्रायकोडर्माची वाढही रोगकारक बुरशींपेक्षा जास्त व जलद होते. ट्रायकोडर्मा कवकांचे तंतू रोगकारक बुरशांच्या तंतूभोवती घट्ट गुंडाळी करतात. ट्रायकोडर्माने तयार केलेल्या एन्झाइम्समुळे बुरशींच्या पेशीभित्तिकेतील द्रव्यांना हानी पोहोचते किंवा ती विरघळतात. त्यामुळे बुरशींच्या पेशीभित्तिकेचे अध:पतन होऊन बुरशींचा मृत्यू होतो.
ट्रायकोडर्मामुळे काणी, करपा, रोप कुजणे, मुळकूज, कंठिका कूज, कोळशी कूज, चिकटय़ा काणी, बोट्रायटिस, ब्लॅक सर्फ या रोगांपासून संरक्षण मिळते. ट्रायकोडर्मा सूत्रकृमींचेही काही प्रमाणात नियंत्रण करतात. ही कवके पिकांच्या मुळांजवळ असताना वाढवर्धक द्रव्य निर्माण करतात. त्यामुळे रोपांच्या मुळांच्या संख्येत आणि लांबीत वाढ होऊन पिकांची वाढ जोमदार होते. तसेच ही कवके रोपांच्या मुळ्यांवर पातळ थर निर्माण करतात. त्यामुळे रोगकारक बुरशीचा प्रवेश मुळांपर्यंत होऊ शकत नाही.
ट्रायकोडर्मा कवकांच्या जाती मातीतून विलग करून त्यांची कृत्रिम रीतीने वाढ केली जाते. नंतर त्या र्निजतुक केलेल्या संगजिऱ्याच्या भुकटीत मिसळून या कवकांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जातो. ट्रायकोडर्मामिश्रित संगजिऱ्याच्या भुकटीचा वापर बीजप्रक्रिया, मातीवरील प्रक्रिया करून, रोपप्रक्रिया व पिकांवर फवारणी या पद्धतींनी करतात.
ट्रायकोडर्माचा उपयोग ऊस, कांदा, कापूस, केळी, कोबी, टोमॅटो, तंबाखू, फ्लॉवर, बटाटा, बीट, भुईमूग, मिरची, मिरी, िलबूवर्गी झाडे, वांगी, वाटाणा, सूर्यफूल, सोयाबीन, हरभरा अशा अनेक पिकांसाठी होतो. ट्रायकोडर्माचा उपयोग केल्यानंतर त्या ठिकाणी रासायनिक कवकनाशकांचा उपयोग करू नये. ट्रायकोडर्मा मिश्रणाची भुकटी बारा महिन्यांपर्यंत टिकते. लहान मुलांपासून ती दूर ठेवावी. ही भुकटी वा तिचे द्रावण कातडीवर पडली तर लगेच भरपूर पाण्याने धुऊन टाकावी. नाहीतर कातडीला त्रास होतो.
