जमिनीच्या आतील जलस्रोतांना भूजल म्हणतात. पावसाचे पाणी नदी, नाले, ओढे यांतून वाहाते. धरणे, बांध, बंधारे, तलाव, शेततळी, पाझर तलाव असलेल्या ठिकाणी पाण्याचा साठा होतो. यातील १५ टक्के पाणी वाफेच्या स्वरूपात आणि झिरपण स्वरूपात व्यय पावते. २० ते २५ टक्के पाणी जमिनीत मुरते. अशा रीतीने भूजलनिर्मिती प्रक्रिया सुरू असते. पाऊस कमी झाला, अवर्षण झाले की पाण्यासाठी या भूजलाचा उपसा सुरू होतो. यामध्ये पिण्याचे पाणी व सिंचन या प्रमुख गरजा असतात. भूजल ही नैसर्गिक संपत्ती असल्याने त्यावर कोणाचीही मालकी नसते. परंतु हे भूजल ज्या वेळी कूपनलिकांद्वारे उपसले जाते, तेव्हा त्यावर हक्क सांगायला सुरुवात होते. किंबहुना यासाठी तंटेही घडतात. वास्तविकत: ज्या ठिकाणी शेतीपिके, पशुधन व पिण्यासाठी पाण्याची खरी गरज आहे, अशा ठिकाणी कूपनलिका घेऊन पाणी उपसणे रास्त ठरते. परंतु एक कूपनलिका पूर्ण कार्यक्षम असताना दुसरी, तिसरी कूपनलिका खोदणे जलसाक्षरतेच्या दृष्टीने पूर्णत: अयोग्य आहे. त्यासाठी प्रत्येक राज्याने भूजल अधिनियम कायद्यानुसार भूजल उपशावर पूर्णपणे नियंत्रण आणले पाहिजे.
आज महाराष्ट्रासह अकरा राज्यांत देशातील ९० टक्के भूजलाचा उपसा होतो. पाऊस कमी होतो त्या वर्षी भूजल उपशाची टक्केवारी वाढते. यावर्षी महाराष्ट्रातील काही जिल्हे व तालुक्यांत भूजल मिळणे दुरापास्त झाले आहे. कूपनलिका पूर्णत: कोरडय़ा पडल्या आहेत. जेवढय़ा प्रमाणात व वेगात भूजल उपसा होतो त्या प्रमाणात व गतीने भूजलाचे पुनर्भरण होत नाही. भूजल ही फुकट मिळणारी बाब असली तरी ती राष्ट्रीय संपत्ती आहे ही धारणा पक्की करून मोजूनमापून व गरजेपुरतेच भूजल वापरण्याची मानसिकता सर्व स्तरांवरून जोपासली जाणे जलसाक्षरतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
साधारणत: दरडोई पाण्याची गरज ३००० ते ३५०० घनमीटर इतकी गृहीत धरतात. १७०० घनमीटरला पाणीटंचाई, १२०० घनमीटरला तीव्र पाणीटंचाई तर ७५० घनमीटर व त्यापेक्षाही कमी दरडोईला अति तीव्र पाणीटंचाई मानतात. आपण सध्या टंचाईकडून तीव्र पाणीटंचाईकडे जात आहोत. त्यामुळे ही धोक्याची घंटा समजून भूजल सोन्यासारखे जपायला व वापरायला हवे.
– सुधीर फडके (अहमदनगर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा