पहिले महायुद्ध (१९१४-१९१८) संपल्यावर व्हिएन्नामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा येऊन प्रचंड महागाईने सामान्य माणसाचे जीवन खडतर झाले. ऑस्ट्रियात जर्मन-ऑस्ट्रियन प्रजासत्ताक स्थापन झाले. परंतु १९२१ मध्ये व्हिएन्नाचे प्रशासन बाकी ऑस्ट्रियन प्रदेशाहून वेगळे करण्यात आले. या बरोबरच ऑस्ट्रिया-हंगेरियन साम्राज्य नष्ट झाले. व्हिएन्नाच्या प्रशासनाचा ताबा रशियाने घेतल्यामुळे व्हिएन्ना, ‘रेड व्हिएन्ना’ नावाने ओळखले जाऊ लागले. एकंदरच गरप्रशासन आणि महागाईमुळे व्हिएन्ना आणि पूर्व ऑस्ट्रियात १९३४ मध्ये यादवी माजली. याच काळात जर्मनीत हिटलरचा नाझी पक्ष प्रबळ झाला होता. व्हिएन्नातील अनागोंदीचा फायदा उठवीत मार्च १९३८ मध्ये अॅडॉल्फ हिटलरने ऑस्ट्रियावर आपल्या नाझी पक्षाचा अंमल बसवला. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस म्हणजे १९३९-४० मध्ये व्हिएन्नावर युद्धाचा काही परिणाम झाला नाही. पुढे १९४३ आणि १९४५ साली दोस्त राष्ट्रांनी केलेल्या बॉम्बफेकीत शहराच्या अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. महायुद्धाच्या समाप्तीनंतर जेते रशिया, अमेरिका, युनायटेड किंगडम आणि फ्रान्स यांनी व्हिएन्ना शहराचे चार विभाग करून ते आपसात वाटून घेतले. फर्स्ट डिस्ट्रिक्ट या नावाने व्हिएन्नाचा काही भाग सामायिक देखरेखीखाली या चार जेत्यांनी राखून ठेवला. पुढे १९५५ साली ‘ऑस्ट्रियन स्टेट ट्रीटी’ या नावाने अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि यूके हे महायुद्धातील जेते आणि ऑस्ट्रियन राजकीय पक्ष यांच्यात झालेल्या तहान्वये ऑस्ट्रियाला राजकीय स्वातंत्र्य देण्यात आले, महायुद्धानंतर पश्चिम युरोपात सर्वत्र जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वाढून जनजीवन सामान्य झाले. १९७० साली व्हिएन्नात युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेनचे तिसरे शाखा कार्यालय सुरू झाले. युनोच्या व्हिएन्ना कार्यालयाचे कर्मचारी, विविध देशांचे राजकीय प्रतिनिधी, राजकीय मुत्सद्दी मिळून १७ हजार व्यक्तींचा व्हिएन्नात कायम वावर असतो. १९९० मध्ये ऑस्ट्रियाला युरोपियन युनियनचे सदस्यत्व देण्यात आले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
*****************************************************************
पेंच राष्ट्रीय उद्यानातील वृक्षसंपदा
पेंच राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात विभागले गेले आहे. पेंच नदीवरून हे नाव देण्यात आले आहे. इथले वन हे मिश्र वन असून पर्जन्यमान भरपूर असल्याने अनेकविध वनस्पती जीवन पाहायला मिळते. २५७ चौ. किमी. क्षेत्रात हे राष्ट्रीय उद्यान पसरले आहे. इथे १४५ प्रकारच्या वनस्पती आहेत. कान्हाप्रमाणेच इथेही आद्र्र पानगळ वन आढळते. अशा वनाचा मुख्य प्रतिनिधी म्हणजे सालवृक्ष इथेही मोठय़ा प्रमाणावर अस्तित्वात आहे. उच्य प्रतीचे इमारती लाकूड, जनावराचे उत्तम खाद्य म्हणजे त्याची पाने, फळे पौष्टिक असून आदिवासींना औषध पुरवतात. टर्मिनालिया प्रजातीतील अनेक जाती इथे आहेत. त्यात प्रामुख्याने सापडणाऱ्या म्हणजे ऐन, अर्जुन, हिरडा किंवा हरीतकी आणि बेहडा म्हणजे संस्कृतभाषेत बिभीतकी वगरे. धावडा, करू, तेंदू, अमलतास, पळस, बिजा आणि हालदू याही वनस्पती इथे हजेरी लावून आहेत. सदाहरित वृक्ष म्हणजे आंबा, जांभूळही पाहायला मिळतात. बांसचे वन हेसुद्धा या राष्ट्रीय उद्यानाचे एक आकर्षण आहे. घाणेरी आणि भांटची झुडपे इथे तिथे सापडतात.
भांटला मराठीत भंडिरा म्हणतात. मोहाची झाडेही इथे विपुल आहेत. या उद्यानात काही भागात मुद्दाम मोठे वृक्ष, छोटी झाडे आणि झुडपे वाढू दिली नाहीत त्याऐवजी शाकाहारी तृणभक्षी प्राण्यांना चारा मिळावा यासाठी गवती क्षेत्र राखीव ठेवलाय म्हणा ना!
सजा किंवा ऐन वृक्षाची साल मगर या प्राण्यांच्या पाठीप्रमाणे दिसते. खोड भरीव आणि टिकाऊ असते. त्यामुळे त्याचा उपयोग इमारती लाकूड म्हणून जास्त होतो. हिरडा आणि बेहडा या वनस्पती त्रिफळा या औषधी मिश्रणात आवळ्याबरोबरचे आणखी दोन घटक म्हणून उपयोगात आणतात हे आपल्याला माहितीच आहे. धावडा वनस्पतीपासून उत्तम प्रतीचा कोळसा मिळतो. शिवाय शेतीची अवजारे त्याच्या लाकडापासून बनवितात. अर्जुन वृक्ष पाण्याच्या साठय़ाजवळ वाढलेला आढळून येईल. बहाव्याची पिवळी फुले, पळसाची लाल-शेंदरी फुले वनाची शोभा वाढवतात. अर्जुनाचे फुलोरे त्यात भर घालतात. फुलोरे अग्रभागी प्रथम पिवळसर-पांढरे असतात. नंतर पूर्ण पिवळसर होतात आणि त्यांचा सुगंध आसमंतात दरवळत असतो.
– किशोर कुलकर्णी (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org