वाल्मीकी अय्यंगार्या यांनी तयार केलेले द्रवरूप कुणप हे जमिनीत घातले तर खत आणि फवारले तर कीटकनाशक अशा दोन्ही कामांसाठी वापरता येऊ शकत होते. काही कुणपे अल्कलीधर्मी असतात, प्राण्यांचे मलमूत्र विषनाशक असते अशाही काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या होत्या.
गंधर्वनगरीतल्या त्या चहामळ्याची जागा ३२.४ हेक्टर इतकी होती. तिथे गेल्यावर त्यांनी २०० लिटर क्षमतेची अनेक पिंपे आणवली. गवत, भाताचा कोंडा, कारखान्यातील टाकाऊ समजला जाणारा चहा (पाने), कंटकारीची काटेरी फळे असे विविध पदार्थ गोमूत्र किंवा शेण-पाणी मिश्रणात कुजवून त्यांनी वेगवेगळी कुणपे तयार केली. यातल्या प्रत्येक कुणपाचा कुजण्याचा कालावधी भिन्न होता. काहींना कुजण्यासाठी चार दिवस तर काहींना सात दिवस लागले. त्यांना वाल्मीकींनी सस्यगव्य, चहागव्य, धान्यगव्य, कंटकारी अशी नावे दिली.
कोणतीही गोष्ट टाकाऊ नसते, हे वाल्मीकींना मनोमन पटले आहे. आजच्या पर्यावरण रक्षणासाठी हे तत्त्व फार पोषक आहे. चहाच्या कारखान्यातले फेकून दिले जाणारे पाणी, चहाच्या झुडपांची निबर पाने यांचाही उपयोग त्यांनी कुणपे तयार करण्यासाठी केला. या प्रदेशात मोहोरीचे तेल मोठय़ा प्रमाणात वापरले जाते. अशा मोहोरीच्या पेंडींचा रोगप्रतिबंधक म्हणून उपयोग केला. या पेंडींचे वैशिष्टय़ म्हणजे ती एका दिवसात कुजते. कुजण्याच्या प्रक्रियेत तिचा उपयोग उत्प्रेरक म्हणूनही वाल्मीकींनी करून घेतला.
माशांचे टाकाऊ अवयव, त्यांचे कुजलेले भाग त्यांनी गोमूत्रात आणि शेण-पाणी मिश्रणात टाकून त्यापासून इंड्सफारी नावाचे द्रावण तयार केले. हे द्रावण गवतापासून बनविलेल्या सस्यगव्यात मिसळून त्याचा खत आणि कीटकनाशक असा दुहेरी उपयोग त्यांनी केला. या कुणपामुळे हेलोपेल्टिस थिव्होरा नावाच्या कीटकांचा बंदोबस्त झाला आणि ‘लूपर’लाही आळा बसला.
चहाच्या मळ्याला सर्वसाधारणपणे ज्या रोगांची लागण होते, त्या रोगांवर वृक्षायुर्वेदातील पद्धतींमुळे मात करता येते, हे सिद्ध झाले. या मळ्यातला तयार चहा जेव्हा सेंद्रिय चहाचे प्रमाणपत्र देणाऱ्या प्रयोगशाळेत तपासला गेला, तेव्हा त्यात कोणतेही उपद्रवी घटक आढळून आले नाहीत.
जे देखे रवी..
