अणुऊर्जा प्रकल्पांसाठी आण्विक इंधनाची आवश्यकता असते. त्यासाठी युरेनियम हे इंधन म्हणून वापरले जाते. भारताच्या स्वयंपूर्ण अणुऊर्जा कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या युरेनियमचा पुरवठा स्वदेशी स्राोतापासूनच करणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युरेनियमच्या धातुकाच्या (ओअर) अन्वेषणापासून (एक्स्प्लोरेशन) ते अणुभट्टीसाठी इंधन तयार करण्यापर्यंतचे काम तीन टप्प्यांत केले जाते. युरेनियमच्या धातुकाचे अन्वेषण हा पहिला टप्पा; खाणीतून धातुकाचे उत्पादन करून, त्या धातुकावर प्रक्रिया करून, त्याचे मॅग्नेशियम डाययुरेनेटच्या पिवळ्या वडीत (यलो केक) म्हणजेच कच्च्या इंधनात रूपांतर हा दुसरा टप्पा; आणि त्या पिवळ्या वडीवर प्रक्रिया करून, त्याचे शुद्ध इंधनात रूपांतर करणे हा तिसरा टप्पा; असे यात तीन टप्पे आहेत.

धातुकांचे अन्वेषण करणे हे हैदराबादच्या ‘परमाणु खनिज निदेशनालय’ (अॅटॉमिक मिनरल डायरेक्टोरेट) या विभागाचे काम आहे. त्यांनी शोधून काढलेल्या साठ्यापैकी जे साठे खाणकामासाठी उपयुक्त आहेत त्याच साठ्यांचे खाणकाम केले जाते. खाणीतून मिळालेल्या धातुकावर प्रक्रिया करून त्यापासून पिवळ्या वडीच्या उत्पादनाचे काम ‘युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (यूसीआईएल) या संस्थेद्वारे केले जाते. पिवळ्या वडीपासून इंधन तयार करण्याचे काम हैदराबादस्थित ‘आण्विक इंधन संकुल’ (न्युक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स) इथे केले जाते. भारत सरकारने ‘युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ची स्थापना युरेनियमच्या धातुकाच्या खाणकामासाठी आणि धातुकावर प्रक्रिया करण्यासाठी १९६७ मधे केली. त्याचे मुख्यालय झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यातल्या जमशेदपूरच्या नजीक जादुगुडा इथे आहे.

भारताची पहिली युरेनियमची खाण ‘युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने १९६७ मधे जादुगुडा इथे सुरू केली. त्यानंतर त्याच पट्ट्यातल्या नरवापहाड आणि भाटीन या खाणींचा विकास करण्यात आला. कालांतराने सिंहभूम जिल्ह्यातील तुरामडीह, बागजाता, बन्दुहुरंग आणि माहुलडीह; आणि आंध्र प्रदेशातील तुमलापल्ली या खाणींचा विकास करण्यात आला.

युरेनियमच्या धातुकापासून कच्च्या इंधनाचे उत्पादन करण्यासाठी अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. त्या प्रक्रियांमधे दलन (क्रशिंग) आणि सहाणन (ग्राइंडिंग), अपक्षालन (लीचिंग), निस्यंदन (फिल्ट्रेशन), शुद्धीकरण (प्युरिफिकेशन) आणि अपशिष्ट व्यवस्थापन (वेस्ट मॅनेजमेंट) यांचा समावेश होतो. झारखंडमधल्या जादुगुडा आणि तुरामडीह इथे, आणि आंध्र प्रदेशमधल्या तुमलापल्ली इथे धातुकावर प्रक्रिया करण्यासाठीची सयंत्रे आहेत. तिथेच धातुकापासून पिवळ्या वडीचे उत्पादन केले जाते.

नजीकच्या भविष्यात मेघालय, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांत तीन नवीन खाणींचा विकास करण्याची योजना आहे. भारताच्या युरेनियम खाणकाम क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने अणुऊर्जा कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.