टस्सर रेशीम हे कोसा रेशीम नावाने पण ओळखले जाते. रेशीम किडा अर्जुन, ओक इत्यादी झाडांच्या पानावर पोसून या रेशीम कोषाची निर्मिती केली जाते. हे रेशीम उत्तम पोतासाठी आणि नसíगक सोनेरी रंगासाठी प्रसिद्ध आहे. तुती रेशमापेक्षा या रेशमाची तंतूलांबी कमी असते, म्हणून याचा टिकाऊपणाही थोडा कमी असतो.
टस्सर रेशमाचा वापर साडय़ा विणण्याकरिता तसेच रेशमाचा रुबाबदार पोशाख तयार करण्यासाठी केला जातो. भारतातील पारंपरिक वस्त्रांची निर्मिती टस्सर रेशमाने सहज करता येते. रेशमाच्या नसíगक सोनेरी रंगामुळे याने विणलेल्या कापडावर भरतकाम उठून दिसते. शिवाय निसर्गाशी साधम्र्य असलेली डिझाइन छापण्यासाठीही हे रेशमी कापड उपयुक्त ठरते. फुलांचे नक्षीकाम तसेच झाडे, वेल, कळ्या, पाने इत्यादी चितारलेली, नक्षीकाम केलेले टस्सर रेशमाचे कापड किंवा साडी उठावदार दिसते.
टस्सर रेशमाचे उत्पादन भारतात मुख्यत्वे झारखंड प्रांतात होते. तिथल्या ग्रामीण जनतेला हे काम अवगत आहे. पूर्वापार झारखंडमधील ग्रामीण, खास करून आदिवासी, स्त्रियांना या टस्सर रेशमाच्या साडय़ा, ड्रेस मटेरियल विणण्यास शिकवलेले होते. आता इतर सर्व वस्त्रोद्योगांप्रमाणे याही ठिकाणी यांत्रिकीकरणाचा प्रघात पडला आहे. टस्सर रेशीम उद्योगात मोठय़ा प्रमाणात ग्रामीण तसेच आदिवासी महिला काम करतात. त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिलेले असते. या स्त्रिया १० मीटर टस्सर कापड तयार करायला तीन दिवस घेतात. त्यांना एका महिन्यात १० साडय़ा विणण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागते. रुपये तीन हजार ते साडेतीन हजारात ही साडी विकली जाते. या साडीमागे रुपये दीड हजार ते दोन हजार विणणाऱ्या स्त्रीला मिळतात.
रासायनिक रंगांच्या उपलब्धतेमुळे हस्तकलेच्या वस्तू, पडदे, चादरी वगरे घरगुती वापराची वस्त्रे तसेच साडय़ा व ड्रेस मटेरियल अशा वेगवेगळ्या उपयोगासाठी टस्सर रेशमी कापडाचा उपयोग केला जातो. त्याची युरोप, अमेरिकेसह अनेक देशात निर्यात केली जाते. टस्सर रेशमाचा पोत इतर प्रकारच्या रेशमापेक्षा वेगळा असतो. ह्या रेशीम वस्त्राला सच्छिद्रता असते. त्यामुळे इतर रेशमापेक्षा या रेशमाची वस्त्रे उष्ण प्रदेशात वापरणे सोयीचे ठरते.
दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
संस्थानांची बखर – अक्कलकोट संस्थानचा कारभार
छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक पुत्र फतेहसिंह भोसले यांनी, स्वतला मिळालेल्या अक्कलकोटच्या जहागिरीला एका छोटय़ा राज्याचे स्वरूप आणले होते. शहाजी बाळासाहेब भोसले, मालोजी बाबासाहेब, विजयसिंहराव राजे भोसले हे फतेहसिंहांनंतर झालेले अक्कलकोटचे राजे या शासकांचा शिवाजी महाराजांच्या घराण्याशी नातेसंबंध असल्यामुळे भारतातील प्रत्येक मराठा शासकाशी दूरान्वये का होईना, यांचे रोटीबेटीव्यवहार राहिले आहेत. मालोजी बाबासाहेब राजे भोसले हे अक्कलकोटचे शासक स्वामी समर्थाचे भक्त. ते स्वामींच्या दर्शनाला नियमित जात असत. त्यांच्या आग्रहामुळे स्वामींचे अक्कलकोट येथे अधिक वास्तव्य झाले.
अक्कलकोट राज्याच्या राजकीय इतिहासात विशेष काही घटना घडली नाही. १८२० साली फतेहसिंह द्वितीयच्या कारकीर्दीत सातारा राज्य उतरणीला लागल्यावर ईस्ट इंडिया कंपनीने हस्तक्षेप करून फतेहसिंह द्वितीय यांनाच राजेपदी ठेवून देखरेखीसाठी ब्रिटिश अधिकारी अक्कलकोटात ठेवला. १८२९ साली बोरगावच्या सरदेशमुखांनी बंड आणि इतर काही उचापती केल्यामुळे ब्रिटिशांनी आपली सन्य तुकडी तिकडे पाठवूनही बंड आटोक्यात येईना. अखेरीस साताऱ्याच्या ब्रिटिश निवासी अधिकाऱ्याच्या मध्यस्थीने हे बंड मिटले. नंतरच्या चौकशीत या बंडात अक्कलकोटचे राजे शहाजीराजे भोसले यांचा हात असल्याचे सिद्ध झाल्यावर ब्रिटिश रीजंटची नियुक्ती झाली.
१८४८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने सातारा राज्य खालसा केल्यावर अक्कलकोट राज्य कंपनी सरकारच्या आधिपत्याखाली जाऊन त्यांचे अंकित संस्थान बनले. संस्थानाच्या संरक्षणासाठी कंपनीने घोडदळ तनात केल्याबद्दल त्याचा वार्षकि खर्च १४,५०० रुपये याचा भार संस्थानावरच पडला. ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य अक्कलकोट संस्थानाचे राजचिन्ह होते.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com