वाचा/ चैतन्याचा प्रवाह
मी MBBS च्या चौथ्या वर्षांत होतो तेव्हा पक्षाघात (paralysis) झालेला एक रुग्ण तपासला होता. तो पक्षाघातामुळे मुका झाला होता. ह्याला प्रश्न विचारणार तरी कसा, असे मनाशी म्हणत मी चुळबुळ करत होतो तेव्हा त्याची बायको म्हणाली, ‘तुम्ही विचारा हे काही बहिरे झालेले नाहीत.’ मग मी प्रश्न विचारल्यावर त्यांचे डोळे चमकले, त्यांनी एक कागद काढला आणि बायकोकडे पेन मागितले आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर लिहून मला दाखवले तेव्हा मी स्तंभित झाल्याचे आठवते. वाचा ही गोष्ट ध्वनियुक्त शब्दांशीच फक्त निगडित नसते. वाचेची व्याख्या विचारांचे चिन्हांनी केलेले दर्शन अशी आहे. मग ही चिन्हे अक्षरांत असोत शब्दांमध्ये असोत अथवा आविर्भावात असोत. डोळे वटारणे, कपाळाला आठय़ा पाडणे हा सुद्धा वाचेचा एक प्रकार असतो. मी अधूनमधून ज्ञानेश्वरीवर भाषणे देण्यास जातो तेव्हा बरेच मधून जांभया देतात, काही टक लावून बघतात, काही माझ्या भाषणासाठी नव्हे तर ज्ञानेश्वरांवरच्या प्रेमामुळे आलेले असतात. मी ध्वनिक्षेपक घेऊन बोलतो. तेव्हा होते तरी काय? माझे विचार रासायनिक आणि विद्युत हालचालीचे परिणाम असतात. ध्वनियंत्र चालते तेव्हाची हालचाल यांत्रिक असते. तेथून निघालेला ध्वनी तोंडात येऊन बाहेर पडतो तेव्हा वातावरण कंप पावते आणि ध्वनिक्षेपकावर पडते तेव्हा त्याचे रूपांतर विद्युत प्रवाहात होते. त्यानंतर हा विद्युतप्रवाह ध्वनीमध्ये रूपांतरित होतो आणि लाऊडस्पीकरच्या मागे बाहेर पडत कानामधल्या पडद्यावर कोसळतो. मग तो पडदा कंप पावतो आणि त्या कंपनाचे परिणाम मज्जारज्जूमार्फत विद्युत प्रवाहाने मेंदूत रासायनिक प्रक्रिया करत समोरच्या माणसाला कळतात.
हे झाले वैज्ञानिक विश्लेषण. परंतु वाचेला आणि भाषेला परिस्थितीची पाश्र्वभूमी असते. बापाने मुलाला मूर्ख म्हणणे आणि मुलाने बापाला मूर्ख म्हणणे ह्य़ात जमीनअस्मानाचा फरक आहे. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीनंतर मी कधी चौकशी करू असे तुम्ही विचारलेत आणि जर ‘तुम्ही कशाला तसदी घेता, आम्ही तुम्हाला कळवूच’ असे उत्तर मिळते तेव्हा मनात पाल चुकचुकते. आमच्या वैद्यकीय परीक्षांमधे विशेषत: पदव्युत्तर विद्यार्थी आणि परीक्षकांचे संवाद होतात तेव्हा ‘तू हुशार आहेस नक्कीच, पण तुला काय वाटते, तुझी उत्तरे कशी होती,’ असा प्रश्न परीक्षकाने विचारला की दोन गोष्टी समजतात- एक म्हणजे परीक्षक सभ्य आहे आणि आपण नापास झालो आहोत. बसमधे अनोळखी पोरीला तू सुंदर दिसते आहेस म्हणणे म्हणजे संकटाला आमंत्रणच. या विरुद्ध रुसलेल्या प्रेयसीला उद्देशून तेच वाक्य वापरणे म्हणजे इतर कसले तरी निमंत्रण असते. मी जर बायकोला सुंदर म्हटले तर ती संशयाने बघू लागते.
.. भाषेचा अर्थ परिस्थितीवर ठरतो!
रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस
घाम खूप येणे : भाग – २
खूप घाम येणे या विकारात पित्तप्रधान कारणे असू शकतात. १) खूप तिखट, खारट, आंबट, उष्ण पदार्थाचे दीर्घकाळ सेवन; लोणचे, मिरची, पापड, अंडी, मांसाहार, अधिक मिठाचे प्रमाण, गरम व अनावश्यक तीव्र औषधे घेणे २) सर्दी, पडसे, ताप याकरिता सबूर न करता नेहमी, औषध घेत राहणे, तापामध्ये उलट सुलट चुकीची औषधे, खाणेपिणे करणे. ३) अति व्यायाम, उन्हातान्हात खूप काम करणे, अग्नीशी किंवा भट्टीशी जास्त काम असणे. ४) राग, शोक, भय. ५) शरीराला दरुगधी येणे व अंग खाजणे.
तळहात, तळपाय, काखा यांना खूप घाम येणे; काखेत काळे डाग पडणे. उन्हाळ्यात व पावसाळ्याचे सुरुवातीचे काळात तसेच शरद ऋतूत दुपारचे काळात घाम येणे; त्याबरोबर शोष किंवा कोरड पडणे ही लक्षणे पित्ताचे आधिक्य सांगतात. वाऱ्यावर बसले असता किंवा थंड पदार्थ घेतल्यास बरे वाटते. थकवा लवकर येतो. काहींचे रक्ताचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असते. डोळे, नखे व त्वचा लाल असते. अशा अवस्थेत काळ्या मनुका किमान तीस पस्तीस; स्वच्छ धुवून चावून खाव्या. एक चमचा धने ठेचून रात्रौ भिजत ठेवावे; सकाळी ते धने चावून खावे, वर तेच पाणी प्यावे. प्रवाळ, कामदुधा, मौक्तिक, उपळसरी चूर्ण यांची मदत घ्यावी.
कफप्रधान कारणे १) थंड, गोड, खारट, आंबट, जड, तेलकट, तुपकट असे पदार्थ वारंवार व दीर्घकाळ खाणे. २) ओल, गारवा, पाऊस, थंडी यामध्ये दीर्घकाळ काम, शरीरात सर्दी मुरेल असे वागणे. ३) व्यायाम किंवा हालचालींचा अभाव, शरीराला दरुगधी येणे, अंग खाजणे.
थंडीचा काल व पावसाळ्याच्या उत्तर कालात खूप घाम येणे, हा घाम सर्दीसारखा असणे. सर्दीची लक्षणे असणे किंवा नसणे, तहान अजिबात नसणे; निरुत्साह असणे. घामाला वास न येणे; अशी लक्षणे असताना रजन्यादि वटी एका वेळेस सहा गोळ्या अशा तीन चार वेळा चावून खाव्या.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत
१९ फेब्रुवारी
१८५२> वैद्यकशास्त्राचे अभ्यासक भालचंद्र कृष्ण भाटवडेकर यांचा जन्म. ‘वनस्पतीशास्त्राची मूलतत्त्वे’ ‘सामाजिक रक्षण शास्त्राची मूलतत्त्वे’, ‘अबला संजीवन’ आदि पुस्तके व ‘आर्यवैद्यक व पाश्चिमात्त्य वैद्यक’ हा ग्रंथ त्यांच्या नावावर आहे.
१९०६ > राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांचा जन्म. त्यांनी स्वत: लेखन कमी केले, परंतु ‘बंच ऑफ थॉटस’, ‘विचारदर्शन’, ‘राष्ट्र देवो भव’ आदी पुस्तकांत त्यांची भाषणे व स्फुटलेखन ग्रथित झाले आहे.
१९१९> कथालेखनात विविध प्रयोग करणारे स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचे लेखक अरविंद विष्णु गोखले यांचा जन्म. अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठातून एम. एस्सी. झाल्यावर त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील अध्यापनकार्य सांभाळून कथालेखन केले. ‘परमनप्रवेशाची किमया साधलेला लेखक’ अशी दाद समीक्षकांनी त्यांना दिली. नजराणा, माहेर, रिक्ता, नकोशी, कमळण आदी २५ कथासंग्रह, ‘माणूस आणि कळस’ या आत्मपर लघुकादंबऱ्या आणि काही ललितलेख अशी साहित्यसंपदा असणाऱ्या गोखले यांचे निधन १९९२ मध्ये झाले.
– संजय वझरेकर