दिवसा परागीभवन होणाऱ्या वनस्पतींची फुलं उठावदार रंगाची असतात. जर परागीभवन पक्षी अथवा अन्य सस्तन प्राण्यामार्फत होणार असेल (उंदराकडूनही चुकून परागीभवन झाल्याचा उल्लेख सापडतो) तर फुले आकाराने मोठी असून त्यात मकरंदाचे प्रमाणही अधिक असते. उदा. पांगारा, काटेसावर. माणसातर्फे होणारे परागीभवन कृत्रिम असतं व ते बहुधा नवीन जातीच्या संशोधनासाठी केलं जातं. यावरून लक्षात येतं की प्रत्येक जातीच्या वनस्पतींच्या फुलांची रचना, फुलण्याची वेळ व फुलण्याचा हंगाम या गोष्टी तिचं परागीभवन करणाऱ्या प्राण्याला (कीटक , पक्षी वा अन्य प्राणी) भावेल, अशा पद्धतीनेच निसर्गाने विकसित केले आहे.
जेव्हा एखादा कीटक परागकण किंवा मकरंद खाण्यासाठी फुलावर बसतो, तेव्हा त्या खाद्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला फुलाच्या सर्वात आतल्या भागापर्यंत जावे लागते. असे करताना वरच्या पातळीवर असलेले परागकण त्याच्या शरीराच्या विविध अवयवांना चिकटतात. तिथून उडून दुसऱ्या फुलांवर बसताना हेच परागकण त्या फुलांवर पडतात. म्हणजे परागसिंचन होतं व पुढे फलधारणेची क्रिया होते. मात्र कीटकाला आपण काय पराक्रम केला हे माहीतच नसतं.
मधमाशी, कुंभारमाशी, सुतारमाशी हे कीटक परागीभवनात प्रमुख भूमिका बजावतात. आंबा, काजू, िलबू जातीतील फळझाडं, बदाम, एप्रिकॉट त्याचप्रमाणे सूर्यफूल, अळशी, राई अशा तेलबियांच्या उत्पादनात कीटक परागीभवनामुळे भरघोस वाढ झाली आहे. भारतात कीटक फुलांकडे येण्याची वेळ ही साधारणत: सकाळी साडेसहा ते दुपापर्यंत असते. मधमाश्या सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत जास्त कृतिशील असतात. एकूण कीटकांत मधमाश्या व त्यांच्या जवळच्या जातींच्या माश्यांचे प्रमाण ९८ ते ९९ टक्के इतके आहे. मधमाश्यांचा सहभाग हा व्यावसायिक फळबागा, काकडी वर्गातील अनेक भाज्या जसे काकडी, खरबूज, किलगड, भोपळे, पडवळ आणि स्ट्रॉबेरीसारख्या फळांच्या फलधारणेसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. मधमाश्यांची कृत्रिम पदास करून बागा, मळे यांमध्ये त्या ठेवल्यावर उत्पन्नात २० ते ३० टक्के वाढ झाल्याची उदाहरणे आहेत. अशा या उपयुक्त कीटकांवर विषारी द्रव्यांची फवारणी करून आपण आपल्याच पायांवर धोंडा तर मारून घेत नाही ना!
– डॉ. विद्याधर ओगले मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा