– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com
पूर्व युरोप आणि पश्चिम आशियातील अनेक देशांमध्ये लोकशाही राज्यव्यवस्था आहे ती केवळ दिखाव्यापुरती! एखाद्या दांडगट, हुकूमशाहीच्या अध्यक्षाच्या हातात कारभाराचे अनिर्बंध अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवाधिकारांची गळचेपी असे या प्रदेशातील अनेक देशांमध्ये नित्यच आढळते. यातील अनेक देश पूर्वी सोव्हिएत युनियनमध्ये होते. ६०-७० वर्षे कम्युनिस्ट राजवटीत राहिलेले हे देश नंतर लोकशाहीवादी झाले तरी अनेक दशकांची भिनलेली हुकूमशाही प्रवृत्ती अनेक देशांमध्ये अजूनही दिसून येते. बेलारुस, कझाकस्तान वगैरे अशा प्रवृत्तीची उदाहरणे. अशीच काहीशी परिस्थिती आहे मध्य आशियातल्या प्रजासत्ताक उझबेकिस्तानमध्ये. भारतीयांच्या उझबेकिस्तान या देशाच्या नावापेक्षा त्या देशातल्या ताष्कंद, समरकंद, बुखारा या शहरांची नावे अधिक परिचयाची आहेत.
मध्य आशियातल्या या देशाच्या पश्चिम आणि उत्तरेला कझाकस्तान, पूर्वेस ताजिकिस्तान आणि किर्गिझस्तान तर दक्षिणेला अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तान अशा चतु:सीमा होत. उझबेकिस्तान हा सर्व बाजूंनी भूवेष्टित देश आहे. साडेचार लाख चौ.कि.मी. क्षेत्रफळाच्या या देशाची लोकसंख्या साधारणत: साडेतीन कोटी आहे. ९३ टक्के मुस्लीम आणि केवळ पाच टक्के ख्रिश्चन धर्मीय असलेल्या या देशाचे स्थापत्य आणि एकूण तोंडवळा इस्लामिक आहे. ताष्कंत ऊर्फ ताष्कंद हे येथील राजधानीचे शहर. उझबेक सोम हे येथील चलन. इ.स.पूर्व आठव्या शतकात इराणी भटक्या जमातींनी मध्य आशियात स्थलांतर केले आणि त्यापैकी बहुतांश लोक सध्याच्या उझबेक प्रदेशातल्या गवताळ प्रदेशात स्थायिक झाले. पुढे इ.स.पूर्व पाचव्या शतकात या इराणी लोकांची तीन राज्ये स्थापन होऊन त्यामध्ये समरकंद आणि बुखारा ही मोठी शहरे वसवली गेली. पुढे चीन आणि भारत या देशांचा पश्चिमेकडील देशांशी व्यापार सुरू होऊन तत्कालीन प्रसिद्ध व्यापारी मार्ग सिल्क रोड यावरून व्यापारी वाहतूक वाढली. समरकंद, बुखारा ही शहरे या मार्गावर असल्याने लौकरच ती महत्त्वाची व्यापार केंद्रे बनली. अलेक्झांडर दी ग्रेट याने यातील काही प्रदेशांवर अल्पकाळ राज्य केले, परंतु पुढे इ.स. सातव्या शतकापर्यंत येथे पर्शियन या इराणी साम्राज्याची सत्ता राहिली. आठव्या शतकात अरब मुस्लिमांनी हा प्रदेश घेतल्यावर बहुतेक सर्व उझबेक लोकांनी इस्लाममध्ये धर्मातर केले.