डॉ. माधवी वैद्य

काही लोकांना आपल्या श्रीमंतीचा पोकळ दिमाख मिरवण्याची फार हौस असते. मनाच्या श्रीमंतीपेक्षा दागिन्यांची श्रीमंती मिरवणे त्यांना फारच आवडते. अशा प्रकारे जगणारे आपल्याभोवती, आपल्या समाजात भरपूर दिसतात. त्यांच्या दोन्ही हातात अंगठय़ा असतात. कडक इस्त्रीचे झोकदार कपडे ते परिधान करतात. हातात दणदणीत सोन्याचे कडे असते. गळय़ात जाडजूड सोनसाखळय़ा असतात. पण त्या मानाने घरात दाणा- वैरण बेताचीच आणि तसे पैशाचे पाठबळही बेताचेच असते. हा खोटा दिमाख खरा वाटावा यासाठीच त्यांची सगळी खटपट सुरू असते. त्यांच्यासाठी ही म्हण आहे.

आमच्या शेजारी बापूसाहेब रहायचे. जेव्हा संस्थाने विलीन झाली नव्हती तेव्हा त्यांचे पणजोबा, खापर पणजोबा कोणत्या तरी संस्थानाचे म्हणे दिवाण होते. त्यांचे ते पद संस्थानाच्या विलीनीकरणाबरोबरच लयाला गेले होते पण बापूसाहेब अजूनही ते पद

मिरवीतच होते. त्यांच्या डोक्यातील स्वत:ची एके काळची प्रतिष्ठा, मानमरातब विसरायला त्यांचे मन काही तयार नव्हते. त्याच संस्थानिकी खाक्याच्या खुणा ते अगदी वर्तमानातही मिरवीत होते. घरात पैशांचा खडखडाट असताना त्यांच्या हातातील एकही अंगठी कमी झालेली नव्हती. घरात तसे खाण्यापिण्याचेही फाकेच पडत असत. हा सगळा राहण्याचा, वावरण्याचा पोकळ डामडौल सांभाळताना त्यांच्या पत्नीच्या नाकीनऊ येत असत. पण काय करते बिचारी? त्यांना समजावण्याचे सगळे प्रयत्न फोल गेले होते. काही लोक त्यांच्या या श्रीमंतीकडे बघून फसत असत आणि त्यांच्या बाह्य अवताराला भुलून त्यांच्यकडे देणगी वगैरे मागायला जात. पण पदरात काहीही न पडता हात हलवत परत येत. त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांच्या अशा वागण्याला हसत असत, नावे ठेवत. ते म्हणत असत, ‘हातात मुदी सोन्याची, घरात बोंब दाण्याची.’ जो स्वत:च आर्थिक विवंचनेत आहे, तो दुसऱ्याला काय मदत करणार?

madhavivaidya@ymail.com

Story img Loader