व्हेनिसमधील सतत गजबजलेले आणि सर्वाधिक ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे सेंट मार्क चौक ऊर्फ पिआझ्झा सान मार्को. या चौकात प्रवेश करतानाच समोर उभे असलेल्या ग्रॅनाईटच्या दोन स्तंभांवर व्हेनिसच्या दोन द्वारपालांचे प्रतीकात्मक पुतळे आहेत. त्यापकी एका स्तंभावर सोनेरी पंखधारी सिंहाचा पुतळा आहे. सोनेरी पंखधारी सिंह हे व्हेनिसचे सध्याचे ग्रामदैवत सेंट मार्क याचे प्रतीक समजले जाते. सेंट मार्क चौकातच सेंट मार्क बॅसिलिकाची भव्य आणि बायझंटाइन स्थापत्य शैलीची, काहीशी वेगळी वाटणारी इमारत आहे. येशू ख्रिस्ताचा सर्वात जवळचा शिष्य पीटर हा येशूच्या निधनानंतर राजा हेरॉदच्या तडाख्यातून कसाबसा निसटून रोमला पोहोचला, त्या वेळी त्याने जॉन मार्क या येशुभक्ताला आपल्याबरोबर रोमला नेले. तिकडे मार्कने बायबलमधील ‘गोस्पेल ऑफ मार्क’ लिहिले. इ.स. ४९ मध्ये मार्क अलेक्झांड्रिया येथे पोहोचला. तिथे त्याने चर्च ऑफ अलेक्झांड्रिया स्थापन केले. मार्क अलेक्झांड्रिया चर्चचा पहिला बिशप झाला. तसेच हा मार्क आफ्रिकेतील ख्रिश्चन धर्माचा संस्थापकही समजला जातो. अलेक्झांड्रिया आणि उत्तर आफ्रिकेत ख्रिश्चन धर्माचा प्रसार होऊ लागल्यावर तिथल्या पूर्वीच्या मूíतपूजक धर्ममरतडांना ही आपल्यासाठी धोक्याची सूचना असल्याचे जाणवू लागले. या धर्ममरतडांच्या हस्तकांनी इ.स. ६८ मध्ये मार्कच्या गळ्याभोवती दोर आवळून त्याला अलेक्झांड्रियाच्या रस्त्यांमधून फरफटत नेले. मार्कला फरफटत नेत असतानाच मृत झाल्याने त्याचे शरीर अलेक्झांड्रियाजवळच्या समुद्रात फेकून देण्यात आले. पुढे व्यापारामुळे व्हेनिस अर्थसंपन्न झाल्यावर सर्व व्हेनिसवासीयांनी मार्क याला व्हेनिसचे ग्रामदैवतपद देण्याचे ठरविले. मार्कच्या मृत्यूनंतर त्याला संतपद देण्यात आले होते. सेंट मार्कचे समुद्रात असलेले अवशेष दोन व्हेनिशियन व्यापारी व दोन ग्रीक साधूंनी ८२८ साली पळवून व्हेनिसच्या डोजच्या ताब्यात दिले. पुढे अकराव्या शतकात सेंट मार्क चौकात सेंट मार्क बॅसिलिका हे चर्च बांधण्यात आले. व्हेनिसमध्ये सध्या दिसत असलेले सोनेरी पंखधारी सिंह हे सेंट मार्क या ग्रामदेवतेचे प्रतीक समजले जाते.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 
प्रा. एम. ओ. पी. अयंगार
प्रा. मंडय़म ओसूरी पार्थसारथी यांचा जन्म मद्रासमध्ये गिप्लीकन या गावी १५ डिसेंबर १८८६ मध्ये झाला. त्यांनी वनस्पतिशास्त्रात शैवाल हा प्रमुख विषय घेऊन एम.ए.ची पदवी मिळवली. सर्वप्रथम त्यांनी शासकीय संग्रहालयात वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. त्यानंतर अयंगार शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय चेन्नई येथे प्राकृतिक विज्ञान या विभागाचे प्रमुख होते. पुढील शिक्षणासाठी लंडनला जाऊन १९३२ साली त्यांनी लंडन विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केली.
भारतात परतल्यावर त्यांनी त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रोफेसर पदावर प्रेसिडन्सी कॉलेज, चेन्नई येथे काम केले. डेनिश शैवालतज्ज्ञ डॉ. बोर्जेसेन्स यांच्याबरोबर त्यांनी दक्षिण भारतातील किनाऱ्यालगतच्या शैवालांचा अभ्यास केला. त्यांचे हे कार्य त्या क्षेत्रातील अग्रणी स्वरूपाचे आणि महत्त्वाचे गणले जाते. त्यांनी दक्षिण भारतातील गोडय़ा आणि खाऱ्या पाण्यातील शैवालांचा अभ्यास केला. बालकृष्णन, देसीकाचारी, सुब्रमण्यम हे यांचे विद्यार्थी होते. त्यांच्या विद्यार्थ्यांनी देखील शैवालाच्या अनेक नवीन प्रजाती शोधून काढल्या. हे शैवाल विश्वात मोठे कार्य समजले जाते. म्हणूनच प्रा. अयंगार यांना फॉयकॉलॉजी विषयातील भारतातील पितामह म्हटले जाते. त्यांचे चेन्नई विद्यापीठ भारतातील शैवाल विज्ञानाचे अग्रगण्य केंद्र बनले.
त्यांनी शैवाल विज्ञानात सिस्टेमॅटिक इकॉलॉजी, जिऑग्राफी, सायटॉलॉजी आणि इव्होल्यूशन या क्षेत्रात मोठे योगदान दिले. अयंगार फायकोलॉजीकल सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष होते. प्रा. अयंगार याचे पीएच.डी.चे गुरू प्रो. फ्रिष्ट यांच्या सन्मानार्थ भारतात तलावात सर्वप्रथम सापडलेल्या एका शैवालाला त्यांचे नाव दिले.
प्रा. अयंगार इंडियन बॉटनिकल सोसायटीच्या पत्रिकेचे संपादक होते. त्यांना याच सोसायटीचे बिरबल सहानी पदक मिळाले होते. त्याचप्रमाणे सुंदरलाल होरा पदक १९६० साली मिळाले. प्रा. अयंगार लिनियन सोसायटी ऑफ लंडनचे फेलो होते. ते अमेरिकन असोसिएशन फॉर अ‍ॅडव्हान्सेस इन सायन्सचे फेलो होते. इंटरनॅशनल फॉयकॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष होते. याचप्रमाणे १९२७ साली झालेल्या इंडियन सायन्स कॉग्रेसच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे ते अध्यक्ष होते.
–  डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

Story img Loader