ही वाक्ये वाचा- ‘माझ्या मैत्रिणीला दम देणाऱ्या तिच्या नवऱ्याचा आवाज मला पुन:पुन्हा आठवत होता. तिच्या सासूबाई काही अपमानास्पद बोलून तिच्या मन:स्तापात भर तर घालणार नाहीत ना, अशी भीती मला वाटली.’
या वाक्यांतील दुसऱ्या वाक्यात योजलेला ‘मन:स्ताप’ हा शब्द सदोष आहे. योग्य शब्द आहे- मनस्ताप. न: असे विसर्गयुक्त अक्षर नसून (मनस्+ताप) मनस्- स् हे अक्षर आहे. संस्कृत मनस् हा तत्सम शब्द आहे. मनस्ताप- (नाम, पुल्लिंगी, ए.व.) अर्थ- मनाला होणारा त्रास किंवा मनाला होणारे दु:ख. वरील वाक्यातील मन:स्ताप हा चुकीचा शब्द आहे. ते वाक्य असे हवे- ‘..तिच्या मनस्तापात भर तर घालणार नाहीत ना..’
मराठीने संस्कृतातून स्वीकारलेले अनेक तत्सम शब्द (ज्या शब्दांत पूर्वपदी मनस् असून त्यातील स् चा विसर्ग (:) झाला आहे.) पाहू या. मन:पूर्वक, मन:शांती, मन:स्थिती, मन:कामना, मन:पूत इ.
काही शब्दांत ‘मनस्’ या शब्दाचे ‘मनो’ असे ओकारान्त रूप झाले आहे. पुढील शब्द पाहा- मनोरमा (म), मनोरथ, मनोभाव, मनोरंजक, मनोरंजन, मनोभंग, मनोगत, मनोधर्म, मनोनिग्रह, मनोदय, मनोव्यापार, मनोवृत्ती, मनोविकृती, मनोवेधक, मनोदेवता इ.
आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे मराठीने संस्कृत शब्द मनस्चे ‘मन’ हे रूप स्वीकारले आहे आणि ‘मन’ पूर्वपदी असलेले काही सामासिक शब्दही मराठीत रूढ झाले आहेत. जसे- मनमुराद, मनमिळाऊ, मनकवडा, मनमोहक, मनधरणी इ. आणखी एक चुकीची वाक्यरचना पाहा-
‘मी एखादी चूक केली, तर बाबा मला रागवत नाहीत, उलट ते माझ्यावर हसतात.’ वाक्यात ‘ते माझ्यावर हसतात’ अशी वाक्यरचना मराठीत नाही. हिंदीच्या प्रभावामुळे ही वाक्यरचना अनेक मराठी भाषकांच्या तोंडी किंवा लेखनातही आढळते. एखादी व्यक्ती तुम्ही केलेल्या चुकीमुळे तुच्छतेने हसत असली, तर ते हसणे सुखदायक किंवा समाधानकारक नसते. त्या हसण्याला आपण आपुलकीने हसून समाधान व्यक्त करू शकत नाही. उलट, ते हसणे वेदनादायक वाटते. मराठीत मात्र ‘माझ्यावर हसतात’ असे आपण म्हणणे चुकीचे आहे. मराठीतील योग्य वाक्यरचना अशी आहे- ‘मी एखादी चूक केली, तर बाबा मला रागवत नाहीत, मला हसतात.’ या वाक्यात हास्य हे उपहासदर्शक आहे, हे लक्षात घ्यावे.
– यास्मिन शेख