– डॉ. नीलिमा गुंडी  nmgundi@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यक्ती असो वा वस्तू, त्यांची पारख करण्याची दृष्टी कशी असावी लागते;  याचा प्रत्यय काही वाक्प्रचार देतात.

‘पितळ उघडे पडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, मूळची क्षुद्र वृत्ती (दडलेले स्वरूप) लक्षात येणे. यामागे एक व्यावहारिक निरीक्षण आहे. सोन्याचा मुलामा (वर्ख) देऊन पितळय़ाचे  दागिने घडवले जातात. नवे असताना ते चमकतात. मात्र काही काळानंतर त्यावरचा वर्ख उडतो आणि आतले पितळ उघडे पडते. त्यातून हा वाक्प्रचार रूढ झाला आहे. त्यामुळे ‘वरपांगी केलेला बहाणा लक्षात येणे’ हा त्याचा भावार्थ आहे. वि. द.घाटे यांनी ‘मनोगते’मध्ये डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी यांच्याविषयी लिहिले आहे : ‘गोपाळराव जोशी हे परस्परांत भांडणे लावण्यात आणि उभय पक्षांचे पितळ उघडे पाडण्यात वस्ताद होते.’

 ‘पैलू पाडणे’ हा  वाक्प्रचार हिरा घडवण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. कार्बन या मूलद्रव्यापासून हिरा तयार करणे, ही कठीण गोष्ट असते. हिऱ्याला पैलू पाडावे लागतात,  घाव सोसावे लागतात, तेव्हा त्यातील तेज झळाळून प्रगट होते. (पैलू म्हणजे बाजू, कोन ) त्यामुळे पैलू पाडणे, या वाक्प्रचाराचा अर्थ एखाद्या व्यक्तीमधली सुप्त क्षमता ओळखणे आणि ती प्रगट करण्यास त्याला मदत करणे, मार्गदर्शन करणे असा होतो. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचे काम त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांनी केले, हे आपण जाणतोच.

‘कसोटीस उतरणे’ या वाक्प्रचारात मूळ शब्द आहे  ‘कसवटी’ म्हणजे कस लावण्याचा दगड. कस म्हणजे सोने, चांदी यांची शुद्धता ठरवण्यासाठी त्या दगडावर मारलेली रेघ म्हणजेच ठरवलेले मान्यतेचे निकष होय. त्यामुळे कसोटीस उतरणे म्हणजे  निकष पूर्ण करणे. आपण जेव्हा एखाद्या प्रसंगाची  ‘चौकशी’ करतो, तेव्हाही चार कस (निकष)  लावत असतो. ‘का?, कोणी?, केव्हा?, कसे?’ , असे  प्रश्न विचारून आपण ती घटना सखोलपणे जाणून घेत असतो.

एकूण जीवनव्यवहारात पारख डोळसपणे कशी करायची, याचे  भान अशा मार्मिक वाक्प्रचारांमधून आपल्याला मिळते.