सकाळी सकाळी शेजारच्या घरी काहीतरी अघटित घडले आहे याचा अंदाज आला. तो अचूक ठरला. जी शंका येत होती ती बरोबर ठरली होती. पमाक्कांचा एकुलता एक मुलगा बरीच वर्षे अंथरुणाला खिळून होता. तो गेला. तो त्या दुखण्यातून उठणार नाही याची कल्पना डॉक्टरांनी पमाक्कांना दिली होती. पमाक्कांनीही तो जितके दिवस आहे, तितके दिवस त्याचे सर्व व्यवस्थित करायचे हे व्रतच जणू घेतले होते. त्याचे अंथरुणातील सर्व सोपस्कार करतानाही दमत नव्हत्या, थकत नव्हत्या, त्यांना कसलीही घृणा येत नव्हती. त्यासाठी कधी सहानुभूती दाखवलेलीही त्यांना रुचत नसे. त्या आपले दु:ख बाजूला सारत म्हणत असत,‘‘अहो ! मीच करायला पाहिजे त्याचं. लेकरू आहे ते माझं. उलट त्याचं सारं सारं करणं कामच आहे माझं. म्हणतात ना, ‘तळपायाला खाज नाही आणि आतडय़ाला लाज नाही’ तसंच आहे म्हणा हवं तर. त्याचं करणं हाच मला माझा धर्म वाटतो.’’
काही म्हणी अनाहूतपणे ओठांवर येतात ! पण शरीर शास्त्राचे सूक्ष्म निरीक्षण नोंदवून जातात. आपल्या शरीरातला फक्त एक भाग असा आहे की त्याला सहसा कधी ‘खाज’ येत नाही. आणि तो म्हणजे ‘तळपाय’. आणि एक नातेही असे आहे की त्या नात्यासाठी काहीही कष्ट घेताना आपल्याला ‘लाज’ वाटत नाही. कारण ते नाते आपल्या आतडय़ाचे असते, जसे आई आणि मुलाचे. या नात्याला जपताना, त्याची शी-शू काढताना आईला कसलेही कष्ट पडत नाहीत, त्रास होत नाही, कसलाही मोबदला तिला नको असतो. ती हे सारे स्वान्तसुखाय करत असते. तळपायाला जशी ‘खाज’ येत नाही, तशी या आतडय़ाच्या नात्याच्या आड कसलीही ‘लाज’ आडवी येत नाही. कारण कातडय़ापेक्षा आतडय़ाची, अंत:करणाची ओढ कितीतरी पटींनी जास्त असते. हेच ही म्हण सुचवून जाते.
आश्चर्य वाटले ते याचे की म्हणी माणसाच्या जीवनाशी काही काही वेळेला इतक्या एकरूप होऊन जातात, की त्या कितीतरी वेळेला अनाहूतपणे ओठावरती येतात. पमाक्कांच्या ओठांवर आली, तशा !
– डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@ymail.com