– अशोक जोशी (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
जे देखे रवी..: शिस्त आणि करडी नजर
विभागात सकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या ठोक्याला वॉर्डमधला राऊंड चालू होत असे. मधूनमधून स्वत: साहेब अवतरत असत. राऊंड वेळेवर सुरू होतो की नाही याची चाचपणी करत असत. ह्य़ांनी मी होतो त्या काळात एकही शस्त्रक्रिया किंवा मलमपट्टी केल्याचे आठवत नाही. तीन रुग्णांना एक नर्स असे प्रमाण होते, त्यामुळे आबाळ होण्याचा प्रश्नच नव्हता. आपल्या सार्वजनिक रुग्णालयातली बेसुमार गर्दी आणि गलथानपणा याचे भान मला या विभागाने दिले. हे झाले बाह्य़ स्वरूप, परंतु विभाग चालवण्यात बॉसविक या बॉसने प्रेमाचा कणभरही अंश ठेवलेला नाही हेही माझ्या लक्षात आले होते. हडेलहप्पी नव्हती, परंतु मानवी संबंधाबद्दल कणव नसल्यातच जमा होती. त्यामुळे विभागात खदखद होती. एका महिन्याच्या आतच मी या विभागाचे माप घेतले. मुंबईला असताना विषयांचे पुस्तक पाठ केले होते. राऊंड चालू असताना चर्चा होत तेव्हा काय करायला हवे याचे माझे निदान अचूक असे. हळूहळू माझे गारूड तयार झाले आणि विभागात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांच्या किल्ल्या माझ्या हातात अप्रत्यक्षपणे आल्या आणि डॉ. बॉसविक यांनी माझ्यावर जबाबदारी टाकण्यास सुरवात केली. मला देशांतर्गत परिषदांना पाठवले. भाजलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्य शस्त्रक्रिया असे त्वचारोपणाची. ती भारतात अजूनही हातात चाकू किंवा वस्तरा धरून करतात. या विभागात त्यासाठी विजेवर चालणारा वस्तरा होता तेव्हा कौशल्य दाखवण्याचाही प्रश्न नव्हता. मी ऑपरेशनच्या थिएटरचा जणू ताबाच घेतला. माझ्या हाताखालच्या निवासी डॉक्टरांनी आणि परिचारिकांनी शिकण्यासाठी माझ्याभोवती कोंडाळे करायला सुरवात केली आणि त्यातून जवळीक वाढली. दिवसभर काम आणि नंतर निमित्त शोधून पार्टी असा कार्यक्रम सुरू झाला. वातावरण तरुणाईचे होते. बरीच मुलेमुली अविवाहित होत्या. वातावरण धुंद असे. मी एकटा असूनही कधीही ‘नातिचरामी’ केले नाही, परंतु विभागातील लोकप्रियता आणि हे वातावरण यांच्या बातम्या साहेबांपर्यंत त्यांच्या गुप्तहेरांनी पोहोचवायला सुरुवात केली. हा माणूस आता अतिक्रमण करू लागला आहे असे साहेबाच्या मनाने घेतले आणि लगेचच हिवाळा तोंडावर आला असताना ‘मला प्लास्टिक सर्जरीच्या इतर विभागात तुम्ही कधी संधी देणार,’ असा प्रश्न विचारून मी अवघड जागेत हात घातला आणि स्वारी बिनसली आणि मला नामोहरम करण्यासाठी निर्णय घेऊ लागली. सुदैवाने किंवा दुर्दैवाने मुख्य रुग्णालयाच्या इतर विभागांतही इतर काही कारणांनी अस्वस्थता होती त्याचे पडघम वाजू लागले होते. इथले अनेक निवासी वैद्यकीय उमेदवार अनेक देशांतले होते. त्यांनी एक संघटना केली आणि त्यांच्या चर्चेत मी निवासी डॉक्टरांचा संप पूर्वी केला आहे, असे बडबडलो आणि ते त्रांगडे माझ्या गळ्यात पडले. त्याबद्दल पुढच्या लेखात.
– रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस : अतिरक्तदाबावरील उपचार
माझ्या पंचेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ आयुर्वेदीय चिकित्साकाळात, अनेकानेक रक्तदाब वाढलेल्या रुग्णांकरिता मी खूप औषधे सुचविण्यापेक्षा तीन सोप्या उपायांचा आग्रह धरत असतो. उशीशिवाय दहा मिनिटे शवासनात पडून राहून रक्तदाब कमी होतो का हे तपासावे. शक्यतो मीठ पूर्णपणे बंद करावे. बहुतेक वैद्यकीय चिकित्सकांकडे येणारे रुग्ण हे फारसे शारीरिक श्रम करणारे नसतात. ही मंडळी बहुधा व्हाईट कॉलर, ब्लू कॉलर, टेबलवर्क करणारी असतात. ‘जो माणूस खड्डे खणतो, ओझी वाहतो, शारीरिक श्रम करून घाम गाळतो अशा श्रमजीवी कामगार, शेतमजूर’ यांनाच मिठाची गरज असते. डोक्यावर पंखा किंवा ऑफिसमध्ये ए.सी., भरपूर पौष्टिक आहार व व्यायामाचा अभाव व मीठ असणारे लोणची, पापड असे पदार्थ कटाक्षाने टाळावयास हवेतच. असे केल्याने वाढत्या रक्तदाबाचे प्रमाण लगेचच आटोक्यात येते. बेलाची त्रिदळे किंवा दहा बेलाची छोटी पाने, एक कप पाण्यात उकळून, अर्धा कप उरवून रोज सकाळी, काही काळ घेतल्यास वाढलेला रक्तदाब लगेच खाली येतो. गोक्षुरादि गुग्गुळ सकाळ सायंकाळ ३ गोळय़ा, रसायनचूर्ण १ चमचा ही रक्तदाबावरची हुकमी औषधे सर्वाकरिताच, नेहमीकरिता सत्वर गुण देतात. स्थूल, मधुमेही व्यक्तींकरिता वरील दोन औषधांबरोबर आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा ही जादा औषधे द्यावीत. छातीत धडधड, धाप लागणे, हृदयरोगाची पाश्र्वभूमी असल्यास शृंगभस्म, सुवर्णमाक्षिकादि वटी सकाळ-संध्याकाळ व जेवणानंतर अर्जुनारिष्ट घ्यावे. रक्तदाब वाढावयास झोपेचा अभाव, खंडित निद्रा असे असल्यास निद्राकर वटी झोपताना घ्याव्या. रक्तदाब वाढण्याच्या कारणांमध्ये डोकेदुखी, आम्लपित्त अशी लक्षणे असल्यास लघुसूतशेखर गोळय़ा घ्याव्या. मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढला असल्यास ब्राह्मीवटी, लघुसूतशेखर सकाळ-सायंकाळ; जेवणानंतर सारस्वतारिष्ट व रात्री निद्राकरवटी घ्यावी. अर्धागवाताचा धोका संभवू नये म्हणून दशमूलारिष्ट भोजनानंतर घ्यावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत : ४ मे
१९१८ > अद्भुतवादी निसर्ग कवितेच्या प्रवाहाला नितळ मराठी रूप देणारे ‘बालकवी’ म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे निधन. वयाच्या १३ वर्षी लिहिलेल्या ‘वनमुकुंद’ या कवितेपासून अव्याहत काव्यलेखन करणारे बालकवी २८व्या वर्षी रेल्वे रूळ ओलांडताना जिवास मुकले. ‘आनंदी-आनंद’, ‘फुलराणी’, ‘अरुण’, ‘निर्झरास’, ‘औदुंबर’ या कविता त्यांच्याच आणि ‘सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनि घ्यावे’ किंवा ‘स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो? सोडुनि स्वार्था तो जातो’ सारख्या काव्यपंक्ती लिहिणारे बालकवीच! ‘बालकवींची कविता’ या समग्र काव्यसंग्रहाची गोडी आज ९५ वर्षांनीही टिकून आहे.
१९८० > अजातशत्रू आणि चतुरस्र साहित्यिक अनंत आत्माराम काणेकर यांचे निधन. ‘चित्रा’ साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक म्हणून लघुनिबंध या प्रकाराला त्यांनी नेटके लालित्य दिले, ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’, ‘रक्ताची फुले’ या प्रवासवर्णनांनाही साहित्यिक बाज दिला, सात नाटके लिहिली आणि नवकथेच्या प्रवाहातही सामील झाले; परंतु मूळचे ते कवी. ‘चांदरात व इतर कविता’ हा काव्यसंग्रह रूढ काव्यविचाराला धक्के देणारा ठरला.
– संजय वझरेकर