अनेक मोनोसॅकॅराइड्सची साखळी असेल तर त्यास पॉलीसॅकॅराइड्स म्हणजे बहुशर्करा म्हटलं जातं. यकृतात आणि स्नायूंमध्ये साठवलं जाणारं ग्लायकोजन, धान्यांत मुबलक असणारं स्टार्च (पिष्टमय), वनस्पतींत आढळणारा तंतुमय भाग म्हणजे सेल्युलोज, तसेच काही प्राण्यांत आढळणारे कायटिन ही पॉलीसॅकॅराइड्स् कबरेदकांची उदाहरणं आहेत.
बहुशर्करा निसर्गत: अन्नऊर्जा साठवण्यासाठी आणि संरचनेसाठी वापरली जातात. ज्या बहुशर्करा ऊर्जा साठवण्यासाठी वापरल्या जातात, त्यांना संचयी बहुशर्करा म्हणतात. तर ज्या बहुशर्करा आवरण तयार करण्यासाठी किंवा बांधणीसाठी वापरतात, त्यांना संरचनी बहुशर्करा म्हणतात. सेल्युलोज, कायटिन हे संरचनी कबरेदकांचे प्रकार आहेत.
अजून एका प्रकारची बहुशर्करा आहे, जी सूक्ष्मजीवांमध्ये विशेषत: रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांमध्ये आढळते. काही जिवाणू स्वत:भोवती बहुशर्करेचं आवरण तयार करतात. त्यामुळे ते आपल्या प्रतिकारयंत्रणेला ओळखू येत नाहीत. अशा रीतीने बहुशर्करेच्या साहाय्याने जिवाणू स्वत:चा बचाव करू शकतात.
ग्लायकोजन, स्टार्च (तवकीर) या संचयी बहुशर्करा आहेत. अमायलोज आणि अमायोपेक्टिन यांनी बनलेलं स्टार्च म्हणजे ग्लुकोजची लांबलचक साखळी असते. काही अमायोपेक्टिनचे रेणू तर हजारो ग्लुकोजने बनलेले असतात. मानवामध्ये- प्राण्यांमध्ये शरीरात घेतलेल्या स्टार्चचं अमायलेजच्या साहाय्याने पचन केलं जातं. स्टार्चचे प्रथम माल्टोजमध्ये आणि त्यानंतर ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं.
शरीरातील सर्व अवयवांचे, स्नायूंचे, पेशींचे कार्य होण्यासाठी लागणारी ऊर्जा ग्लुकोज देते. शरीराची गरज भागवून राहिलेले ग्लुकोज, ग्लायकोजनच्या स्वरूपात यकृत आणि काही प्रमाणांत स्नायूंमध्ये साठवली जातात आणि जेव्हा ऊर्जेची आवश्यकता असेल तेव्हा वापरले जाते. म्हणजे शरीराला जर अन्नपुरवठा झाला नाही, ग्लुकोजची रक्तातील पातळी कमी झाली तर यकृत ग्लायकोजनचं रूपांतर पुन्हा ग्लुकोजमध्ये करतं. हे रूपांतरित ग्लुकोज रक्तामध्ये येतं आणि रक्तामधील साखरेचे प्रमाण संतुलित राखलं जातं. ग्लुकोजपासून मिळणारी ऊर्जा शरीराच्या कामासाठी वापरली जाते. म्हणजे शरीरात ग्लायकोजनचा साठा असेपर्यंत आपण काहीही न खाता राहू शकतो.
चारुशीला जुईकर (मुंबई), मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा