मधमाश्यांच्या किमान तीन प्रजाती सतराव्या शतकापर्यंत फक्त पौर्वात्य प्रदेशापुरत्याच सीमित होत्या. नंतर माणसाने मधमाश्यांची मोहोळं स्वत:बरोबर देशोदेशी नेऊन मध आणि मेण मिळवायला सुरुवात केली. मात्र तत्पूर्वी मधमाश्यांचाही संचार काही प्रमाणात नसíगक स्थलांतरामुळे झाला होता आणि उत्क्रांतीच्या नियमाप्रमाणे विविध जाती प्रजातींची उत्पत्तीही हळूहळू सुरू झाली होती. त्यामुळेच पौर्वात्य भूमीत सापडणाऱ्या सातेरी, फुलोरी आणि आग्या या मूळ जातींपासून युरोपीय आणि अमेरिकन सातेरी प्रकारच्या ‘एपिस मेलिफेरा’ या नव्या जातीची निर्मिती झाली आणि कालांतराने आधुनिक मधमाश्या पालनासाठी तिचा प्रचार आणि प्रसार जगभर झाला.
भारतीय मधमाश्यांची उत्पादनक्षमता दर मोहोळामागे १५ ते २० किलो तर आयात मधमाश्यांची उत्पादनक्षमता ३० ते ४० किलो असल्याचं अनुभवाला आलं. साहजिकच मधनिर्मात्या मधपाळांचं ते एक मोठं आकर्षण ठरलं. भारतीय सातेरी मधमाश्यांचं शरीरमान तुलनेनं लहान, एका मोहोळातील त्यांची संख्याही २० ते २५ हजार एवढी कमी असते. याउलट पाश्चात्य मेलिफेरा जातीच्या मोहोळात ३५ ते ४० हजार कामकरी मधमाश्या असतात. त्यांची उड्डाणकक्षाही एक किलोमीटर त्रिज्येबाहेर पोहोचते. त्यामुळे त्या तुलनेने अधिक मोठय़ा परिसरातून मधसंकलन करू शकतात.
भारतीय मधमाश्यांची तुलनेने वर्षांतून अधिक वेळा मोहोळ सोडून नव्या मोहोळ स्थापनेची प्रवृत्तीसुद्धा मधसंकलन व्यवसायातील एक व्यावहारिक अडचण समजली जाते. याउलट पाश्चात्त्य मोहोळं अधिक काळ स्थिर राहतात. आधुनिक तंत्रज्ञान वापरून मोहोळातील राणीचं कृत्रिम रेतन करता येतं आणि नव्या राण्यांची पदासही सुलभतेने करता येते. त्यामुळेसुद्धा त्यांच्याकडे मधपाळ अधिक आकृष्ट झाल्याचं दिसतं. तरीसुद्धा भारतीय मधमाश्या पालनात शास्त्रीय पद्धती वापरून सुधारणा करणं शक्य आहे. काही अधिक उत्पादक भारतीय वाण पाश्चात्त्य मधमाश्यांशी निश्चितपणेच यशस्वीरीत्या स्पर्धा करू शकतील. दक्षिणेत कन्याकुमारीपासून उत्तरेकडे जात असता मधमाश्यांच्या शरीराचा व मोहोळांचा आकार नसíगकरीत्या वाढत गेल्याचं माझ्या संशोधनातून सिद्ध झालंय. त्यांची निवड पद्धतीने गुणात्मक निवड करीत गेल्यास काश्मीरमध्ये आढळणाऱ्या मधमाश्यांच्या पाश्चात्त्य मोहोळांशी बरोबरी करणाऱ्या व अधिक उत्पादन करणाऱ्या मधमाश्यांची निर्मिती करता येईल.
– डॉ.क. कृ.क्षीरसागर (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
जे देखे रवी..: इंग्लंड
१९८२च्या सुरुवातीला मला Royal Institute of Orthopedics असे काहीतरी नाव असलेल्या संस्थेकडून पत्र आले की ‘तुम्ही आमच्या संस्थेमध्ये आपल्या नव्या शस्त्रक्रियेबद्दल भाषण देण्यास अनुकूल आहात की कसे हे कळवावे’ त्यात भाषण देण्याबद्दलच्या मानधनाचा उल्लेख होता, परंतु प्रवास खर्च देता येणार नाही अशी कबुली होती. माझ्या खिशात दिडकी नव्हती. महिन्याकाठी मिळत असत त्यावरच संसार. मी ते पत्र घेऊन निर्लजपणे पैसे मागू लागलो, पण फिरती फारशी झालीच नाही. ‘कासव छाप’ डासांना मारणाऱ्या एका वस्तूचे उत्पादक गोखले यांना मी भेटायला गेलो, त्यांनी माझे म्हणणे बरोबर पाच मिनिटे ऐकले, मग त्यांनी एक खण उघडला आणि ५००० रुपये असा आकडा लिहिलेला एक लिफाफा मला दिला. मी म्हणालो, ‘लवकरात लवकर परत करीन’ तेव्हा ते म्हणाले ‘तुम्ही मिळवू लागाल तेव्हा असेच देत जा.’
लंडनमध्ये माझी राहण्याची व्यवस्था Nue field वसतिगृहात विनामूल्य करण्यात आली होती. ते वसतिगृह अगदी साधे होते. राहण्याच्या खोल्या ऐसपैस, परंतु इंग्रज लोक विचित्र हेच खरे. दर मजल्यावर सामायिक न्हाणीघर होते. तेव्हा सकाळी दात घासताना आणि अंघोळ करताना अनेक देशातली भाषणे देण्यासाठी आलेली दिग्गज मंडळी येथे गप्पा मारत HI , HELLO करताना भेटली. त्या वसतिगृहाच्या शेजारीच इंग्रज सम्राटांचा राजवाडा (बकिंगहॅम पॅलेस)आणि त्यांचे प्रार्थना स्थळ (वेस्टमिन्स्टर अॅबे) यांना जोडणारा हमरस्ता होता. त्या हमरस्त्यावरून ८२ च्या जून महिन्यात राजपुत्र चार्लस आणि डायना यांच्या लग्नाची मिरवणूक म्यां डोळे भरून पाहिली. काय जोडपं होतं ते! तिथे जमलेल्या हजारोंनी, या जोडप्याला दृष्ट लावली असणार, कारण त्यांचे लग्न नुसतेच मोडले नाही तर नको त्या गोष्टींनी बरबटले आणि शेवटी डायना अपघातात गेली तेव्हा जग हळहळले.
माझे लंडनमधले भाषण उत्तम तर झालेच, परंतु त्या तीनचार आठवडय़ांत अनेक ठिकाणी भाषणे देताना मी मुंबईतल्या लोकमान्य टिळक रुग्णालयाचे नाव घेत टिळकांचे Freedom is my birthright हे वाक्यही उद्धृत करत असे. आता असे वाटते की खरे तर हा माझा अनाठायी अतिशहाणपणा होता. गंमत अशी की कोठल्याही इंग्रज विभागप्रमुखाने त्या दाखवण्याला हरकत घेतली नाही. उलट टिळकांविषयी मोठय़ा आपुलकीने चौकशी केली.
या लोकांनी जगावर राज्य का गाजवले हे त्यावरून कळले. हिंदुस्थान तर त्यांच्या राज्याचा मुकुटमणी होता, परंतु त्यांच्यातल्याच एकाने भारतात आधुनिक शिक्षण पद्धती लागू करताना, ‘हे भारतीय लोक शिकतील, सवरतील, मग स्वातंत्र्य मागतील, तेव्हाच या शिक्षणाचा खरा उपयोग झाला असे मी समजेन,’ असे म्हटले होते, त्याचे नाव मॅकॉले.
– रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस : मधुमेह : भाग २
लक्षणे – मधुमेहातील लक्षणांच्या अगोदर त्याची पूर्वसूचना देणारी लक्षणे समजून घेणे आवश्यक आहे. मधुमेहाला पहिल्या अवस्थेतच आळा घालणे व बरा करणे/ ताब्यात ठेवणे शक्य होते.
पूर्वसूचना देणारी लक्षणे – खूप घाम येणे, अंगाला दरुगध येणे, शरीर शिथिल वाटणे, अंथरुणावर पडावेसे वाटणे किंवा खाली बसण्याची इच्छा होणे, झोप घ्यावीशी वाटणे, सुखी जीवन जगावेसे वाटणे, हृदय, डोळे, जीभ, कान यामध्ये मळ साठणे; शरीर स्थूल वाटणे, केस, नखे यांची फाजील वाढ होणे. थंड पदार्थाची आवड वाढणे, गळा व टाळू कोरडा होणे, तोंड गोड होणे, हातापायाची आग होणे, लघवीला मुंग्या लागणे.
प्रमुख लक्षणे – प्रमाणाच्या बाहेर भरपूर व वारंवार लघवी होणे. लघवीला घाण वास, गढूळ होणे. एका पायावर सूज येणे. चेहरा मलूल किंवा ओढलेला दिसणे किंवा अकारण तुकतुकीत दिसणे. वरवर पाहता अकारण थकवा येणे. हातापायास मुंग्या येणे, अंगाला खाज सुटणे, पोटऱ्या, पाय, दुखणे, तोंडाला पाणी सुटणे, इंद्रियांच्या तोंडाशी घाण मळ जमणे, ती संकुचित होणे. पूर्व रूपात सांगितलेली लक्षणे कमी अधिक प्रमाणात वाढणे. दृष्टी क्षीण होणे, हळूहळू दृष्टी क्षीण होणे. तोंडावर वारे जाणे; जीभ, ओठ, गाल वाकडे होणे, अर्धागवाताची लक्षणे दिसणे.
कारणे – अनुवंशिकता, कफवर्धक जड पदार्थ, पिष्टमय पदार्थ, साखर, गूळ, भाग, गहू, मीठ, डालडा, कडधान्ये, दही, फरसाण, पोहे, चुरमुरे, मेवामिठाई, बेकरी पदार्थ, मांसाहार यांचा अतिरेकी वापर, खूप पाणी पिणे, किमान हालचाल, व्यायाम न करणे, बैठे काम, मानसिक चिंता, कमी जास्त झोप, दुपारी झोप, रात्रौ जागरण. शहरातील अतिशय कृत्रिम राहणी, तळपायाचा मातीशी कधीही संबंध न येणे. शरीरांतून घामावाटे मलद्रव्य बाहेर पडण्यास अडथळा करणारे म्हणजेच कृत्रिम धाग्याचे कपडे वापरणे. सतत पंखा/वातानुकूलित व्यवस्था असलेल्या घरात वा कार्यालयात राहणे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत : २२ मे
१९७९ > कलासमीक्षक बाळकृष्ण मरतड दाभाडे यांचे निधन. रवींद्रनाथ टागोरांचे ‘गीतांजली’ वाचून त्यांनी तीन गद्यकाव्ये आणि दोन नाटिका लिहिल्या होत्या. ‘भारतीय चित्रकला’ हा प्रबंधवजा ग्रंथ आणि ‘सौंदर्याच्या शोधात’ हे सिंधु व आर्य संस्कृतींच्या काळातील वैशिष्टय़ांचा आढावा घेणारे पुस्तक त्यांनी लिहिले. ‘विद्यामंदिरात’ या पुस्तकातून त्यांचा शिक्षणविचार दिसला.
१९९१ > भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचे निधन. ‘गांधी व्हर्सस लेनिन’, ‘गुरुदेवाची हाक’ , ‘भारत’, ‘शिवाजी : त्यांचा आणि आमचा’ , ‘इतिहास कोण घडवतो?’, ‘नरकपुरी गवसली’ ही पुस्तके यांनी लिहिली होती. ‘इंदुप्रकाश’मध्ये उपसंपादक असलेल्या कॉ. डांगे यांनी पुढे ‘क्रांती’ हे साप्ताहिक सुरू केले होते. डॉ. अशोक चौसाळकरांनी त्यांचे अभ्यासू चरित्र लिहिले आहे.
१९९८ > समीक्षक-संपादक, नाटककार, पटकथा लेखक असा लौकिक मिळवणारे डॉ. मधुकर आष्टीकर यांचे निधन. वेदकालीन स्त्रिया, ध्वनिसिद्धांत, चांगदेव पासष्टी (संपादन) या अभ्यासू योगदानाखेरीज ‘तीन इसम १३ आणे’, ‘प्रत्येकाला जोडा चावतो’ अशा हलक्याफुलक्या नाटकांसह एकंदर ५७ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
– संजय वझरेकर