असंख्य लहान कालवे आणि त्यातून संचार करणाऱ्या लहान वैशिष्टय़पूर्ण आकाराच्या ‘गोंडोला’ बोटी, तसेच कालव्यांच्या किनार्यावरील सुंदर इमारतींमुळे व्हेनिस हे एक परिकथांमधले स्वप्न शहर बनले. ११७ लहान लहान बेटांवर वसलेले आणि १७७ लहान लहान कालव्यांमुळे अद्वितीय ठरलेले व्हेनिस मूलत दलदलीने आणि अरुंद कालव्यांनी व्यापलेले होते. प्रथम आक्रमकांपासून संरक्षण म्हणून हे कालवे जतन केले गेले. पुढे वाहतुकीचे रस्ते बांधण्याऐवजी कालव्यांमधूनच जलवाहतूक सुरू झाली, जे नसíगक होते ते कालवे रुंद करून काही कालवे मुद्दाम खोदले गेले. कालव्यांच्या दोन्ही तटांवर प्रासाद आणि चच्रेस उभी राहिली, कालवे एकमेकांना जोडून पादचार्याना कालवे ओलांडण्यासाठी पूल बांधले गेले. या सर्व कालव्यांपकी सर्वाधिक लांब, रुंद आणि महत्त्वाचा कालवा म्हणजे ग्रँड कॅनाल- इटालियन भाषेत, ‘कनाल ग्रांद्रे’ व्हेनिसचा जो भाग इटालीच्या प्रमुख भूभागाला जोडलेला आहे तेथपर्यंत हा आधुनिक व्हेनिसचा मेनरोड म्हणजे ग्रँड कॅनॉल जातो. उलटय़ा ‘एस’ अक्षराच्या आकाराचा हा ग्रँड कॅनॉल चार कि.मी. लांबीचा, ३० ते ४० मीटर रुंदीचा आणि त्याची सरासरी खोली पाच मिटर आहे. ग्रँड कॅनॉलच्या काठावर आपला प्रासाद असणे हे श्रीमंतीचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. व्हेनिसचे प्रमुख, भव्य सांता मारिया चर्च ग्रँड कॅनालच्याच किनाऱ्यावर आहे. हे सर्व कालवे भरतीच्या वेळी कालव्यांमध्ये रेती आणून सोडतात. व्हेनिस नागरी प्रशासनाचे एक खाते केवळ कालव्यांच्या देखभालीसाठी निर्माण केलेले आहे. मानवी आणि औद्योगिक विसर्जन या कालव्यांमध्येच होत असल्याने पाण्याची प्रदूषण पातळी एकसारखी वाढते आहे. व्हेनिस प्रशासनाचे कालवेखाते या कालव्यांमधील जमा झालेले वाळूचे थर उपसणे, औद्योगिक विसर्जन आणि मानवी विसर्जनाची विल्हेवाट लावणे ही कामे करते. व्हेनिसचे वैशिष्टय़ असलेल्या गोंडोला बोटीने रात्रीच्या वेळी ग्रँड कॅनॉलमधून, दोन्ही काठांवरच्या झगमगत्या प्रासांदाच्या बाजूने फेरफटका मारणे हा अविस्मरणीय आनंद होय.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
डॉ. श्रीपाद द्वारकानाथ वैद्य
भाभा अणुसंशोधन केंद्राचा संपूर्ण परिसर निसर्गाच्या हिरवाईने जो नटलेला दिसतो त्याचं श्रेय डॉ. श्रीपाद द्वारकानाथ वैद्य यांच्याकडे जाते. अणुशक्ती केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी पुणे महापालिकेत उद्यान अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीपाद वैद्यांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटले ते डॉ. भाभांनी इथल्या कामासाठी त्यांची निवड केली तेव्हा. भाभांच्या उत्तेजनाने त्यांनी फ्रान्समधील व्हर्साय युनिव्हर्सटिीचा लॅण्डस्केप आíकटेक्चरचा अभ्यासक्रम १९५८ साली (जेव्हा हा विषय भारतात रुजलाही नव्हता) पुरा केला. त्या अभ्यासक्रमाने त्यांना बागकामशास्त्राकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मिळाला. ह्य़ाच्या परिणामस्वरूप अणुशक्ती केंद्रात सजलेली इटालियन पद्धतीची बोगनवेलीची बाग, तसंच ‘पार तेर’ ह्य़ा फ्रेंच धर्तीवर मांडणी केलेली कर्दळीची बाग, इंग्लिश पद्धतीचा चालत फिरण्यासारखा पार्क, झेन पद्धतीची जपानी बाग, अशा जगातील विविध पद्धतींचा आविष्कार अणुशक्ती केंद्रात पाहायला मिळतो.
वृक्षांचा समग्र अभ्यास करून सौंदर्यदृष्टय़ा कोणते वृक्ष कुठे लावावेत ह्य़ावर त्यांचा कटाक्ष असे. विकासकामात कधी ना कधी वृक्ष काढण्याची वेळ येते. मलबार हिल येथील अशाच एका पर्जन्यवृक्षाबाबत डॉ. भाभांच्या सांगण्यावरून त्यांनी तो जिवंत वृक्ष तेथून स्थलांतरित करून पेडर रोडवरील अणू केंद्राच्या केनिलवर्थ ह्य़ा गृहसंकुलात स्थानापन्न केला. अशा असंख्य वृक्षांना वैद्यांनी आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून जीवदान दिले आहे. अणू केंद्राची उद्याने उभारण्याव्यतिरिक्त त्यांनी काश्मीपर्यंत जाऊन मुघल गार्डन्सचा अभ्यास केला आणि त्यांची देखभाल कशी करायची याचा सल्ला शेख अब्दुल्ला सरकारला दिला. याशिवाय त्यांनी आरेखन केलेल्या आणखी काही बागा म्हणजे वरळीची नेहरू सेंटरची बाग, पठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान, घारापुरी लेण्यांचा परिसर इत्यादी. चित्रकलेच्या जाणकारीमुळे ‘चित्रकार’ होमी भाभांच्या चित्रनिवड समितीवरही वैद्यांची वर्णी लागली होती. त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी गायिका कमल तांबे यांचे शिष्यत्व पत्करले होते. अशा या महान निसर्गप्रेमीचे २५ ऑक्टोबर २०११ रोजी ८६व्या वर्षी निधन झाले. वैद्यांचे स्मरण म्हणून इंडियन सोसायटी ऑफ लॅण्डस्केप आíकटेक्चर ह्य़ा विख्यात संस्थेतर्फे त्यांच्या नावाने दर वर्षी एक स्मृतिव्याख्यान आयोजित केले जाते. फुलवलेले नंदनवन आजही त्यांची आठवण कायम देत जाईल.
– डॉ. विद्याधर ओगले
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा