पिकांपासून धान्य काढल्यानंतर मोठय़ा प्रमाणात पिकांचे अवशेष शेतामध्ये उपलब्ध असतात. पिकांचे अवशेष तसेच भुस्सा यांचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जातो. गव्हाची काढणी करताना लाखो टन चारा शेतात पडतो. हा चारा यंत्राच्या साह्याने गोळा करून त्याचे ब्लॉक शेतातच तयार करून, पाहिजे तेथे वाहातूक करता येईल. पिकाचे अवशेष बारीक करून त्यावर प्रक्रिया केल्यास त्याचा जनावरांना खाद्य म्हणून वापर करता येईल. अर्थात या पिकांच्या अवशेषांमध्ये पौष्टिक गुणधर्म कमी असल्यामुळे त्यापासून परिपूर्ण खाद्य बनविण्यासाठी विविध घटकांचा वापर करावा. त्यामध्ये विविध धान्याची चुनी, तेलबियांच्या पेंडी, मका, खनिज मिश्रण आणि मीठ यांचा एकत्रित वापर केला तर जनावरांना पाहिजे असलेला आहार सहज देता येतो.
उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा कमी होत असल्यामुळे जनावरांना लागणारी प्रथिने आणि इतर अन्नघटक यांच्यासाठी विविध धान्यांचा वापर करायला हवा. विविध धान्य किंवा धान्यांवर प्रक्रिया केल्यानंतर वाया जाणारया घटकांचा वापर करून जनावरांना चांगला आहार देता येईल. उन्हाळ्यामध्ये प्रथिनयुक्त चाऱ्याचा वापर कमी होत असताना वाळलेल्या चाऱ्याच्या वजनाच्या २ ते २.५ टक्के युरियाचा वापर केला, तर जनावरांच्या पोटामध्ये असलेल्या सूक्ष्मजीवाणूंची वाढ होण्यास मदत होते. युरियामुळे पोटातच अमोनिया तयार होऊन पोटातील सूक्ष्मजीवाणू त्यांचे प्रथिनयुक्त शरीर बनवितात. या प्रथिनांचा वापर जनावरांचे शरीर वाढीसाठी, प्रजनन आणि उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरतो. अर्थात, जास्त तापमान आणि पिण्यासाठी कमी पाणी अशा परिस्थितीमध्ये मात्र युरियाचा वापर कमी करावा.
चाऱ्याची फारच टंचाई असेल, तर अशावेळी उसाचे गळीत केल्यानंतर उपलब्ध असलेल्या उसाच्या भुस्स्यापासून जनावरांना काही प्रमाणात खाद्य तयार करता येईल. भुशातील लिग्निनचे जास्त प्रमाण हे जनावरांना पचनासाठी जड असते. उकळत्या पाण्यातून किंवा वाफेद्वारे भुशातील लिग्निनचे प्रमाण कमी करून भुस्स्याचे पौष्टिक गुणधर्म वाढविता येतील. उसाचा भुस्सा, मळी, धान्याचा भरडा, खनिज मिश्रण यांचा वापर करून चांगल्या प्रतीचे खाद्य निर्माण करता येईल. अशा प्रकारे प्रक्रिया केलेला चार किलो भुस्सा प्रत्येक जनावराला देता येईल.
-डॉ. भास्कर गायकवाड (अहमदनगर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा