– डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@ymail.com

घरात नातीचा साखरपुडा म्हणून आजींची गडबड सुरू झाली होती. ते पाहून आजोबा त्यांना म्हणाले, ‘‘अहो आजीबाई ! अहो कसली धावपळ चालली आहे तुमची पहाटेपासून?

संध्याकाळी आहे ना साखरपुडा? ’’ त्यावर आजीबाई म्हणाल्या, ‘‘अहो! घरात आपल्या कार्य आहे आणि सूनबाई, लेकीबाळी बघाना! कुणालाच त्याचे काही नाहीच मुळी! चटाचटा उठतील, कामाला लागतील.. तर ते सोडाच, लोळत पडल्यात अजून! यांना कशी आणि कधी आपली जबाबदारी कळायची?’’

 त्यावर आजोबा म्हणाले, ‘‘हे बघा! सगळं होईल व्यवस्थित. तुम्हालाच हौस फार, तुमचाच उत्साह दांडगा!’’ आजी म्हणाल्या, ‘‘आता मी म्हणते तसं होईल की नाही बघा हं! आता सगळे आरामात उठतील. नाश्ताही बाहेरूनच मागवलेला असेल, मग जेवण झालं की आधी गाठतील पार्लर! तिथून येईपर्यंत मी सगळी तयारी केलेलीच असेल आणि संध्याकाळीही बाहेरचेच खाद्यपदार्थ! बाकीचं सगळं नीटनेटकेपणाने करायला आजीबाई आहेतच! हे तर त्यांना पुरतेपणी ठाऊक आहेच. कारण सगळी हौसमौज काय आहे ती मलाच आहे ना?’’ त्यावर आजोबा म्हणतात कसे, ‘‘आपणच नाचानाच करायची, कामं अंगावर ओढून घ्यायची आणि हातपाय गळाठून बसायचे. म्हणतात ना! ‘‘तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या’’ असे होते आहे तुमचे. त्या तरण्यांच्या दमून होतात बरण्या आणि तुम्हा म्हाताऱ्यांचा उत्साह हरिणींसारखा!’’ आजीही काही कमी नव्हत्या. त्या लगेच आजोबांना म्हणाल्या, ‘‘तुम्हीही काही कमी नाही आहात बरं का! तुम्हीसुद्धा आपल्याला झेपतील तेवढीच कामं करीत जा आता. तुमच्या आवाक्यात नसलेले काम अंगावर ओढून घेता आणि आजारी पडता. म्हणतात ना! ‘‘तरण्याचे झाले कोळसे, अन् म्हाताऱ्याला आले बाळसे!’’ अहो, काम करताना जरा आपली ताकद, वय याचा विचार कराल की नाही!’’

Story img Loader