अग्नीचा नियंत्रित वापर ही मानवाच्या सामाजिक-सांस्कृतिक उत्क्रांतीमधील अतिशय महत्त्वाची घटना! मानवाच्या शरीररचनेत होत गेलेले बदल, उष्णकटिबंधातून समशीतोष्ण प्रदेशात मानवाचे होत गेलेले स्थलांतर, तसेच गुहा-छावण्यांच्या वस्त्यांमध्ये तत्कालीन मानवांचे एकमेकांशी येणारे परस्परसंबंध, या साऱ्यांचा अग्नीशी संबंध आहे. चौदा लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत अग्नीचा वापर होत असल्याचा पुरावा मिळाला आहे. चेसोवांजा या केनियाच्या एका उत्खनन स्थळावर अनेक ठिकाणी भाजली गेलेली माती आढळली. होमो इरगॅस्टर या आफ्रिकेतील होमो इरेक्टस प्रजातीतील मानवाचे त्या काळी तेथे वास्तव्य होते. त्याच काळातील स्वार्टक्रान्स या दक्षिण आफ्रिकेतील ठिकाणीदेखील जळक्या हाडांचे अवशेष सापडले आहेत. इस्रायलमधील टाबून या गुहेत आणि त्याच्या आजूबाजूच्या उत्खननभूमींत मिळालेल्या खुणांवरून, तिथे सात लाख वर्षांपूर्वी अग्नीचा वापर सुरू झाला असल्याचे दिसून येते. आदिमानवाने सुमारे पाच लाख वर्षांपूर्वी वापरलेल्या अग्नीच्या खुणा फ्रान्स, हंगेरी आणि चीन अशा निरनिराळ्या ठिकाणी पसरलेल्या दिसतात. अग्नीचा नियंत्रित उपयोग मात्र नंतरच्या काळात सुरू झाला असावा. इस्रायलमधील टाबून गुहेतच अग्नीचा नियंत्रित वापर सुरू झाल्याला साडेतीन लाख वर्षे होऊन गेल्याचे पुरावे स्पष्टपणे सापडतात. आगीच्या वापराचे स्वरूप कालानुरूप कसे बदलत गेले याचे क्रमवार स्थित्यंतर टाबून गुहांमध्ये दिसून येते. आग शिलगावताना त्या काळातील मानवाने, काटक्या किंवा गारगोटय़ांच्या घर्षणाचा वा आघाताचा वापर केला असावा.
टाबून गुहेप्रमाणेच इस्रायली संशोधकांनी रोश हायीन या ठिकाणी क्वेसेम ही गुहा अलीकडच्याच काळात शोधून काढली आहे. या गुहेच्या मध्यभागी मोठी शेकोटी पेटवायची जागा असावी. या शेकोटीच्या जवळ मोठय़ा संख्येने विविध आकारांची हत्यारे सापडली. त्यांचा वापर मांस कापण्यासाठी होत असावा. यावरून अग्नीचा वापर अन्न शिजवण्यासाठी आदिमानवाने तीन-साडेतीन लाख वर्षांपूर्वी केला असावा असे मानले जाते. शिजवलेले अन्न पचायला सोपे असते. त्यामुळे आदिमानवाची छोटी दंतपंक्ती, आकाराने आक्रसत गेलेली पचनसंस्था (विशेषत: आतडय़ाची लांबी) आणि त्याउलट मेंदूचा वाढलेला आकार, हे बदल आगीचा शोध आणि त्यानंतर सुरू झालेली अन्न शिजवण्याची प्रक्रिया यामुळे झाले असावेत, असे मानववंशशास्त्रज्ञांचे मत आहे.
मानवाने अग्नीवर प्रथम ताबा मिळवला, नंतर त्याने स्वत:ला ऊब मिळविण्यासाठी, उजेडासाठी, संरक्षणासाठी व सरतेशेवटी अन्न शिजवण्यासाठी अग्नीचा वापर केला असावा.
डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org