टस्सर रेशीम हे कोसा रेशीम नावाने पण ओळखले जाते. रेशीम किडा अर्जुन, ओक इत्यादी झाडांच्या पानावर पोसून या रेशीम कोषाची निर्मिती केली जाते. हे रेशीम उत्तम पोतासाठी आणि नसíगक सोनेरी रंगासाठी प्रसिद्ध आहे. तुती रेशमापेक्षा या रेशमाची तंतूलांबी कमी असते, म्हणून याचा टिकाऊपणाही थोडा कमी असतो.
टस्सर रेशमाचा वापर साडय़ा विणण्याकरिता तसेच रेशमाचा रुबाबदार पोशाख तयार करण्यासाठी केला जातो. भारतातील पारंपरिक वस्त्रांची निर्मिती टस्सर रेशमाने सहज करता येते. रेशमाच्या नसíगक सोनेरी रंगामुळे याने विणलेल्या कापडावर भरतकाम उठून दिसते. शिवाय निसर्गाशी साधम्र्य असलेली डिझाइन छापण्यासाठीही हे रेशमी कापड उपयुक्त ठरते. फुलांचे नक्षीकाम तसेच झाडे, वेल, कळ्या, पाने इत्यादी चितारलेली, नक्षीकाम केलेले टस्सर रेशमाचे कापड किंवा साडी उठावदार दिसते.
टस्सर रेशमाचे उत्पादन भारतात मुख्यत्वे झारखंड प्रांतात होते. तिथल्या ग्रामीण जनतेला हे काम अवगत आहे. पूर्वापार झारखंडमधील ग्रामीण, खास करून आदिवासी, स्त्रियांना या टस्सर रेशमाच्या साडय़ा, ड्रेस मटेरियल विणण्यास शिकवलेले होते. आता इतर सर्व वस्त्रोद्योगांप्रमाणे याही ठिकाणी यांत्रिकीकरणाचा प्रघात पडला आहे. टस्सर रेशीम उद्योगात मोठय़ा प्रमाणात ग्रामीण तसेच आदिवासी महिला काम करतात. त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिलेले असते. या स्त्रिया १० मीटर टस्सर कापड तयार करायला तीन दिवस घेतात. त्यांना एका महिन्यात १० साडय़ा विणण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागते. रुपये तीन हजार ते साडेतीन हजारात ही साडी विकली जाते. या साडीमागे रुपये दीड हजार ते दोन हजार विणणाऱ्या स्त्रीला मिळतात.
रासायनिक रंगांच्या उपलब्धतेमुळे हस्तकलेच्या वस्तू, पडदे, चादरी वगरे घरगुती वापराची वस्त्रे तसेच साडय़ा व ड्रेस मटेरियल अशा वेगवेगळ्या उपयोगासाठी टस्सर रेशमी कापडाचा उपयोग केला जातो. त्याची युरोप, अमेरिकेसह अनेक देशात निर्यात केली जाते. टस्सर रेशमाचा पोत इतर प्रकारच्या रेशमापेक्षा वेगळा असतो. ह्या रेशीम वस्त्राला सच्छिद्रता असते. त्यामुळे इतर रेशमापेक्षा या रेशमाची वस्त्रे उष्ण प्रदेशात वापरणे सोयीचे ठरते.
दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा