यास्मिन शेख
‘महाराष्ट्रात दोन राजकीय पक्षांचे एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप इतके वाढले आहेत, की राज्यात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होईल की काय अशी भीती वाटते.’
आणखी एक वाक्य वाचा- ‘भारतात अनेक ठिकाणी पावसाच्या संततधारा कोसळत आहेत, त्यामुळे कितीतरी भागांत पूरसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे.’ या. दोन्ही वाक्यांत शब्दांची चुकीची रूपे योजली आहेत. त्यामुळे वाक्यरचना सदोष झाली आहे. ते शब्द आहेत- ‘युद्धसदृश्य’ आणि ‘पूरसदृश्य’. या दोन्ही शब्दांतील ‘सदृश्य’ हा शब्दच चुकीचा आहे. असा शब्दच संस्कृतात व मराठी भाषेत अस्तित्वात नाही. सदृश (सदृश्य-श्य नव्हे) हा शब्द संस्कृतात आहे. हे विशेषण असून त्याचा अर्थ आहे- सारखा, योग्य, साजेसा, अनुरूप, तुल्य. संस्कृतात या शब्दाचे ‘सदृक्ष’ असेही रूप आहे. पहिल्या वाक्यात ‘युद्धसदृश’ परिस्थिती याचा अर्थ युद्धासारखी परिस्थिती असा आहे आणि दुसऱ्या वाक्यात ‘पूरसदृश’ वातावरण याचा अर्थ पुरासारखे वातावरण असा आहे. दृश्य म्हणजे देखावा. एक शब्द आहे- अदृश्य (विशेषण, अर्थ ‘दिसेनासा’ (नकारात्मक) . आणखी एक शब्द आहे ‘सादृश्य’. हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ आहे ‘सारखेपणा’.
नुकतेच ‘लोकसत्ता’त एका बातमीचे शीर्षक वाचले- ‘सिन्नरमध्ये ढगफुटीसदृश पावसामुळे हाहाकार.’ शीर्षकात ‘ढगफुटीसदृश’ आणि ‘हाहाकार’ हे दोन्ही शब्द अगदी अचूक योजले आहेत. (चुकीचे शब्द होतील- ढगफुटीसदृश्य आणि हाहा:कार) ‘स’ हा उपसर्ग असलेली काही विशेषणे पुढीलप्रमाणे-सकर्मक (वाक्यात कर्माप्रमाणे असलेले (क्रियापद), सकस (पौष्टिक), सखोल (फार खोल), सघन (दाट), सगुण (सत्त्व, रज, तम इ. गुणांनी युक्त) तसेच सदय, सटीप, सधन, सदोष, सरस, सविनय, सप्रेम, सशास्त्र, सज्ञान, सतेज, सलज्ज, सव्याज इ. पुढील दोन शब्द आपण अगदी बरोबर उच्चारतो; पण बरेच जण ते शब्द चुकीचे लिहितात. ‘शृंगार’ या शब्दाऐवजी ‘श्रृंगार’हे चुकीचे रूप. तसेच चतु:शृंगी या शब्दाऐवजी चतुश्रृंगी हा चुकीचा शब्द. असे चुकीचे शब्द लेखनात कटाक्षाने टाळावेत. पुन: एकदा लक्षात घ्या. आपण मराठी मातृभाषा कुरूप करू नये, तिची मोडतोड करू नये. तिचे स्वरूप जपणे, ती अधिकाधिक निर्दोष करणे हे मराठीवर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वाचे कर्तव्यच आहे.