दुहेरी उपयोगाच्या जाती अंडी व मांस या दोन्ही कारणांसाठी जोपासल्या जातात. याच्या महत्त्वाच्या जाती आहेत- अ) ऱ्होड आयलंड रेड ब) ब्लॅक एस्ट्रोलार्प.
अ) ऱ्होड आयलंड रेड : या जातीचे मूळ ऱ्होड आयलंड या अमेरिकेच्या बेटावर आहे. त्यांचा रंग तांबडा किंवा गडद तपकिरी असतो. त्या अंडी उत्पादन व वजनासाठी प्रसिद्ध आहेत. प्रतिकूल वातावरणातसुद्धा त्या टिकून राहतात. गावरान कोंबडय़ांसारखे स्वयंपाकघरातील कचरा, वाया गेलेले पदार्थ यांवर या कोंबडय़ा जगतात. या कोंबडय़ा मोकळ्या सोडता येतात. त्या तपकिरी रंगाची मोठी अंडी देतात. शासनातर्फे त्यांची पिल्ले वेगवेगळ्या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना, आदिवासींना तसेच महिला सबलीकरणासाठी वाटण्यात आलेली आहेत.
ब) ब्लॅक एस्ट्रोलार्प : ही जात ऑस्ट्रेलियात सापडते. यांची चोच, पिसे व कातडी पूर्णत: काळी असते. म्हणून तिला ब्लॅक एस्ट्रोलार्प म्हणतात. त्या लालसर वजनदार अंडी देतात. गुबगुबीत असतात. पिसे शरीरावर जास्त असतात. यांचा मांसल जातीच्या पक्ष्यासोबत संकर करून ब्रॉयलर पक्षी तयार केले जातात.
भारतात वैशिष्टय़पूर्ण कोंबडय़ांच्या जातींची संख्या अतिशय कमी आहे. यामध्ये कडकनाथ, असील, नेकेड नेक इत्यादी कोंबडय़ांचा समावेश होतो.
(१) कडकनाथ : ही जात मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात सापडते. पक्ष्याचे शरीर, मांस, रक्त पूर्णत: काळे असते. मांस चविष्ट व औषधी असते. या अतिशय काटक असून प्रतिकूल वातावरणातही टिकून राहतात. या पक्ष्याच्या वाढीसाठी, वृद्धीसाठी संकर करण्यात येत आहे. तसेच काळ्या रंगास जबाबदार असलेल्या गुणसूत्रांसंबंधी मोठय़ा प्रमाणावर संशोधन चालू आहे.
(२) असील : या जाती आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान येथे सापडतात. असील कोंबडे झुंजीसाठी प्रसिद्ध आहेत. झुंज चुरशीची होऊन त्यातील एक कोंबडा मेल्याशिवाय झुंज सुटत नाही. बहुतांशी लाल रंगाच्या असतात. पाय व मान लांब असतात. शेपटीचे पंख लांब असतात. अंडी उत्पादन कमी असून नराचे वजन सरासरी अडीच किलो, तर मादीचे १.५ किलो असते.
(३) नेकेड नेक :  वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी यांना मानेवर पिसे नसतात. ते दमट व उष्ण वातावरणात तग धरतात. घामाच्या ग्रंथी नसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जे देखे रवी..  – भाषा
मी आहे त्यापेक्षा जेव्हा जास्त मूर्ख होतो तेव्हा तीस चाळीस वर्षांपूर्वी रानावनात झोपडी बांधून राहाण्याचे धाडस केले आहे. नदीत अंघोळ, सूर्यचुलीवर जेवण आणि वेड लागेल एवढा एकांत तेव्हा मी अनुभवला आणि लोक गावात का राहतात हे कळले. त्यावेळी
तहानेने तहानच प्यावी। भुकेल्याने भूक खावी। मोजाव्या वाऱ्यांच्या झुळुका। हातांनी।
एवढे काही झाले नाही, परंतु
झाडांशी बोलावे। थंडीचे वस्त्र नेसावे। उन्हाचे पांघरूण करावे। आणि पावसाच्या घरात राहावे।। असे माझ्या झोपडीचे स्वरूप होते. या रूपांतरित ओव्या निर्गुण निराकाराच्या उपासनेचा अवघडपणा सांगतात राखेल तो चाखेल या न्यायाने ज्याने माझी झोपडी बांधली तो मला संगत करत असे. एकदा रात्री पावसाळ्यात असंख्य किडय़ांसोबत कंदिलाच्या उजेडात, आजूबाजूला पुरुषभर उगवलेल्या गवताच्या साक्षीने आम्ही गप्पा मारल्या तेव्हा तो निरक्षर म्या साक्षराला म्हणाला, ‘‘तुम्ही शोध लावता, तुमचे नाव पेपरला येते. मला काही तरी सोपे सांगा. नेहमी तुम्ही बोलता तेव्हा कानाला बरे वाटते, पण कळत नाही.’’
तेव्हा मी त्याला एक गोष्ट सांगितली. आपली त्वचा रक्तावर जगते. शुद्ध रक्त आणण्यासाठी एक नळी असते. अशुद्ध रक्त घेऊन जाण्यासाठी दुसरी नळी असते. जर शुद्ध रक्ताची नळी कापली तर तो त्वचेचा कापलेला तुकडा मरायला हवा. आमच्या प्रयोगात असे आढळले की अशुद्ध रक्त परत घेऊन जाणाऱ्या नीलेवर तो त्वचेचा तुकडा जगू शकतो. आणि याचे कारण त्या अशुद्ध रक्ताच्या नळीत रक्ताचा ‘पुढे मागे पुढे मागे’ असा झोका सुरू होतो. म्हणून रक्त गोठत नाही. पुढे संकट येईल असा विचार (!) करून निसर्गात ही किमया घडली असणार. तेव्हा तो माझा निरक्षर श्रोता म्हणाला, ‘‘म्हणजे नदीचा ओघ आता समुद्राच्या ‘भर्ती होटी’सारखा झाला.’’
काय मंतरलेला क्षण होता तो. याने समुद्र एकदाच बघितला होता, पण ज्याला दृष्टांत किंवा उपमा वगैरे अलंकार म्हणतात तो त्याने आमच्या संवादावर चढवला. तो होटी म्हणाला ती खरे तर होती ओहोटी. (संस्कृत शब्द वहती म्हणजे ओढा). ओहोटीच्या वेळेला पाणी आत ओढले जाते (ओढले जाते-ओढा) त्याही आधीचा शब्द आहे वह म्हणजे घेऊन जाणे. दुसरा एक तसाच शब्द आहे ओहोळ. त्याने भर्ती हा शब्द रफार काढल्यासारखा वापरला. जेव्हा काही तरी भरते तेव्हा ती भरती होते. भार या संस्कृत शब्दाचा अर्थ वजन असा आहे. भरती (भरगच्च भरलेली) वगैरे शब्द आणि हा ओहोटी शब्द, संस्कृतातून बदल होत आले आहेत. मराठीबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  – थायरॉइडग्रंथी आजार : आयुर्वेदीय उपचार  
माझ्याकडे गेली अनेक वर्षे ‘विविध तक्रारी व थॉयराईड गोळ्यांचा नियमित मारा’ अशा मायभगिनी कथा मी ऐकत असतो.  पूर्णपणे फक्त आयुर्वेदीय उपचार व सल्लामसलत देत असतो  रुग्णांचे रिपोर्ट असल्यास  रक्ताचे प्रमाण, ईएसआर, डब्ल्यू बी सी, प्लेटलेट काऊंट, वजन, मलमूत्रावस्था, मासिक पाळीच्या तक्रारी यांची नोंद घेतो व पुढील लक्षणांनुरूप उपचार करतो.
१) थॉयराईड व स्थौल्य : आरोग्यवर्धिनी,चंद्रप्रभा, गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळ, आम्लपित्तवटी, रसायन चूर्ण. (सर्व सुंठचूर्णासह) अतिस्थौल्य असल्यास गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळाचा मोठा डोस. (२) गळा, मानेच्या गाठी : आरोग्यवर्धिनी, त्रिफळा, गोक्षुरादि, लाक्षादि कांचनार, चंद्रप्रभा प्र. ३ गोळ्या दोन वेळा सुधाजलाबरोबर. अमरकंद ५ ग्रॅमचा नित्य काढा लाभप्रद ठरतो. आवश्यक तेथे लेपगोळीचा दाट व गरम बाह्य़ोपचार. (३) पांडुता व आळस : आम्लपित्तवटी (भोजनोत्तर), चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादिवटी, शृंगभस्म, लाक्षादि, गोक्षुरादि गुग्गुळ प्र. ३ गोळ्या २ वेळा. (४) मासिकस्राव कमी – कन्यालोहादि, कठपुतळी, कृमीनाशक, गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळ, चंद्रप्रभा प्र. ३ गोळ्या २वेळा. भोजनोत्तर आर्तव काढा, कुमारी आसव २ चमचे. (५) चिडचिड- रात्री निद्राकरवटी ६ गोळ्या,  लघुसूतशेखर ३ गोळ्या, ब्राह्मीवटी ६ गोळ्या २ वेळा, भोजनोत्तर सारस्वतारिष्ट. (६) अनपत्यता, पांडुता : सुवर्णमाक्षिकादि, चंद्रप्रभा, शंृग प्र. ३, पुष्टीवटी १, आम्लपित्तवटी ३, २ वेळा रात्री आस्कंदचूर्ण, दोन्ही जेवणांनंतर अश्वगंधारिष्ट. (७) अत्यंत कृशता : स. च्यवनप्राश, अश्वगंधापाक, शतावरी कल्प, धात्रीरसायन यापैकी एक. भूक कमी असल्यास भोजनोत्तर कुमारी आसव, उदरवात असल्यास पिप्पलादिकाढा, पोटदुखीस पंचकोलासव, चिकटमलप्रवृत्तिकरिता फलत्रिकादि काढा. (८) गर्भाशयाची अपुरी वाढ : थॉयराईडचे अत्यल्प प्रमाण असताना शतावरी, आस्कंद प्र. १५ ग्रॅम, ज्येष्ठमध ५ ग्रॅम यांचा काढा, , सुवर्णमाक्षिकादि, चंद्रप्रभा, शंृग, पुष्टीवटी, शतावरीघृत.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २३ ऑगस्ट
१९१८ > ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक, कवी, समीक्षक व निबंधकार गोविंद विनायक ऊर्फ विंदा करंदीकर. त्यांच्या प्रारंभीच्या कवितांवर साम्यवादी विचारांचा प्रभाव होता. स्वेदगंगा, धृपद, जातक, मृद्गंध हे त्यांचे काव्यसंग्रह त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. ‘राणीची बाग’, ‘एकदा काय झाले’, ‘सशाचे कान’, ‘सर्कसवाला’ आणि ‘पिशी मावशी आणि तिची भुतावळ’ हे त्यांचे बालकविता संग्रह लोकप्रिय झाले. ‘स्पर्शाची पालवी’ आणि ‘आकाशाचा अर्थ’ (लघुनिबंध), ‘परंपरा आणि नवता’ (समीक्षापर निबंध), ‘अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र’ (समीक्षासिद्धान्त) गटेचे ‘फाउस्ट’ (अनुवाद) आणि या कोणत्याही प्रकारात न मोडणारा ‘अष्टदर्शने’ हा  तत्त्वज्ञानसार सांगणारा ग्रंथ, ही त्यांची पुस्तके  
१९२२ > वैदिक विधी, धर्मशास्त्र आदी विषयांवर इंग्रजी/ मराठीत लिहिणारे सदाशिव अंबादास डांगे यांचा जन्म. ‘पुराणकथांचा अर्थ : वाद आणि विवेचन’, ‘हिंदूधर्म आणि तत्त्वज्ञान’ ही त्यांची मराठी पुस्तके.
१९२३ > अभ्यासू समीक्षक वसंत दिगंबर कुलकर्णी यांचा जन्म. ‘लीळाचरित्र : एक अभ्यास’, ‘केशवसुतांचे अंतरंग’, ‘अर्वाचीन मराठी सारस्वतकार’, ‘संतसाहित्याची संकल्पना’ ही त्यांची  उल्लेखनीय पुस्तके.
– संजय वझरेकर

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Types of chicken