व्हिएन्ना ही ऑस्ट्रियाची राजधानी आहे, तशीच व्हिएन्ना प्रांताचीही आहे. ऑस्ट्रियन प्रजासत्ताक नऊ प्रोव्हिन्सेस म्हणजे प्रांतांत विभागले आहे. व्हिएन्ना शहराची व्याप्ती ४१४ चौ.कि.मी. आणि लोकसंख्या १७.५० लक्ष आहे. व्हिएन्ना महानगरपालिकेत १०० सदस्यांचे व्हिएन्ना सिटी कौन्सिल नागरिकांच्या मतदानाने निवडले जाते. प्रत्येक सदस्याची निवड पाच वर्षांसाठी होते. व्हिएन्ना शहराच्या सिनेटवर सिटी कौन्सिलमधून १२ सिटी कौन्सिलर्सची निवड केली जाते. प्रत्येक राजकीय पक्षाचे किती सिटी कौन्सिल सदस्य निवडून आले, त्या प्रमाणात त्या पक्षाचे सिटी कौन्सिलर्स निवडले जातात. सध्या सिनेटवर सोशल डेमोक्रॅट्सच्या ६ जागा, फ्रीडम पार्टीच्या ४ जागा आणि इतर दोन पक्षांच्या एक एक जागेवर त्यांचे कौन्सिलर्स आहेत. सिटी कौन्सिलचे सदस्य, व्हिएन्ना शहराच्या मेयरची पाच वर्षांसाठी निवड करतात. व्हिएन्नाचा मेयर व्हिएन्ना प्रांताचा गव्हर्नरही असतो. शहर प्रशासनाच्या कार्यकारी मंडळावर आठ सिटी कौन्सिलर्सची निवड केली जाते. व्हिएन्नाच्या सार्वजनिक वाहतुकीचे नियंत्रण ‘व्हीओआर’ ही सरकारी संस्था करते. अत्यंत काटेकोरपणे वेळापत्रक पाळण्याबद्दल आणि उत्तम नियोजन करण्याबद्दल व्हीओआर युरोपात नावाजलं गेलंय. व्हिएन्नातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रेल्वेसेवा, बससेवा, ट्रामसेवा, हवाईसेवा आणि जलसेवा यांचा समावेश होतो. रोजच्या वाहतुकीसाठी व्हिएन्नाचे ६०% लोक रेल्वेसेवा वापरतात. व्हिएन्ना यू बान या भूमिगत रेल्वेचे व्हिएन्ना शहरात पाच मार्ग आहेत. व्हिएन्ना एस बान या जमिनीवरून जाणाऱ्या रेल्वेचे ९ मार्ग आहेत. स्ट्राबेन बान या ट्रामसेवेचे २९ मार्ग तर अटोबस या बससेवेचे ९० मार्ग आहेत. व्हिएन्ना इंटरनॅशनल एअरपोर्टवरून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा चालू असते.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

***************************************

 

भारतीय वनस्ततिशास्त्रज्ञ ; प्रोफेसर जे. जे. चिनॉय

प्रो. जमशेटजी चिनॉय यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९०९ साली भुज-कच्छ येथे झाला. प्रो. चिनॉय १९२९ साली बी.एस्सी.ची परीक्षा विशेष योग्यतेसह उत्तीर्ण झाले. १९३१ साली मुंबईतील  विज्ञान संस्थेतून प्रसिद्ध प्राध्यापक डॉ. आर. एच. दस्तूर यांच्या मार्गदर्शनाखाली एम.एस्सी. पदवी चिनॉय यांनी मिळवली. हे शिक्षण घेत असताना त्यांना रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची  फेलोशिप मिळत होती. १९३२ ते १९३५ दरम्यान लंडनला जाऊन पुढील शिक्षण घेण्यासाठीची शिष्यवृत्ती त्यांना मुंबई विद्यापीठाकडून मिळाली. त्या ठिकाणी चिनॉय  यांना जागतिक कीर्तीचे प्लॅन्ट फिजिओलॉजिस्ट प्रो. एफ. जी. ग्रेगेरी यांचे मार्गदर्शन मिळाले. बायोलॉजी लॅबोरेटरी इम्पिरिकल कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी, लंडन येथे काम करून १९३५ साली पीएच.डी. पदवी मिळवली.

भारतात परत आल्यावर काही काळ त्यांनी गव्हाची कोरडवाहू शेती यावर गोदरेजच्या नाशिक येथील केंद्रावर मोठय़ा प्रमाणात परीक्षणाचे काम केले. १९३५ साली त्यांची नेमणूक संशोधन साहाय्यक म्हणून लॉईलपूर येथील कृषी विद्यालयात झाली. या प्रकल्पास सेट्रल कॉटन कमिटीचे अर्थसाहाय्य मिळाले. १९४१ साली त्यांची नेमणूक असिस्टंट  इकॉनॉमिक बॉटनिस्ट म्हणून नव्याने सुरू झालेल्या प्लॅन्ट फिजिओलॉजी विभागात (इंडियन अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिटय़ूट) नवी दिल्लीमध्ये झाली. १९४७ ते १९४९ या काळात प्रो. चिनॉय यांनी दिल्ली विश्वविद्यालयात  प्रपाठक म्हणून कार्य केले.

त्यानंतर त्यांची नेमणूक गुजरात विश्वविद्यालयात अहमदाबाद येथे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून झाली. १९७५ साली निवृत्त होईपर्यंत त्यांनी याच ठिकाणी काम केले व विश्वविद्यालयातील फिजिओलॉजी या विषयाचे प्रमुख केंद्र म्हणून नावलौकिक मिळवून दिला. दोन वर्षे त्यांनी प्रोफेसर एमिरेट्स म्हणून काम केले. प्रो. चिनॉय यांनी त्यांचा संपूर्ण कार्यकाल बेसिक व अ‍ॅप्लाइड बायलॉजिकल रिसर्च इन प्लॅन्ट फिजिओलॉजीसाठी वाहून घेतला होता.

 

कॅनडातील मॉन्ट्रियल येथे १९५९ साली झालेल्या ११व्या जागतिक बोटॅनिकल काँग्रेसच्या प्लॅन्ट फिजिओलॉजी विभागाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे २५० पेक्षा जास्त शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले.

– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

Story img Loader