मधमाश्यांच्या किमान तीन प्रजाती सतराव्या शतकापर्यंत फक्त पौर्वात्य प्रदेशापुरत्याच सीमित होत्या. नंतर माणसाने मधमाश्यांची मोहोळं स्वत:बरोबर देशोदेशी नेऊन मध आणि मेण मिळवायला सुरुवात केली. मात्र तत्पूर्वी मधमाश्यांचाही संचार काही प्रमाणात नसíगक स्थलांतरामुळे झाला होता आणि उत्क्रांतीच्या नियमाप्रमाणे विविध जाती प्रजातींची उत्पत्तीही हळूहळू सुरू झाली होती. त्यामुळेच पौर्वात्य भूमीत सापडणाऱ्या सातेरी, फुलोरी आणि आग्या या मूळ जातींपासून युरोपीय आणि अमेरिकन सातेरी प्रकारच्या ‘एपिस मेलिफेरा’ या नव्या जातीची निर्मिती झाली आणि कालांतराने आधुनिक मधमाश्या पालनासाठी तिचा प्रचार आणि प्रसार जगभर झाला.
भारतीय मधमाश्यांची उत्पादनक्षमता दर मोहोळामागे १५ ते २० किलो तर आयात मधमाश्यांची उत्पादनक्षमता ३० ते ४० किलो असल्याचं अनुभवाला आलं. साहजिकच मधनिर्मात्या मधपाळांचं ते एक मोठं आकर्षण ठरलं. भारतीय सातेरी मधमाश्यांचं शरीरमान तुलनेनं लहान, एका मोहोळातील त्यांची संख्याही २० ते २५ हजार एवढी कमी असते. याउलट पाश्चात्य मेलिफेरा जातीच्या मोहोळात ३५ ते ४० हजार कामकरी मधमाश्या असतात. त्यांची उड्डाणकक्षाही एक किलोमीटर त्रिज्येबाहेर पोहोचते. त्यामुळे त्या तुलनेने अधिक मोठय़ा परिसरातून मधसंकलन करू शकतात.
भारतीय मधमाश्यांची तुलनेने वर्षांतून अधिक वेळा मोहोळ सोडून नव्या मोहोळ स्थापनेची प्रवृत्तीसुद्धा मधसंकलन व्यवसायातील एक व्यावहारिक अडचण समजली जाते. याउलट पाश्चात्त्य मोहोळं अधिक काळ स्थिर राहतात. आधुनिक तंत्रज्ञान वापरून मोहोळातील राणीचं कृत्रिम रेतन करता येतं आणि नव्या राण्यांची पदासही सुलभतेने करता येते. त्यामुळेसुद्धा त्यांच्याकडे मधपाळ अधिक आकृष्ट झाल्याचं दिसतं. तरीसुद्धा भारतीय मधमाश्या पालनात शास्त्रीय पद्धती वापरून सुधारणा करणं शक्य आहे. काही अधिक उत्पादक भारतीय वाण पाश्चात्त्य मधमाश्यांशी निश्चितपणेच यशस्वीरीत्या स्पर्धा करू शकतील. दक्षिणेत कन्याकुमारीपासून उत्तरेकडे जात असता मधमाश्यांच्या शरीराचा व मोहोळांचा आकार नसíगकरीत्या वाढत गेल्याचं माझ्या संशोधनातून सिद्ध झालंय. त्यांची निवड पद्धतीने गुणात्मक निवड करीत गेल्यास काश्मीरमध्ये आढळणाऱ्या मधमाश्यांच्या पाश्चात्त्य मोहोळांशी बरोबरी करणाऱ्या व अधिक उत्पादन करणाऱ्या मधमाश्यांची निर्मिती करता येईल.
– डॉ.क. कृ.क्षीरसागर (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा