व्हेनिस अनेक शतके पूर्वेकडच्या बायझन्टाइन रोमन साम्राज्याच्या अखत्यारीत असल्यामुळे व्हेनिसच्या स्थापत्य, कला संस्कृतीवर बायझन्टाइनचा प्रभाव दिसून येतो. विशेषत: चर्च/ प्रासादांवरील घुमटांचे आकार, रंग, चित्रकृती असलेल्या मोझाइक्स व पुतळे ही याची बोलकी उदाहरणे. सेंट मार्क बॅसिलिकाचे बायझन्टाइन शैलीचे पाच घुमट त्यांच्या अनोख्या स्थापत्यशैलीमुळे जगप्रसिद्ध झाले. सान फ्रान्सिस्को आणि सान जॉर्जओि चच्रेसच्या बांधकामांमध्ये पालाडिओ या वास्तुविशारदाने केलेल्या गॉथिक शैलीचेही स्थापत्य दिसून येते. पालाझ्झो डय़ुकाले म्हणजे डोजचा राजवाडा आणि धनिकांच्या प्रासादांमध्ये पुनरुत्थानोत्तर काळातील प्रसिद्ध चित्रकार बेलीनी, व्हेरोनीज, टिशियन, जॉर्जीयन यांच्या सुरेख चित्रकृतींमुळे व्हेनिसमधील प्रत्येक वास्तू जणू एक कलादालनच बनलीय. मायकेल अॅन्जेलोसुद्धा व्हेनिसमध्ये काही काळ वास्तव्यास होता. व्हेनिसने अनेक उत्तमोत्तम संगीतकार जगाला पुरविले. अॅन्टोनियो विवाल्डी हा कॅथोलिक धर्मगुरू बरोक शैलीच्या संगीताचा विख्यात रचनाकार होता. त्याने एकूण ४६ नाटके आणि ७३ लघुसांगीतिका लिहिल्या. १७२३ साली त्याने लिहिलेल्या ‘फोर सीझन्स’ या सांगीतिकेचे प्रयोग आजही होतात. तो स्वत: एक उत्तम व्हायोलिन वादक होता. टोमॅसो अलबिनानी याचे प्रसिद्ध संगीत नाटक ‘टिआट्रो इटालिया’ आजही लोकप्रिय आहे. शेक्सपियरची ’अॅथेल्लो’ ही शोकांतिका व्हेनिसवरच बेतलेली आहे. पुनरुत्थानोत्तर काळात सोळाव्या- सतराव्या शतकात येथील संस्कृती बहरली.
व्हेनिसची लोकवस्ती दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे तिथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कधी तरी, पुढे व्हेनिसच्या नागरिकांच्या बरोबरीने होईल अशी शक्यता वर्तवली जाते. त्या वेळी व्हेनिस शहर हेच स्वत: एक ‘ओपन एअर म्युझियम’ होईल असे वाटते! व्हेनिसमध्ये जानेवारीत साजरा होणारा काíनव्हल युरोपीय देशातील दुसऱ्या क्रमांकाचा समजला जातो. समकालीन चित्रपट, दृश्यकला, वास्तुकला, नृत्य यांसाठी व्हेनिसची ‘बिएनाले’तर जगप्रसिद्धच आहे.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा